कच्छच्या रणातील शूरवीर पागी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jun-2018   
Total Views |
रणछोडदास पागी हे वास्तविक सैनिक नव्हेत, पण सैनिकाइतकीच शूरता, चातुर्य आणि प्रखर देशभक्ती असलेले. स्वातंत्र्यानंतरच्या भारत-पाक युद्धांमध्ये अविस्मरणीय कामगिरी बजावलेले!

 

माणूस किती जगला त्याच्यापेक्षा कसा जगला हे जास्त महत्त्वाचं असतं. काही माणसं अल्पायुषी असतात, पण त्यांचं कर्तृत्व चिरकाल टिकणारं असतं. पण अशीही काही माणसं असतात, ज्यांचं कर्तृत्व अफाट असतंच, पण देव त्यांना प्रदीर्घ आयुष्यही देतो. अशाच दुर्मीळ व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे रणछोडदास पागी. रणछोडदास पागी हे वास्तविक सैनिक नव्हेत, पण सैनिकाइतकीच शूरता, चातुर्य आणि प्रखर देशभक्ती असलेले. स्वातंत्र्यानंतरच्या भारत-पाक युद्धांमध्ये अविस्मरणीय कामगिरी बजावलेले! सैनिकाला दीर्घायुष्याची स्वप्न बाळगण्याची संधीच नसते. मरायची तयारी ठेवूनच त्याला रणांगणावर जावं लागतं, पण अंगात अफाट शौर्य आणि प्रखर देशभक्ती असणाऱ्या रणछोडदास यांच्याकडून भारताची जास्तीत जास्त सेवा घडावी, अशी परमेश्वराची इच्छा असावी कदाचित... म्हणूनच परमेश्वराने रणछोडदास यांना तब्बल ११२ वर्षांचं प्रदीर्घ आयुष्य दिलं. १९०१ साली जन्मलेले रणछोडदास पागी २०१३ साली वयाच्या ११२ व्या वर्षी निवर्तले.

 

रणछोडदास पागी यांना ‘सैन्य स्वयंसेवक’ म्हणायला हरकत नाही. पाकिस्तानविरोधी लढायांमध्ये भारतीय सैन्याला लागेल ती मदत करणारे ते एक सर्वसामान्य माणूस होते. एका सर्वसामान्य गुराखी कुटुंबात जन्मलेले रणछोडदास सुरुवातीला काही वर्षे पोलीस खात्यात मार्गदर्शक म्हणून काम करत होते. नंतर भारतीय सैन्यदलाने एक मदतनीस म्हणून त्यांना सैन्यात घेतलं. भारतीय सैन्यात त्यांना नियुक्त करण्यामागे काही खास असं कारण होतं. तो काळ १९६५ च्या सुमाराचा होता. वायव्य सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती कळसाला पोहोचल्या होत्या. कच्छचे रण ही युद्धभूमी झाली होती. भारतीय सैन्य पाकिस्तानी आक्रमणांशी निकराचा लढा देत होतं. रणछोडदास हे त्यावेळी एक सामान्य गुराखीच होते. मात्र, त्यांचं टेहळणीचं कौशल्य अफाट होतं. कच्छच्या रणातले एकूण एक रस्ते, चोरवाटा, पाणीसाठे, अन्नसाठे, पाकिस्तानचे घुसखोरीचे मार्ग यांची त्यांना इथ्यंभूत माहिती होती. ही सर्व माहिती ते तिथल्या पोलिसांना आणि सैनिकांना द्यायचे. केवळ पायांच्या ठशांवरून ते दहशतवाद्यांच्या हालचाली अचूक ओळखायचे. पाकिस्तानशी योजनापूर्वक लढा देण्यासाठी सैनिकांना रणछोडदास यांची अत्यंत मोलाची मदत होती.

 

१९६५ च्या भारत-पाक युद्धात कच्छच्या विद्याकोट सीमेवर पाकिस्तानी सैनिकांनी हल्ला केला. त्या भागात युद्ध भडकून १०० भारतीय जवानांना आपले प्राण गमवावे लागले. भारत सरकारने तातडीने दहा हजार जवानांची तुकडी विद्याकोटला रवाना केली. विद्याकोट हा अत्यंत दुर्गम भाग. त्यावेळी संपर्काचीही काही साधनं नव्हती, पण रणछोडदास यांच्या मदतीमुळे पाकिस्तानी सैन्य तिथे पोहोचायच्या आधी भारतीय सैन्य त्या भागात दाखल झाले. यामुळे अनेक भारतीय जवानांचे प्राण वाचले. स्वत:चा जीव धोक्यात घालून रणछोडदास यांनी लपलेल्या १२०० पाकिस्तानी सैनिकांचा माग काढला, ज्यामुळे १९६५ च्या युद्धात भारतीय सैन्य विजयी झालं.

 

रणछोडदास यांचं असंच बहुमोल सहकार्य १९७१ च्या युद्धातही लाभलं. त्यांचा दिलदारपणा पाहून भारताचे तत्कालीन फील्ड मार्शल जनरल माणेकशाँ यांनी त्यांना चक्क आपल्या घरी जेवणाचं आमंत्रण दिलं. इतकंच नाही, तर त्यांना आणायला हेलिकॉप्टर पाठवलं. माणेकशाँ यांनी स्वत: रणछोडदास यांच्याबरोबर जेवण करत त्यांच्याशी मनमुराद गप्पा मारल्या. त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना शाबासकी दिली आणि तीनशे रुपये (१९७१ साली) बक्षीस दिले. १९६५ आणि १९७१ च्या युद्धातल्या अतुलनीय कामगिरीबद्दल रणछोडदास यांना ‘संग्राम पदक’, ‘समर सेवा स्टार’ आणि ‘पोलीस पदक’ असे तीन सन्मान मिळाले. त्यांच्या निधनापर्यंत दरवर्षी स्वातंत्र्यदिनाला त्यांच्या गावात त्यांच्या हस्ते झेंडावंदन व्हायचं. पाकिस्तानी सैन्याची हेरगिरी करून भारतीय सैन्याला मदत करण्याचं कार्य त्यांनी शेवटपर्यंत सुरू ठेवलं. १९९८ साली त्यांनी पाकिस्तानकडून शस्त्रसाठा घेऊन येणाऱ्या उंटांचा माग काढला आणि त्याची माहिती भारतीय सैन्याला दिली. त्याच्याच पुढल्या वर्षी भगत वेरी आणि हाजिपीर येथे मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी सैन्याचा शस्त्रसाठा आणि स्फोटकं रणछोडदास यांच्या प्रयत्नांमुळे भारतीय सैन्याला सापडली.

 

२००९ साली शरीर थकल्यामुळे या सर्व कामांतून त्यांनी निवृत्ती घेतली. २०१३ साली वयाच्या ११२ व्या वर्षी रणछोडदास निवर्तले. भारताच्या सीमा सुरक्षा दलाने कच्छमधील एका तळाला ‘रणछोडदास तळ’ असं नाव देऊन त्यांचा गौरव केला. गुजरात राज्यात भारत-पाकिस्तानची ५४० किलोमीटरची सीमा आहे. या सीमेलगत असणारे रणछोडदास पागी यांच्या समाजातील जे लोक सैनिकांना अशाप्रकारे मदत करतात त्यांना ‘पोलीस पागी’ असे म्हटले जाते. रणछोडदास यांच्या स्मरणार्थ हे नाव दिले गेले आहे.

 

देशाचं रक्षण ही फक्त सैनिकांचीच जबाबदारी नव्हे. ती प्रत्येक नागरिकाची आहे. प्रत्यक्ष सीमेवर जाऊन लढणं प्रत्येकाला शक्य नसलं तरी छोटंसं का होईना, पण आपल्याला जमेल ते काम आपण निष्ठेने करावं, हाच संदेश रणछोडदास प्रत्येक भारतीयाला देतात.

@@AUTHORINFO_V1@@