न्यायव्यवस्थेवर प्रेम करणारी मेनका

    दिनांक  09-Mar-2019   न्यायदेवतेवर विश्वास असणाऱ्या, बऱ्याच सुप्रसिद्ध खटल्यांशी निगडित असलेल्या आणि सध्या सर्वोच्च न्यायालयात न्यायदानाचे कार्य करणाऱ्या मेनका गुरूस्वामी यांच्याविषयी...


शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये' अशी मराठीतील म्हण सर्वांना माहीत आहे आणि ही काही अंशी खरीही आहे. पण, यामुळे अनेकजण आपल्या हक्कांविषयी-अधिकारांविषयी आणि आपल्यासाठीच्या तरतुदींविषयी अनभिज्ञ असतात. असे असले तरी, दिवसा लाखो लोक आपल्या व्यथा घेऊन न्यायालयाची पायरी चढतातच. कारण, त्यांचा न्यायदेवतेवर विश्वास असतो आणि त्याचबरोबर त्यांच्या बाजूने शेवटपर्यंत असलेल्या वकिलावरही विश्वास असतो. अशीच एक सामान्यांसाठी काम करणारी असामान्य मेनका गुरूस्वामी. आपल्याकडे न्यायव्यवस्थेवर सर्वांचा विश्वास आहे. कारण, कोणत्याही अधिकारांपासून कोणीही वंचित राहू नये, हे आपल्या संविधानाचे मूळ. गेल्या काही वर्षांपासून अशाच एका अधिकारासाठी एका लढाईची सुरुवात झाली होती. या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावली ती मेनका गुरूस्वामी यांनी. ती लढाई होती 'कलम ३७७'च्या विरोधातली. दि. ६ सप्टेंबर, २०१८ला सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत, समलिंगी संबंधांना गुन्हा ठरविणारे भारतीय दंड संहितेचे 'कलम ३७७' सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवले. याकरिता सात पुरुषांच्या तोडीस तोड देत मेनका एकट्या लढल्या. त्यामुळेच नुकताच त्यांचा 'फोर्ब्स' या नामांकित मासिकात 'वुमन ऑफ दी इअर' या यादीत समावेश झाला. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जाहीर केलेल्या या यादीत त्या एकमेव भारतीय महिला वकील आहेत.

 

लहानपणापासून वकील होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या मेनका शाळेत मात्र बुद्धिबळ खेळण्यात जास्त रमायच्या. मात्र, बारावीनंतर त्यांना बुद्धिबळ आणि वकिली यातले एक क्षेत्र निवडण्याची वेळ आली, तेव्हा त्यांनी आपले लहाणपणीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वकिली करण्याचा निर्णय घेतला. घरात कायद्याचे शिक्षण कोणीच घेतले नसल्यामुळे त्यांना यात कोणाचे मार्गदर्शन मिळाले नाही. मात्र, वाचनाच्या आवडीमुळे त्यांनी स्वत:चा मार्ग तयार केला आणि आपल्या स्वप्नपूर्तीकडे वाटचाल करण्यास सुरुवात केली. मेनका यांच्या मते, "मी एकदा सहज आपलं संविधान वाचलं आणि मला त्याच्याविषयी विलक्षण कुतूहल वाटलं. पण, जर जगाचा आढावा घायचा असेल, तर आपल्या सीमा ओलांडाव्या लागतील, याची जाणीव मला होती. ऑक्सफर्ड विद्यापीठ हे माझं पहिलं प्रेम होतं आणि ते मिळवण्यासाठी मी माझे प्रयत्न सुरू केले. पण त्याआधी या क्षेत्रासाठी मी पात्र आहे का, हे जाणून घेणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं." कायदा आणि त्यासंबंधी माहिती जमवून मेनका यांनी बंगळुरूच्या 'नॅशनल लॉ स्कूल'मधून कला क्षेत्रात पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी तिथूनच पदवीचे शिक्षणही घेतले. काही काळ त्यांनी नवी दिल्ली आणि बंगळुरू येथे वकिलीचा सराव केला. पण, ऑक्सफर्डचे प्रेम त्यांच्या डोक्यातून जात नव्हते. अखेर त्या विद्यापीठाची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्या आणि नागरी कायद्यात त्यांना पदवी प्रदान करण्यात आली. "भारत आणि अमेरिका यांची न्यायव्यवस्था खूप वेगळी आहे. आपण जेवढा भावनांचा विचार करतो त्याबाबतीत ते कठोर असतात," असे मेनका म्हणतात. यानंतरही त्यांना मला सर्वज्ञान प्राप्त झाले पाहिजे, यासाठी हार्वर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठाची र्‍होडेसची शिष्यवृत्ती त्यांना मिळाली. ही शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या मेनका पहिल्याच भारतीय आहेत. त्या शिष्यवृत्तीच्या जोरावर त्यांनी पीएच.डीचे शिक्षणही पूर्ण केले.

 

"शिकून तर सगळं झालं होतं, पण खऱ्या आयुष्यात जेव्हा न्यायालयात उभे राहावे लागते, ती खरी सत्वपरीक्षा असते. कारण, शेवटी शेकडो लोकांचे आयुष्य तुमच्यावर अवलंबून असते," असं त्या म्हणतात. सर्वोच्च न्यायालयात वकिलीला सुरुवात करण्याआधी मेनका यांनी मानवाधिकारांसाठी संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क समितीसोबत काम केले. नेपाळच्या संविधानाचा मसुदा तयार करण्यातही त्यांचा मोलाचा वाटा होता. मात्र, आता भारतातच काम करण्यासाठी २०१५ नंतर नवी दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणून त्या कार्यरत झाल्या. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच त्यांनी '२ जी घोटाळा,' 'ऑगस्टा वेस्टलँड प्रकरण' यासारख्या 'हाय प्रोफाईल' खटल्यांवर काम केले. पण, त्यांची खरी कसोटी होती ती, 'कलम ३७७' विरोधात खटला लढणं ही. पण, या कसोटीतही त्या यशस्वीपणे उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या मते, "तुम्हाला आवडतं ते काम करावं. कारण, त्यात तुम्ही जीव ओतून काम करता. मला एक दिवसही कंटाळा येत नाही. मी आजही ८०० पानांचं पुस्तक अगदी बसल्या जागेवर वाचू शकते." वकिलीबरोबरच त्यांना असलेली वाचनाची आवड यातून दिसून येते. यामुळे त्यांनी पुस्तक लिखाणाला सुरुवात केली. त्यांनी 'फाऊंडिंग मोमेंट्स इन कॉनस्टिट्युशनलिझम' (Founding Moments in Constitutionalism) या पुस्तकाचे संपादन केले. त्या सध्या आपल्या दुसऱ्या पुस्तकावर काम करीत आहेत. याबरोबरच मेनका या कोलंबो विद्यापीठात 'नागरी कायदा' हा विषयही शिकवतात. त्यांनी नुकत्याच 'फोर्ब्स' या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत, "कलम ३७७ चा अभ्यास करताना मला पुस्तकांपेक्षा जास्त समलिंगी तरुणांशी बोलताना कळलं की, कायद्याचा अभ्यास आणि कायद्याची गरज या किती वेगळ्या गोष्टी आहेत." अशा या न्यायप्रिय मेनका यांच्या कर्तृत्वाला सलाम!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat