शांतिवन - वंचितांचा आधारवड

    दिनांक  10-Jul-2018   


 


सुरवातीला पत्र्यांच्या शेड पासून सुरू झालेल्या या संस्थेकडे आज स्वत:च्या सात इमारती आहेत. त्यांचे विद्यार्थी डॉक्टर, वकील, इंजिनियर आदी क्षेत्रात कार्यरत आहेत शिक्षण घेत आहेत. ज्यांच्या पिढ्यानी कधी शाळेची पायरी चढली नाही आशा घरातील मुलं इंग्रजी बोलू लागली वाचू लागली आहेत.

 

बीड... महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांपैकी एक जिल्हा. दुष्काळामुळे शेती असूनही नसल्यासारखीच, त्यामुळे गरिबी पाचवीला पूजलेलीच. पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ऊसतोडणीची कामे करणे हा जिल्ह्यातील प्रमुख व्यवसाय. त्यासाठी महाराष्ट्रभर भटकंती ओघाने आलीच. मग त्यामुळे ना शिक्षण, ना नोकरी, ना व्यवसाय, ना शेती. सगळ्याचीच भ्रांत. त्यामुळे पिढ्यान्पिढ्या सक्तीची मजुरीच... या परिस्थितीची जाणीव दीपक नागरगोजे या अवलियाला लहानपणापासून होती. कारण, ते या परिस्थितीत वाढल्यामुळे, किमान पुढची पिढी शिकली पाहिजे, वंचितांना शिक्षण मिळाले पाहिजे, त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण फुलविले पाहिजेत, म्हणून आपण काहीतरी प्रयत्न करायला हवेत, हा दृढ निश्चयातून ‘शांतिवन’च्या कार्याची सुरुवात झाली.

 

दीपक नागरगोजे हे बीड जिल्ह्यातील चुंबळी या गावचे रहिवासी. १९९५ साली अकरावीत शिकत असताना त्यांनी बाबा आमटे यांच्या सोमनाथ प्रकल्पावर आयोजित श्रमसंस्कार शिबिरात सहभाग घेतला होता. याच शिबिरातून त्यांनी वंचितांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेल्या निश्चयाला बळ मिळाले. कारण, आयुष्यात नोकरी न करता सामाजिक कार्याला पूर्णवेळ वाहून घ्यायचे, असा निर्धार त्यांनी याच शिबिरानंतर पक्का केला. त्यांनी आपले शिक्षण डी.एड.पर्यंत पूर्ण केले. यानंतर मात्र त्यांनी नोकरी न करता शिक्षणाला रामराम ठोकून स्वत:ला समाजकार्यात झोकून दिले. २००० मध्ये त्यांचा कावेरी यांच्याशी विवाह झाला. योगायोगाने कावेरी यांनाही समाजकार्याची आवड होती. कावेरी यांचे घराणे सैन्याशी निगडित. त्यामुळे अंगात देशसेवा, समाजसेवा ठासून भरलेली होती. त्याचबरोबर ऊसतोड कामगारांचे आणि त्यांच्या मुलांचे होणारे हाल त्यांनीही लहानपणापासून पाहिले होते. दीपक यांनी कावेरी यांना विश्वासात घेऊन ‘शांतिवन’ची कल्पना बोलून दाखवली. कावेरी यांनी आपल्या पतीला साथ देण्याचे तसेच त्यांच्या स्वप्नात झोकून देण्याचे ठरवले. त्यामुळे दीपक यांना त्यांच्या कार्यासाठी आणि स्वप्नांसाठी दुप्पट बळ आणि प्रेरणा मिळाली.

 

 
 

२७ नोव्हेंबर २००० साली या दाम्पत्याने बीडच्या शिरूर तालुक्यातील आर्वी या लहान गावात स्वतःच्या वडिलोपार्जित आठ एकर जमिनीवर ‘शांतिवन’ सुरू केले. उसतोड कामगारांची परवड, कामांसाठी होणारी स्थलांतरे, आर्थिक स्थिती आणि परिस्थिती यामुळे या कामगारांच्या मुलांचे शिक्षण अर्ध्यावर थांबत असे. सर्वप्रथम अशा मुलांच्या शिक्षणावर या दाम्पत्याने आपले लक्ष केंद्रीत केले. ‘शांतिवन’मध्ये साध्या पत्र्याची शेड उभारून शिक्षणापासून वंचित असणाऱ्या मुलांसाठी शाळा सुरु केली. ऊस कामगारांच्या मुलांसाठी असणाऱ्या या शाळेचा विस्तार उत्तरोत्तर वाढतच गेला. समाजातील निराधार, वंचित, वेश्या व्यवसाय करणाऱ्यांची तसेच तमाशात काम करणारे, एड्सबाधित, देवदासी महिला यांच्या मुलांसाठी या शाळेची दारे खुली होऊ लागली. येणाऱ्या मुलांची संख्या वाढू लागली. मुलांच्या शिक्षणाचा राहण्या-जेवण्याचा खर्च मोठा होता. त्यामुळे आर्थिक चणचण जाणवू लागली. प्रसंगी कर्ज काढून, जमीन व दागिने विकून पैसे उभा केला. हळूहळू दात्यांची मदत मिळत गेली आणि कामाची गतीदेखील वाढली. विद्यार्थी संख्या वाढल्याने ‘शांतिवन’ प्रकल्पातच त्यांनी ‘सरस्वती साधना विद्यामंदिर’ हे प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुरु केले. महाराष्ट्र शासनाकडून त्याला विनाअनुदानित म्हणून मान्यता मिळाली. सुरुवातीला पत्र्याच्या शेडपासून सुरू झालेल्या या संस्थेकडे आज स्वत:च्या सात इमारती आहेत. त्यांचे विद्यार्थी डॉक्टर, वकील, इंजिनिअर आदी क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच काही उच्च शिक्षण घेत आहेत. ज्यांच्या पिढ्यांनी कधी शाळेची पायरी चढली नव्हती, अशा घरातली मुले इंग्रजी बोलू लागली आणि वाचू लागली.

 

 
 

त्याचबरोबर ‘शांतिवन’ने महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले. त्यांच्या ‘नारी निकेतन’ या प्रकल्पात निराधार महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत एकूण २७ महिलांना त्यांनी स्वतःच्या पायावर उभे केले आहे. त्याचबरोबर मागील वर्षी ११ शेतकऱ्यांना मोफत तर यावर्षी ३० शेतकऱ्यांना ५० टक्के मदत करून शेततळी उभारून गटशेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला. कायमस्वरूपी चिंताग्रस्त असणाऱ्या या शेतकऱ्यांच्या आयुष्यात ‘शांतिवन’ने जगण्याच्या आशा पल्लवित केल्या. आज या शेततळ्यांमध्ये जवळ जवळ पाच कोटी लीटर पाणी साठते. यामुळे संस्थेचा दरवर्षी होणारा पाच लाख रुपये खर्च वाचला व सोबत संस्थेला व शेतकऱ्यांना लाखोंचे उत्पादन मिळू लागले.

 

आता या ठिकाणी पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेणारे एक हजार विद्यार्थी, १९ महिला, तीनशेपेक्षा जास्त निवासी विद्यार्थी आणि २२ कार्यकर्ते या संस्थेत आहेत. लवकरच ही संस्था बारावीपर्यंत शाळा सुरू करणार असून, काही व्यावसायिक प्रकल्पही हाती घेणार आहे. यासोबतच ‘शांतिवन’मधील तरूण मुलांच्या विवाहाविषयी संस्था प्रयत्नशील असून, आतापर्यंत तीन अनाथ मुलींचे विवाह संस्थेने लावून दिले आहेत. दीपक व कावेरी नागरगोजे यांनी वडिलोपार्जित जमिनीवर सुरू केलेली ही संस्था, अनेक कठीण प्रसंगांना तोंड देऊन, प्रसंगी कर्ज काढून, जमीन व दागिने विकून पैसे उभे करून, आपले समाजसेवेचे कार्य अव्याहतपणे चालवत आहे. म्हणूनच त्यांच्या कार्याचे करावे तेवढे कौतुक कमीच ठरते...!

- विजय डोळे