मुंबई : पाकिस्तानसोबत रशियाने 2.6 अब्ज डॉलर्सचा करार केल्याच्या वृत्तांना रशियाने स्पष्टपणे फेटाळून लावले आहे. तसेच, ही माहिती पूर्णतः खोटी असून भारत-रशिया मैत्रीत फूट पाडण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया रशियाने दिली आहे. यामुळे पाकिस्तानी माध्यमांच्या खोटा चेहरा जगासमोर उघड झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून काही पकिस्तानी माध्यमांकडून पाकिस्तान आणि रशिया या दोन देशांमध्ये 2.6 अब्ज डॉलर्सचा करार केल्याच्या वृत्ताला प्रसिद्धी देण्यात येत होती. या कराराच्या अंतर्गत रशिया हा कराची बंदराजवळ असणार्या 1970 सालच्या सोव्हिएत काळातील स्टील प्लांटमध्ये गुंतवणूक करणार असल्याचेही सांगण्यात आले. मात्र, असे कोणतेही करार न झाल्याचे रशियाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
भारत आणि रशिया यांचे संबंध हे दीर्घकालीन मजबूत राहिले आहेत. ’ऑपरेशन सिंदूर’नंतर तर हे संबंध अधिकच दृढ झाले होते. त्यामुळे अचानक रशियाच्या पाकिस्तानशी जवळीक साधण्याच्या बातम्यांमुळे भारतासमोरचा पेच वाढण्याची शक्यता होती. मात्र, रशियाच्या स्पष्टीकरणानंतर चित्र स्पष्ट झाले असून, पाकिस्तानचा खोटेपणा जागतिक पातळीवर पुन्हा एकदा उघडा पडला आहे.
रशिया भारताला ‘सु-57 ई’ देण्यास उत्सुक
रशियाने भारताला पुन्हा एकदा पाचव्या पिढीचे ’सु-57 ई’ खरेदी करण्याची विनंती केली आहे. यावेळी रशियाने दिलेल्या प्रस्तावात भारतीय तंत्रज्ञानाशी अनुकूलता या विमानांमध्ये करण्याची तयारीही दर्शवली आहे. या विमानांमध्ये एईएसए रडार, भारतीय हवाईदलाला हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करण्यासाठी आवश्यक स्वदेशी तंत्रज्ञान, भारतीय तंत्रज्ञानाशी सुसंगत करण्याचाही प्रस्तावात समावेश करण्यात आला आहे. तसेच, ’सु-30 एमकेआय’ तयार करणार्या भरतीय कंपन्यादेखील याची निर्मिती करू शकतात, असेही रशियाने प्रस्तावात म्हटले आहे. तसेच, भारताच्या आवश्यकतेनुसार त्यात बदल करण्याच्या अधिकारासहित, सोर्स कोड आणि तंत्रज्ञान हस्तांतरण करण्यासही रशिया तयार असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे.