एक ‘मॅगी’ अशीही!

    दिनांक  24-Feb-2019   

 


 
 
 
स्थानिक व आंतरराष्ट्रीय देणग्यांतून मॅगीने अनाथाश्रमाची सुरुवात केली. सुरुवातीला ३० अनाथांचा आधार बनलेल्या मॅगीने पाहता पाहता ३५० अनाथमुलांना अन्न, वस्त्र, शिक्षण व निवारा मिळवून दिला.
 

माणूस हा बुद्धिजीवी प्राणी आहे. तो आपल्या बुद्धीच्या, शारीरिक ताकदीच्या आणि स्वकर्तृत्वाच्या बळावर जगात आमूलाग्र बदल घडवून आणू शकतो. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मॅगी डॉइन! ३५ वर्षीय मॅगीने आपले आयुष्य समर्पित करून नेपाळमधील अनेक अनाथ मुलांचे जीवन मार्गी लावलेन्यू जर्सीमध्ये राहणाऱ्या मॅगी डॉइन या १८ वर्षीय मुलीने २००५ मध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. हायस्कूलमधून नुकत्याच पदवीधर झालेल्या मॅगीने, आयुष्याच्या या नाजूक वळणावर जगभ्रमंती करण्याचा निर्णय घेतला. मॅगी यापूर्वी कधीच न्यू जर्सीच्या बाहेर पडली नव्हती. दुसरा कोणताही देश तिने याआधी कधीच पाहिला नव्हता. पण मॅगीच्या मनाच्या कोपऱ्यात दडून बसलेली प्रबळ इच्छाशक्ती तिला घराबाहेर पडण्यास सांगत होती. चार भिंतीच्या पलीकडे असलेले जग मॅगीला स्वस्थ बसू देत नव्हते.

 

बाहेरचे जग तिला खुणावत होते. मोजकेच सामान आणि आई-वडिलांचा निरोप घेऊन मॅगी जगभ्रमंतीला निघाली. सर्वात आधी तिने आशिया खंड पाहण्याचे ठरवले आणि ती नेपाळमध्ये आली. भारत आणि चीन या दोघांच्या दरम्यान वसलेला ‘नेपाळ’ हा देश. नेपाळमध्ये फिरत असताना मॅगीची नजर एका लहान मुलीवर पडली. ‘लौकरा’ असे या मुलीचे नाव होते. पाठीवर ओझे घेऊन ती टेकडीवर चढत होती. लौकरा दिवसभर टेकडीवर खाली-वर ओझे वाहण्याचे काम करायची. या कामासाठी तिला रोज जेमतेम ८० रुपये मजुरी मिळायची. त्यातून ती आठ वर्षांची चिमुरडी आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करायची. तिची ही अवस्था पाहून मॅगीचे मन खिन्न झालेआपण मानव जातीने असे काय दुष्कृत्य केले आहे की, त्याची फळे आपल्या पुढच्या पिढीला अशाप्रकारे भोगावी लागत आहेत,’ असा विचार मॅगीच्या मनात आला. यानंतर अवांतर वाचनादरम्यान मॅगीला एक गोष्ट आढळून आली की, जगात आठ कोटी लहान मुले लौकरासारखे आयुष्य जगत आहेत. हा आकडा पाहून मॅगीचे मन अजून खिन्न झाले. त्यानंतर नेपाळमध्ये असतानाच आणखी एक लहान मुलगी मॅगीच्या नजरेस पडली. हिमा असे या सात वर्षीय मुलीचे नाव होते. हिमा नेहमी मॅगीकडे पाहून स्मितहास्य करायची. हात जोडून हिमा मॅगीला दररोज ‘नमस्ते दीदी’ म्हणायची. हिमाचे ते बोलके डोळे मॅगीला बरेच काही सांगून जायचे.

 

मॅगीने स्वत:च्या मनाशी विचार केला, ‘मॅगी, तू त्या आठ कोटी मुलांचा विचार करणे सोडून दे. पण जर तू या हिमाला मदत केलीस, तर एक नवी सुरुवात होईल.’ मनाशी दृढ निश्चय करून मॅगीने हिमाच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली. तिला नेपाळमधील एका स्थानिक शाळेत दाखला मिळवून दिला. एवढेच नव्हे, तर मॅगीने हिमाच्या अभ्यासातील प्रगतीवरही लक्ष ठेवले. हिमाची मदत करताना मॅगी अवघ्या १८ वर्षांची होती. पण तिने जग बदलण्याची तयारी दाखवली. हिमाचे शिक्षण सुरू झाले. पण मॅगी यामुळे संतुष्ट नव्हती. कारण, नेपाळमध्ये अंतर्गत यादवीमुळे घरदार उद्ध्वस्त झालेली अनेक लहान मुले मॅगीला दिसत होती. त्या लहानग्यांना राहायला डोक्यावर छप्परही नव्हते. खाण्यापिण्याची आबाळ तर होतीच पण, पाठीवरून मायेचा हात फिरवणारे कुटुंबातील सदस्यही नव्हते. अशी अनेक अनाथ मुले मॅगीच्या दृष्टीस पडलीपुढे तिला नेपाळमध्ये एक जागा सापडली आणि मॅगीच्या मनात एक कल्पना आली. तिने न्यू जर्सीत राहणाऱ्या आपल्या आई-वडिलांना फोन करून काही पैसे मागवले. मॅगीच्या पालकांनीही पाच हजार डॉलर्स पाठवून दिले. हे पैसे मॅगीने आपल्या बालपणीपासून पाळणाघर करून साठवले होते. जणू काही ही तिच्या आयुष्याची जमापुंजीच होती. या पैशांतून तिने नेपाळच्या कोपिला व्हॅलीमधील जागा विकत घेतली. आपल्या जीवनातील ही पहिली संपत्ती मॅगीने सत्कारणी लावली. स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय देणग्यांमधून मिळवलेल्या निधीतून मॅगीने अनाथाश्रमाची सुरुवात केली. सुरुवातीला ३० अनाथांचा आधार बनलेल्या मॅगीने पाहता पाहता ३५० अनाथ मुलांना अन्न, वस्त्र, शिक्षण आणि निवारा मिळवून दिला.

 

मॅगीने मदत केलेल्या अनाथांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. ‘या परिसरात एकही लहान मूल मला खडी फोडताना दिसता नये,’ हे ध्येय मॅगी आपल्या उराशी बाळगून होती. “शिक्षणाने फक्त माणूसच नव्हे, तर एक चांगला समाज घडवता येतो. मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते की, मला या अनाथाश्रमाच्या रूपाने जीवंतपणीच माझा स्वर्ग निर्माण करता आला. आपल्याजवळ काय नाही? याचा विचार करून, माणूस नेहमीच रडत असतो, पण आपल्याजवळ काय आहे, याचा विचार तो करत नाही. मन, बुद्धी आणि शारीरिक बळाच्या जोरावर, माणूस अशक्यातील अशक्य गोष्टही साध्य करू शकतो. आयुष्यात जे काही करायचे आहे, ते आता करा. आली घडी आपुली साधा, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की तुम्ही काहीही करू शकता,” असा संदेश मॅगी सर्वांना देते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/आणिtwitter.com/MTarunBharat