आता श्रीलंकेतही जिहाद?

    दिनांक  23-Apr-2019   रविवारी चर्चला ज्यांनी लक्ष्य केले, ते ‘इसिस’, ‘अल कायदा’ किंवा ‘नॅशनल तौहिद जमातयांपैकी कोणी असू शकते. अथवा तिघांच्या हातमिळवणीतूनही हा प्रकार घडलेला असू शकतो. कारण, रविवारी ख्रिस्त्यांचा ‘ईस्टर संडे’ होता आणि इस्लाम व ख्रिस्त्यांचे वैर शेकडो वर्षांपासूनचे आहे.

 

सुमारे तीनशेच्या जवळपास निरपराध्यांचा बळी घेणाऱ्या साखळी बॉम्बस्फोटांनी रविवारी श्रीलंकाच नव्हे, तर भारतासह अवघे जग हादरले. दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेल्यांच्या देहाच्या झालेल्या चिंधड्या, जखमींचे विव्हळणे आणि नातेवाईकांचा आक्रोश कोणत्याही संवेदनशील माणसाला हेलावून सोडणारा होता. परंतु, हा हल्ला असा एकाएकी झाला का? तर निश्चितच नाही; योजनाबद्धरित्या, षड्यंत्र रचून हा आत्मघाती स्फोट घडवून आणल्याचे त्याची दाहकता आणि विध्वंसक क्षमता पाहिली की पटते. सध्यातरी या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नसली तरी धर्मांध इस्लामी फिदायीनांच्या ‘नॅशनल तौहीद जमात’वर हल्ल्याचा संशय आहे. परंतु, गेली दहा वर्षे शांत असलेल्या श्रीलंकेला होत्याचे नव्हते करणारा हा प्रसंग घडण्याआधी तिथे नेमके काय झाले?

 

२००९ साली तामिळ बंडखोरांच्या पराभवानंतर श्रीलंकेला हिंसाचारावर नियंत्रण मिळवणे सोपे गेले होते. पण, आता तिथली शांतता पुन्हा एकदा धोक्यात आली आहे. गेल्यावर्षी मुस्लिमांविरोधात झालेल्या व्यापक आंदोलनानंतर श्रीलंका आतल्याआत खदखदत असल्याचे समोर आले. अर्थात ती केवळ चाहूल होती, मात्र आगामी काही दिवसांत या संघर्षामुळे उद्भवणाऱ्या आणखीही काही क्रिया-प्रतिक्रिया नक्कीच पाहायला मिळू शकतात. हिंदी महासागरात बेटांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीलंकेत चार प्रकारच्या दहशतवादी/कट्टरपंथी संघटना किंवा गट सक्रिय असल्याचे म्हणतात. ज्यात इस्लामी मूलतत्त्ववादी, बौद्ध कट्टरपंथी आणि तामिळ उग्रवादी यांच्याबरोबरच शस्त्रसज्ज अशा काही गटांचेही नाव घेण्यात येते, जे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या सरकारला अस्थिर करण्याच्या तयारीत आहेत. पहिली गोष्ट म्हणजे इस्लामी मूलतत्त्ववादी आणि बौद्ध कट्टरपंथी हे दोन्ही एकमेकांशी उडालेल्या धार्मिक भडक्यातून पैदा झालेले गट असल्याचे दिसते. २०१८च्या मुस्लीमविरोधी आंदोलनात इथल्या मुसलमान समाजाचे मोठे नुकसान झाले, ज्यामागे बहुसंख्याक सिंहली लोक होते. परंतु, एरवी शांत समजल्या जाणाऱ्या बौद्धांवर हाती शस्त्र घेण्याची वेळ तिथल्या मुस्लिमांनी आणल्याचा आरोप नेहमीच केला जातो. केवळ १० टक्के असलेल्या मुस्लिमांनी अराजक पसरविल्याचा आणि धर्मांतराचे कारखाने चालविल्याचा बौद्धांचा दावा आहे. त्यामागे वर्षानुवर्षे धर्मांध इस्लामी टोळ्यांनी केलेल्या अन्याय-अत्याचाराची पार्श्वभूमी आहे.

 

मुस्लिमांची लोकसंख्या एक दिवस आपल्यापेक्षा सर्वाधिक होईल; ज्यामुळे आपल्या देशाची संस्कृती, प्रथा, परंपरा धोक्यात येईल, नष्ट होईल, अशी बौद्धांना भीती वाटते. कारण, मध्य आशियाई देश, चीनचा शिनजियांग प्रांत, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान इसवी सनाच्या सातव्या ते अकराव्या शतकापर्यंत इस्लामच्या आक्रमणाआधी बौद्धबहुलच प्रदेश होते. मात्र, दरम्यानच्या काळात प्रेषित मोहम्मदाने इस्लामची स्थापना केली आणि नंतर धर्माचा चोळणा घालून धर्मांध इस्लामी आक्रमकांच्या टोळ्यांनी बाकी सर्वच संस्कृती नष्ट करण्याचा सपाटा लावला. त्यापासून बौद्धबहुल भागही वाचले नाहीत-आधुनिक काळात तालिबानने फोडलेल्या बामियाँन बुद्धमूर्तीचे उदाहरण तर अगदीच ताजे. इथूनच इस्लामचा उदय आणि बौद्ध धर्माचे पतन या दोन्ही घटना एकमेकांशी जोडल्या जाऊ लागल्या. श्रीलंकेतील बौद्धांच्या कट्टरपंथी कारवायांवर या सगळ्याच घटनांचा प्रभाव आहे. असे असले तरी बौद्धांचा संघर्ष हा मुस्लिमांशी असल्याने ते चर्चवर हल्ला करण्याचे कोणतेही कारण दिसत नाही, म्हणजेच आताच्या हल्ल्यात त्यांचा हात नाही, असे म्हणण्यास नक्कीच वाव आहे.

 

दुसऱ्या बाजूला तामिळ उग्रवाद्यांची म्हणजेच ‘लिट्टे’ची दहशत श्रीलंकेने दहा वर्षांपूर्वीच मोडून काढली आहे. अजूनही तिथे काही तामिळ संघटना अस्तित्वात आहेत, पण त्यांच्यावर श्रीलंकन सरकारची नेहमीच नजर असते. बौद्ध कट्टरपंथी आणि तामिळ उग्रवाद्यांव्यतिरिक्त हिंसाचाराचा आधार घेणारा एकमेव गट इस्लामी मूलतत्त्ववाद्यांचा असल्याचे लक्षात येते. रविवारी चर्चला ज्यांनी लक्ष्य केले, ते ‘इसिस’, ‘अल कायदा’ किंवा ‘नॅशनल तौहिद जमात’ यांपैकी कोणी असू शकते. अथवा तिघांच्या हातमिळवणीतूनही हा प्रकार घडलेला असू शकतो. कारण, रविवारी ख्रिस्त्यांचा ‘ईस्टर संडे’ होता आणि इस्लाम व ख्रिस्त्यांचे वैर शेकडो वर्षांपासूनचे आहे. अर्थात खरे काय ते चौकशी-तपासानंतर समोर येईल, हे एक वास्तवच!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat