अश्वत्थाम्याचा मणी

    दिनांक  18-Dec-2019 20:29:29
|


asf_1  H x W: 0


अर्जुनाने एका निमिषार्धात ब्रह्मशीर्ष अस्त्र मंत्रोच्चार करून अश्वत्थाम्यावर सोडले. आता आकाशात दोन दोन ब्रह्मशीर्ष अस्त्रे दिसत होती. दोन ज्वाळा संहार करण्यासाठी उफाळल्या. त्या दोन अस्त्रांच्या शक्तीमुळे नद्या व सागर कोरडे पडू लागले. सर्व जग थरथर कापू लागले.


भीमाने अश्वत्थाम्याला युद्धाचे आव्हान दिले. त्याच्याकडे पाहून अश्वत्थामा क्षीणसा हसला. तो अतिशय कू्रर व एखाद्या फासेपारध्यासारखा दिसत होता. त्याने भीषण हास्य करीत समोरील गवतातून एक पाते हातात घेतले. ब्रह्मशीर्ष नावाच्या अस्त्राला आवाहन केले. ते भीम आणि अर्जुन यांच्यावरती सोडले. त्यावेळी, "या जगातून पांडव नष्ट होवोत," अशी शापवाणी त्याने उच्चारली. त्या गवताच्या काडीतून गडद काळा धूर निघू लागला व पाठोपाठ महाभयंकर ज्वाळा त्यातून उफाळून वर आल्या. त्या ज्वाळा भीम आणि अर्जुन यांच्याकडे झेपावू लागल्या. श्रीकृष्ण हे सारे बघत होता. त्याने सांगितलेले भाकीत खरे ठरले. अश्वत्थाम्याने ब्रह्मशीर्ष अस्त्राचा प्रयोग पांडवांचा नाश करण्यासाठी केला. तो म्हणाला, "अर्जुना, बघ अश्वत्थामा काय करतोय ते, त्याने ब्रह्मशीर्ष अस्त्राला आव्हान केले आहे. तेच अस्त्र तुझ्याकडे पण आहे. तुझे गुरू द्रोण यांना जेव्हा तू मगरीपासून वाचवलेस, त्यावेळी प्रसन्न होऊन त्यांनी हे अस्त्र तुला पण शिकवले आहे. तुला जर स्वतःचा आणि आपल्या भावांचा जीव वाचवायचा असेल तर तो क्षण आत्ताच आहे. ते अस्त्र अजिबात वेळ न काढता अश्वत्थाम्यावर सोड. ते बघ, त्याने सोडलेले अस्त्र तुझ्याच दिशेने आले."

 

अर्जुनाने एका निमिषार्धात ब्रह्मशीर्ष अस्त्र मंत्रोच्चार करून अश्वत्थाम्यावर सोडले. आता आकाशात दोन दोन ब्रह्मशीर्ष अस्त्रे दिसत होती. दोन ज्वाळा संहार करण्यासाठी उफाळल्या. त्या दोन अस्त्रांच्या शक्तीमुळे नद्या व सागर कोरडे पडू लागले. सर्व जग थरथर कापू लागले. जणू काही महाप्रलयच आला आहे. पर्वत कागदासारखे हलू लागले. त्या अस्त्रांना थोपविण्यासाठी महर्षी व्यास आणि नारद पुढे आले. मध्ये येऊन त्या दोघांनी ही दोन अस्त्रे थांबवली. ती जर एकमेकांवर आदळली असती तर या जगाचाच अंत होणार होता. या दोन्ही महर्षींच्या तपोबलाने ही अस्त्रे थांबली. त्यांच्या सांगण्यावरून अर्जुनाने ब्रह्मशीर्ष अस्त्र मागे घेण्याचे धाडस केले. तेही सोपे नव्हते, परंतु अर्जुनाजवळ पण तप:सामर्थ्य होते, म्हणून ते जमले. अश्वत्थाम्याला मात्र ते अस्त्र मागे घेता येईना. तो महापापी होता, त्यामुळे ते अस्त्र त्याची आज्ञा मानतच नव्हते. तो खूप घाबरून दोन्ही महर्षींच्या हातापाया पडला व म्हणाला, "मी महापापी आहे, मला हे अस्त्र मागे घेणे अशक्यप्राय आहे. ते अस्त्र माझ्यावर क्रुद्ध झाले आहे. आता काय करायचे, तेही मला कळत नाहीय. कृपा करून मला या अस्त्रापासून वाचवा."

 

दोन्ही ऋषी म्हणाले, "तूच दुष्टपणाने वागलास. आता या अस्त्रावर जर दुसरे अस्त्र पडले तर त्या ठिकाणी पुढील बारा वर्षे पाऊस पडणार नाही, पिके येणार नाहीत, म्हणूनच तू पाहिले की अर्जुनाने दुसरे कोणतेही अस्त्र न वापरता हे अस्त्र मंत्राने मागे घेतले. आता तू तुझ्या मस्तकावरला मणी पांडवांना देऊन टाक. त्यांच्याविषयी दया दाखव आणि हे अस्त्र मागे बोलाव." परंतु, अश्वत्थाम्याला हे त्यांचे बोलणे आवडले नाही. तो म्हणाला, "हे रत्न मी देणार नाही. ते अतिशय मूल्यवान असे रत्न आहे. त्याच्यामुळेच मला अस्त्र, शस्त्र, रोग, भूक यांपैकी कशाचीही बाधा होत नाही. ते मी कसे देऊन टाकू? फार तर हे मी त्यांच्या स्त्रियांच्या गर्भावरती सोडतो." अश्वत्थाम्याला माहिती होते की, अभिमन्यूची पत्नी उत्तरा ही गरोदर आहे. तिच्या गर्भावरती त्याने हे अस्त्र सोडले. हे बघून श्रीकृष्ण खूपच संतापला. तो म्हणाला, "या जगात तू सर्वात तिरस्करणीय व्यक्ती आहेस. मी त्या गर्भाला पुनर्जन्म देईन. तू हे पाहशील की, तोच या जगावर पुष्कळ काळ राज्य करेल. तू तर चिरंजीवी आहेस. तुला शाश्वत काळ जगणं, हा आता शापच आहे, असे वाटेल. तू या पृथ्वीवर एकटा, निराधार, वेदनामय असे आयुष्य भोगशील." शेवटी अश्वत्थाम्याला त्या रत्नाचा त्याग करायला भाग पाडले. तो जखमी अवस्थेत रानावनात भटकू लागला. शिरावरून ते रत्न ओढून काढल्यामुळे त्याला खूप खोल जखमा झाल्या व डोक्यातून रक्त वाहू लागले. आक्रोश करत तो रानीवनी भटकू लागला.

 

राजा धृतराष्ट्र तर दु:खात बुडून गेला होता. व्यास महर्षींनी त्याचे सांत्वन केले व त्याला सांगितले, "रणांगणावर त्याच्या पुत्रांचे मृतदेह विखरून पडलेले आहेत. त्यांचे और्ध्वदैहिक कार्य करणे आवश्यक आहे. धार्मिक विधीसाठी ते देह नगरात आणावे. मग राजा धृतराष्ट्र, गांधारी आणि त्यांच्या सुना-लेकी आपल्या आप्तांचे मृतदेह आणण्यासाठी कुरुक्षेत्री गेल्या. त्या स्त्रियांनी आपले केस मोकळे सोडले होते व त्या आक्रोश करून रस्त्याने रडत चालल्या होत्या. विदुरांना आठवण झाली, जेव्हा द्रौपदी व पांडवांना चौदा वर्षांचा वनवास सांगितला गेला, तेव्हा द्रौपदी अशीच केस मोकळे सोडून रस्त्यावरून जात होती व आक्रोश करत होती. तेव्हा द्रौपदीने, "हे असेच तुमचेही होईल," असे भविष्य वर्तविले होते. भीमाने अश्वत्थाम्याकडून आणलेले रत्न द्रौपदीला दिले, तेव्हा तिचा आत्मा थोडा शांत झाला. तिचे दु:ख थोडे शमले. तिने ते रत्न युधिष्ठिराकडे दिले. तिला समाधान व्हावे म्हणून त्याने ते स्वीकारले.

- सुरेश कुळकर्णी