शिवसमर्थ योग

    दिनांक  27-Nov-2019 21:03:03
|अखेरीस शिवाजी महाराज माहुलीला आले असताना त्यांची एका समर्थशिष्याशी गाठ पडली आणि त्या शिष्याने रामदास स्वामींकडून शिवाजी महाराजांसाठी आणलेले एक पत्र त्यांना दिले. त्या पत्रातून समर्थांनी शिवाजी महाराजांचे अप्रतिम वर्णन केले आहे. त्या पत्रानंतर आजतागायत सुमारे ३५० वर्षांमध्ये अनेक अभ्यासकांनी, प्रतिभावंतांनी, कवींनी, शाहिरांनी शिवाजी महाराजांचे वर्णन केले आहे.


शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केल्याच्या बातम्या व त्यासाठी गड-किल्ले सर करीत असल्याच्या बातम्या महतांकरवी रामदास स्वामींपर्यंत पोहोचत होत्या. तशातच विजापूर दरबाराने शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवलेल्या फत्तेखानाचा महाराजांनी बिमोड करून खानला पळता भुई थोडी केल्याची बातमी रामदासांपर्यंत आली, तेव्हा स्वामींना नक्कीच आनंद झाला असणार. त्याचप्रमाणे रामदासस्वामींनी मसूर, चाफळ येथे मोठे धाडस दाखवून रामजन्मोत्सव साजरा करून त्यासाठी हिंदू समाज धार्मिक व सात्त्विक पातळीवर एकत्र आणला आणि जागोजागी मारुतीची मंदिरे स्थापून लोकांना बलोपासना शिकवली. या सर्व कार्यांचे वृत्तांत हेरांकरवी शिवाजी महाराजांपर्यंत येत होते, हे आपण मागील लेखात पाहिले. शिवाजी महाराजांचे राजकारण धर्मरक्षणासाठी होते, यात शंका नाही. शिवाजी महाराजांच्या राजकीय हालचालींच्या धावपळीत त्यांच्याही मनात रामदासस्वामींना भेटण्याची इच्छा होती, हे स्वाभाविक म्हणता येईल. समर्थ वाड्मयाचे गाढे अभ्यासक ल. रा. पांगारकर लिहितात, "स्वामीदर्शन व अनुग्रह झाल्याशिवाय शिवाजी महाराजांना चैन पडेना. शिवाजी महाराजांनी देवीसन्निध वैशाख शुद्ध ४ मंदवारी उपोषण करून निद्रा केली असता प्रात:समयी महाराजांना स्वप्नात स्वामींचे दर्शन झाले. स्वामींनी महाराजांच्या मस्तकी हात ठेवून नंतर आलिंगन दिले व बोलले, 'इतके दिवस तुमच्या राज्यात असून आमचा समाचार घेतला नाही. आपण धर्मस्थापना व देवाब्राह्मणांचे रक्षण करावे, अशी श्रींची आज्ञा आहे. तुळजाभवानीला आपल्या विषयी अभिमान आहेच. उच्छेद झालेल्या धर्माची आपण पुनर्स्थापना करण्यासाठी राज्यकारभार करीत आहात, तोच पुढे चालवावा." बखरीचा संदर्भ देत पांगारकरांनी जे लिहिले ते सविस्तरपणे यासाठी मांडले की, त्यावरून शिवाजी महाराज व समर्थ यांच्यातील आत्मीयता व दोघांच्या विचारांची एक दिशा समजण्यासाठी!

 

वास्तविक पाहता आपल्या कार्यासाठी कृष्णातीरी येण्यापूर्वी रामदासांची शहाजीराजांशी बंगळुरूला भेट झाली होती. आपल्या मनीच्या स्वराज्य व धर्मकार्यासंबधी शहाजीराजांशी विचारविनियम करून रामदासस्वामींनी कृष्णातीरी येऊन आपल्या कार्यारंभास सुरुवात केली होती. शहाजीराजांच्या देशमुखीतील चाफळ, मसूर, उंब्रज या परिसरात स्वामींनी लोकांना रामोपसेनेला लावून हिंदू समाज एकत्र आणायला सुरुवात केली होतीतसेच याच परिसरात स्वामींनी ११ मारुतींची स्थापना करून लोकांना बलोपासनेचा उपदेश देण्यास सुरुवात केली. स्वामींच्या मनात हे कार्य संपूर्ण हिंदुस्तानमध्ये पसरवायचे होते. शहाजीराजांच्या देशमुखीच्या या परिसरात राहिल्याने पुढे शिवाजी महाराजांना पाठवलेल्या पत्रात स्वामी सहजपणे लिहून जातात की, 'तुमचे देशी वास्तव्य केले. परंतु, वर्तमान नाही घेतले.' शिवाजी महाराजांना मागे उल्लेखिल्याप्रमाणे, वैशाख शुद्ध ४ शनिवारी स्वामींचे जे स्वप्नात दर्शन झाले व उपदेश ऐकला, त्यामुळे स्वामींच्या भेटीसाठीं शिवाजी महाराजांना ओढ लागली. महाराज प्रथम चाफळला गेले. तेथे समर्थांची भेट झाली नाही म्हणून ते महाबळेश्वरला आले. जवळपासच्या घळीतून रामदासांचा शोध घेणे कठीण होते. अखेरीस शिवाजी महाराज माहुलीला आले असताना त्यांची एका समर्थशिष्याशी गाठ पडली आणि त्या शिष्याने रामदास स्वामींकडून शिवाजी महाराजांसाठी आणलेले एक पत्र त्यांना दिले. त्या पत्रातून समर्थांनी शिवाजी महाराजांचे अप्रतिम वर्णन केले आहे. त्या पत्रानंतर आजतागायत सुमारे ३५० वर्षांमध्ये अनेक अभ्यासकांनी, प्रतिभावंतांनी, कवींनी, शाहिरांनी शिवाजी महाराजांचे वर्णन केले आहे. पण, रामदास स्वामींनी पत्रात जे महाराजांचे शब्दचित्र रेखाटले आहे, त्याची सर कशालाही येणार नाही. इतके ते अप्रतिम आहे. शिवाय त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. त्या ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या पत्रातील काही भाग पाहा -

 

निश्चयाचा महामेरु ।

बहुत जनांसी आधारु।

अखंड स्थितीचा निर्धारु ।

श्रीमंत योगी॥

परोपकाराचिया राशी ।

अखंड घडती जयासी ।

तयाचे गुणमहत्त्वासी ।

तुळणा कैंची॥

नरपति हयपति गजपति ।

गडपति भूपति जळपति।

पुरंदर आणि छत्रपति ।

शक्ति पृष्ठ भागी ॥

यशवंत कीर्तिवंत ।

सामर्थ्यवंत वरदवंत।

पुण्यवंत नीतिवंत ।

जाणता राजा ॥

आचारशील विचारशील ।

दानशील धर्मशील ।

सूज्ञपणे सुशील । सकळांठायी ॥

तीर्थक्षेत्र मोडिली ।

ब्राह्मणस्थाने भ्रष्ट जाली।

सकळ पृथ्वी आंदोळली । धर्म गेला ॥

या भूमंडलाचे ठायी ।

धर्म रक्षी ऐसा नाही ।

महाराष्ट्र धर्म राहिला काही। तुम्हांकरिता॥

कित्येक दुष्ट संहारिले । कित्येकांस धाक सुटले ।

कित्येकांस आश्रय जाले । शिवकल्याण राजा ॥

तुमचे देशी वास्तव्य केले ।

परंतु वर्तमान नाही घेतले ।

ऋणानुबंधे विस्मरण जाले ।

काय नेणू ॥

 

वरील प्रकारचे पत्र रामदासांनी आपल्या मनातील भाव सरळरीतीने व्यक्त करण्यासाठी लिहिलेले आहे. स्वामींचे पत्र मिळताच शिवाजी महाराजांनी उत्तर पाठवले की, '.... आपल्या दर्शनाची इच्छा धरून येत आहे.' दुसर्‍या दिवशी मुजुमदार, बाळाजी आवजी, चिटणीस अशा निवडक मंडळींना सोबत घेऊन शिवाजी महाराज प्रथम चाफळला आले. तेथे रामाचे दर्शन घेतले. रामदासस्वामी शिंगणवाडीला आहेत, असे समल्यावर दिवाकरभट गोसावी यांना सोबत घेऊन महाराज शिंगणवाडीला आले. रामदासांचा मुक्काम तेथील बागेत होता. स्वामी त्यावेळी उंबराखाली बसून शिष्यास दासबोधाचा मजकूर सांगत होते. दिवाकरभट शिवाजी महाराजांना घेऊन आले. त्यापूर्वीच शिवाजी महाराजांचे पत्र मिळाले होते. कल्याणस्वामींनी ते रामदासस्वामींना वाचून दाखवले होते. त्यामुळे शिवाजी महाराजांची नजरानजर होताच रामदासस्वामी म्हणाले, "तुमचे पत्र व तुम्ही एकदम आलात." अनुग्रह मिळण्याची विनंती केल्यावर रामदास स्वामींनी 'श्रीराम जय राम जय जय राम' हा त्रयोदशाक्षरी मंत्र सांगून अनुग्रह दिला व आत्म-अनात्म विचार सांगितला. तो दासबोधात नंतर तेराव्या दशकात सहाव्या समासात 'लघुबोध निरुपण' या नावे समाविष्ट केल्याचे सांगितले जाते. शिंगणवाडीच्या या शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांच्या भेटीसंबंधी अभ्यासकांमध्ये एकमत नाही. त्यासंबंधीची चर्चा पुढे येईल. तूर्त ही भेट खरी समजून त्याचा पुढील भाग पाहू. शिवाजी महाराज निघताना स्वामींनी प्रसाद म्हणून श्रीफळ, मूठभर माती, दोन मुठी लीद व चार मुठी खडे शिवाजी महाराजांना दिले. रामदास स्वामींनी दिलेल्या या प्रसादाचे गूढ व सांकेतिकता बरोबरच्या मंडळींना समजली नाही, पण शिवाजी महाराज ते मनोमनी समजले आणि त्याचा त्यांना आनंद झाला. नंतर जिजाबाईंनी या प्रसादाचा अर्थ काय, असे विचारल्यावरुन शिवाजी महाराजांनी तो स्पष्ट केला. ते आईला म्हणाले, "हा प्रसाद अलौकिक आहे. नारळ माझ्या कल्याणार्थ मिळाला. माती दिली म्हणजे त्या योगे पृथ्वी प्राप्त होऊन राज्य वाढेल. खडे दिले त्यावरून गड किल्ले ताब्यात राहतील. लीद दिली त्यावरून घोड्यांचे पुष्कळ पागे मालकीचे राहतील. असे समर्थांनी सुचवले आहे." असा सांकेतिक प्रसाद देणारे व त्याचे गूढार्थ समजणारे दोघेही खरे प्रज्ञावान.

 

- सुरेश जाखडी