शस्त्रास्त्रांच्या बाजारात...

    दिनांक  14-Mar-2019   

 

 
 
 
अंतर्गत असो वा सीमेवरील, सुरक्षा हा कोणत्याही देशासाठी कायमच कळीचा मुद्दा असतो. त्यामुळे या विषयाकडे कोणतेही देश दुर्लक्ष करीत नाहीत, मुख्यत: लष्करावर अवलंबून असणारे देश. कारण, शेवटी सुरक्षा अबाधित राहिली तरच आर्थिक प्रगती होईल. त्यामुळे सुरक्षा दलाचे आधुनिकीकरण हा सर्व देशांसाठी महत्त्वाचा मुद्दा असतो. त्यात शस्त्रास्त्रांची आयात आणि निर्यात या दोन्ही गोष्टी देशांमधील आपापसातील संबंधांवर अवलंबून असतात. सध्याच्या काळात अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, स्वीडन इत्यादी देशांमध्ये खासगी क्षेत्रात संरक्षण सामग्री बनविण्याचे कारखाने सर्वात जास्त आहेत. त्यामुळे विकसनशील आणि अविकसित देशांना तोफा, रणगाडे, पाणबुड्या, लढाऊ तसेच बॉम्बफेकी विमाने तसेच रडार हे सर्व युद्धसाहित्य या सहाच परकीय देशांकडून आयात करावे लागतात. याच संदर्भातील एक अहवाल ‘स्वीडिश थिंक टँक स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट’ यांच्या वतीने जारी करण्यात आला. या इन्स्टिट्यूटच्या वतीने दर पाच वर्षांनी जगातील महत्त्वाच्या देशांच्या शस्त्रास्त्रांच्या आयाती आणि निर्यातीचा अहवाल सादर केला जातो. यंदा जारी केलेल्या अहवालानुसार तब्बल आठ वर्षांनंतर सौदी अरेबिया हा देश २०१४-१८ या कालावधीतला सर्वात जास्त शस्त्रास्त्र आयात करणारा देश ठरला. खरंतर यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे आखाती देशांचे पाश्चिमात्त्य देशांशी असलेले चांगले संबंध आणि दुसरे कारण म्हणजे, भारताने रशियाकडून कमी केलेली शस्त्रास्त्रांची आयात. २००९-१३ आणि २०१४-१८ दरम्यान भारताची या आयातीत २४ टक्क्यांनी घट झाली आहे. भारत मुख्यत: रशिया, इटली आणि जर्मनी या तीन देशांकडून सर्वात जास्त शस्त्रसाठा आयात करतो, मात्र, शस्त्रसाठ्यासाठी लागणारा परवाना या देशांकडून भारताला मिळत नसल्यामुळे भारत शस्त्रसाठा आयातीच्या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आला. मात्र, या अहवालानुसार भारत जरी दुसऱ्या क्रमांकावर असला, तरी भारताची स्थिती विकसित देशांसारखीच आहे. त्यामुळे या क्रमवारीत जरी भारत पिछाडीवर असला तरी, युद्धजन्य परिस्थितीसाठी भारत तयार असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले.
 

तर, दुसरीकडे शस्त्रसाठा निर्यातीच्या क्रमवारीत अमेरिका आणि रशिया हे दोन देश अव्वल आहेत. एकूण व्यापारात ३५ टक्के निर्यात अमेरिका तर, २१ टक्के निर्यात रशिया करतो. या सगळ्यात शस्त्रास्त्रांच्या बाजारात सर्वात जास्त फटका बसला आहे तो, पाकिस्तानला. हे अपेक्षित असले तरी, अमेरिकेने २०१४-१८ दरम्यान निर्यात जवळजवळ ८१ टक्क्यांनी थांबवली आहे. त्यामुळे २००९-१३ नंतर पाकिस्तानची शस्त्रसाठा आयात ३९ टक्क्यांनी घटली आहे. या अहवालातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, आधीच आर्थिक डबघाईला गेलेल्या पाकिस्तानने जमावाजमव करून उधारीवर रशियाकडून लढाऊ विमानांची आयात करण्याचा घाट घातला होता, मात्र रशियाने आपले हात वर करत पाकिस्तानला निर्यात करण्याचे टाळले. त्यामुळे या अहवालानुसार, पाकिस्तानकडे ३९ टक्क्यांनी शस्त्रसाठा कमी झाला आहे, हे आता जगजाहीर आहे. त्यामुळे पाकची होत असलेली ही कोंडी पाहता, येत्या काही वर्षांत शस्त्रसाठा आयातीचा हा आकडा आणखी घसरण्याची शक्यता आहे. पाकिस्तानची परिस्थिती हलाखीची असली तरी, पाकचा जिगरी दोस्त चीन मात्र, त्यांच्या मदतीली येथेही धावून आला आहे. शस्त्रसाठा विक्री करण्यात चीनही आता अग्रेसर होत चालला आहे. ‘सीप्री’च्या अहवालानुसार, २०१४-१७ दरम्यान चीन हा पाचवा सर्वात जास्त शस्त्रसाठा निर्यात करणारा देश आहे. यासाठी चीन सर्वात जास्त शस्त्रसाठा हा बांगलादेश आणि पाकिस्तान या दोन देशांना विकतो. पाकिस्तान आणि बांगलादेश हे दोन देश चीनकडून ५३ टक्के शस्त्रसाठा आयात करतात तर, याच अहवालानुसार चीन सध्या शस्त्रसाठा निर्यातीपेक्षा शस्त्रसाठा निर्मितीवर जास्त भर देत आहे. कारण, येत्या पाच वर्षांत अमेरिकेला मागे टाकत अव्वल क्रमांक पटकाविण्याचा चीनचा बेत आहे. हा अहवाल पाहता, एकूणच सगळे देश आपले युद्धबळ वाढविण्याच्या मार्गावर आहेत, तर काही देशांची आगामी काळात आणखी कोंडी होणार आहे. एकूणच सध्याची परिस्थिती पाहता शस्त्रास्त्रांच्या बाजाराला खऱ्या अर्थाने ‘अच्छे दिन’ आले आहेत, असेच म्हणावे लागेल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat