'फनी' वादळग्रस्तांचा 'तारणहार'

    दिनांक  07-May-2019   
फनीवादळाच्या संकटावर मात करण्यासाठी एक मराठी अधिकारीही डोळ्यात तेल ओतून कार्यरत आहे. विजय अमृता कुलांगे या मराठी अधिकार्‍याचे नाव. त्यांच्याविषयी...


मागील आठवड्यात ओडिशाच्या पूर्व किनारपट्टीवर ’फनी’ चक्रीवादळाने अक्षरशः हाहाकार माजवला. या वादळाच्या तडाख्याने जवळपास एक कोटी नागरिक प्रभावित झाले. ओडिशाचे जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. ’फनी’च्या प्रभावाने ओडिशातील वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली असली तरी, प्रशासनाच्या नियोजनामुळे लाखो लोकांचे जीव वाचवण्यात यश मिळाले आहे. प्रशासनाच्या या नियोजनाचे भारतातूनच नव्हे, तर संयुक्त राष्ट्रासह जगभरातून कौतुक होत आहे. अभिमानास्पद गोष्ट म्हणजे, या भीषण संकटावर मात करण्यासाठी असाच एक मराठी अधिकारीही डोळ्यात तेल ओतून कार्यरत आहेत. यातील विजय अमृता कुलांगे या मराठी अधिकार्‍याचे नाव सध्या देशभरात मोठ्या अभिमानाने घेतले जात आहे. म्हणूनच कोण आहेत विजय कुलांगे? त्यांची कामगिरी काय? हे आजच्या ’माणसं’ या सदरात जाऊन घेऊया.

 
 
 

अहमदनगर जिल्ह्यातील राळेगण म्हसोबा या गावात विजय कुलांगे हे लहानाचे मोठे झाले. त्यांचे वडील शिवणकाम करायचे, तर आई मजुरी. त्यामुळे घरची परिस्थिती अगदी बेताचीच होती. आपण शिकून मोठे व्हावे, यासाठी आपले आई-वडील स्वत: झिजत आहेत, रात्रंदिवस कष्ट करत आहेत, याची जाणीव त्यांना होतीच. याच जाणिवेने त्यांचे पाय आजही जमिनीवर आहेत आणि म्हणूनच अपार कष्ट करण्याची तयारी त्यांच्या रोमारोमात  भिनली आहे. खरंतर मोठे होऊन आपणडॉक्टरव्हावे, असे त्यांना नेहमी वाटायचे. हुशार असलेल्या विजय यांचा वैद्यकीय यादीत क्रमांक लागला, पण वैद्यकीय शिक्षणाचा खर्च आपल्या आईवडिलांना झेपेल का, या प्रश्नाने त्यांनी डॉक्टर होण्याचा नाद सोडून दिला. आपल्या आईवडिलांच्या बजेटमध्ये असलेले शिक्षण त्यांनी घ्यायचे ठरवतडीएडपूर्ण केले. ’डीएडपूर्ण झाल्यानंतर नेवासा तालुक्यातील गळनिंब येथे प्राथमिक शाळेचे शिक्षक म्हणून ते रुजू झाले. मात्र, मोठी स्वप्न पाहणार्‍या विजय यांचा प्रवास इथेच संपणारा नव्हता. विद्यार्थ्यांना शिकवता शिकवता त्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू ठेवला. याच परीक्षांतून २००१ साली त्यांचीसाहाय्यक विक्रीकर निरीक्षकम्हणून निवड झाली. त्यानंतर २०१० साली ते जामखेडचेतहसीलदारम्हणून नियुक्त झाले. तरीही त्यांचा अभ्यास चालूच होता. अखेर त्यांच्या कष्टाचे चीज झाले आणि २०११ साली तेकेंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले.

 


 

प्राथमिक शाळेचा शिक्षक ते जिल्हाधिकारी हा त्यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांच्या अनुभवांचा प्रवास ’आजचा दिवस माझा’ या पुस्तकातून त्यांनी जगासमोर उलगडला आहे. या दरम्यानच्या काळात ते प्रशासकीय जबाबदारी, कौटुंबिक जबादारी आणि अभ्यास अशी तिहेरी भूमिका पार पाडत होते. जामखेडला तहसीलदार पदावर असताना त्यांनी विविध शासकीय योजना व कार्यक्रम राबवले. ’राजस्व अभियानां’तर्गत ९३० शिवार रस्ते असोत, शहरातील अतिक्रमण असो, स्त्रीभ्रूणहत्या व वाळू तस्करीच्या विरोधातील धडक कारवाई असो किंवा पाणीटंचाई असो, अशा विविध क्षेत्रांत त्यांनी धडाकेबाज कामगिरी पार पाडली. त्यांच्या याच कामगिरीमुळे ‘राजस्व अभियाना’मध्ये जामखेड तालुका राज्यात प्रथम आला होता. तसेच याच कामासाठी त्यांना ’आदर्श तहसीलदार’ म्हणून गौरविण्यात आले. त्यांची हीच धडाकेबाज कामगिरी ’आयएएस’ झाल्यानांतरही कायम राहिली असली तरी, त्यांच्या कामाला व्यापक रूप मिळाले. मसुरीतील प्रशिक्षण संपवून ते ओडिशा राज्याच्या सेवेत दाखल झाले. बोनाईला उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांची प्रथम निवड झाली. त्यानंतर ओडिशातीलच संबळपूर येथे अतिरिक्त मनपा आयुक्त म्हणून त्यांची नेमणूक झाली. या ठिकाणीही त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवली. कोणत्याही दबावाला बळी न पडता, येथील पक्की अतिक्रमणे हटवायचे दिव्य काम त्यांनी पूर्ण करून दाखवले. ’पॉलिथीनमुक्त संबळपूर’ योजना राबवून त्यांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले.

 
 

ओडिशातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या गंजम जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदावर कार्यरत असताना कामगिरी आणि नियोजन काय असते, हे त्यांनी दाखवून दिले. या ठिकाणच्या कार्यकाळात त्यांनी दोन चक्रीवादळांवर यशस्वी मात दिली आहे. ’तितलीचक्रीवादळाच्या वेळी एका रात्रीत दोन लाख लोकांचे स्थलांतर असो की, दीडशेहून अधिक आंध्र प्रदेशच्यास मच्छीमारांची सुटका असो, ही सर्व जबाबदारी त्यांनी यशस्वी पार पाडली. ’फनीचक्रीवादळादरम्यानही त्यांनी अवघ्या ३६ तासांत तीन लाख लोकांचे स्थलांतर केले. त्यात प्रामुख्याने ५४१ गरोदर स्त्रिया, अपंग आणि वयोवृद्ध यांचा समावेश होता. कौतुकास्पद म्हणजे, लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी त्यांनी भर वादळात मदतकार्यात पुढाकार घेतला. अधिकार्‍यांनी फक्त कार्यालयामध्ये बसून आदेश सोडायचे नसतात, तर प्रत्यक्षात मैदानात उतरून परिस्थितीशी झुंजायचे असते, हा संदेशच जणू त्यांनी इतर अधिकार्‍यांना दिला होता. म्हणूनच ते नेहमी म्हणतातआपल्या हातात ना काल असतो, ना उद्या... असतो तो आज आणि आताचा क्षण.’

 
 

 
 
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat