टिटवीने केली समुद्र आटविण्याची घोषणा

    दिनांक  02-Jan-2018   
 

 
 
टिटवीने समुद्र कधी आटविला जाणार आहे का? हे जिग्नेश मेवानीला कोण सांगणार? आणि सांगून तरी त्याचा काय उपयोग होणार? प्रसिद्धी आणि द्वेषाची नशा दारूच्या नशेपेक्षाही वाईट असते. दारू एकदा प्यायली की काही काळ नशा आणते, नंतर हळूहळू उतरत जाते. परंतु, प्रसिद्धी आणि द्वेषाची नशा एकदा चढली की उतरण्याचे नाव घेत नाही. त्यासाठी जबरदस्त उताणे पडावे लागते.
 
केंद्रात भारतीय जनता पार्टी सत्तेवर आल्यापासून सर्वाधिक पोटशूळ जर कुणाला उठला असेल, तर तो डाव्या चळवळीतील लोकांना आहे. याच चळवळीतील लोकांनी जन्मल्यापासून आयुष्याचा शेवटचा श्वास घेईपर्यंत संघकाम आणि जनसंघ व भाजप यांचा पराकोटीचा द्वेष केला. उद्या द्वेष जर मानवी रूप घेऊन आला तर तो कसा दिसेल? तर तो गतकाळातील नानासाहेब गोरे साहेबांसारखा आणि आताच्या काळातील सीताराम येचुरी आणि प्रकाश करात यांच्या रूपात दिसेल. या लोकांची भयानक शोकांतिका अशी की, (जी ग्रीक शोकांतिकेलाही लाजविल) एवढा द्वेष करूनही आणि असंख्य संघ कार्यकर्त्यांच्या हत्या करूनही संघ संपत नाही, तो दिवसेंदिवस वाढतच चालला आहे आणि आता संघ स्वयंसेवक अनेक राज्यात मुख्यमंत्री झाले आहेत. हे पाहण्याचे दुर्भाग्य डाव्यांना सहन होत नाही, पोटशूळ काही थांबत नाही आणि त्यामुळे होणार्‍या जुलाबांना काही औषध नाही.
 
आपण स्वतः तर आता काही लढू शकत नाही, परंतु द्वेषाची आग तर काही शांत होत नाही. मग ती शांत करण्यासाठी डाव्यांनी जबरदस्त डोके चालविले आहे. आपली लढाई ते आता दलितांना हाताशी धरून करू लागले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्वीच इशारा दिला होता की, ‘‘कम्युनिस्टांपासून सावध राहा, ते तुमचा उपयोग तोफेतील दारूगोळ्यांप्रमाणे करतील.’’ महापुरूष इशारे देऊन जातात, परंतु त्यांचे पालन सर्वच जण करतात असे नाही. जिग्नेश मेवानी हा त्यातील एक आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत तो निवडून आला. त्याला निवडून आणण्यासाठी डाव्यांनी भरपूर प्रयत्न केले. त्यात त्यांना यश आले. आता जिग्नेशचा उपयोग ते संघ आणि भाजपविरूद्ध लढण्यासाठी ते करू लागले आहेत.
 
आजच्या वर्तमानपत्रात पुण्यात झालेले जिग्नेशचे भाषण आले. त्यात तो म्हणतो, ‘‘कर्नाटक, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. सर्व मतभेद बाजूला ठेवून एकत्र येत भाजपला हटविण्याची वेळ आली आहे. जात, धर्म बाजूला ठेवून देशाची जनता कामगार, शेतकरी आणि युवा म्हणून मतदान करेल, तेव्हा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजप दोन आकड्यांवर येईल. १४ एप्रिल रोजी नागपूरला येऊन मी ‘संघ समाप्ती’ची घोषणा करेन.’’ जिग्नेश मेवानी यांच्या या घोषणा वाचल्यानंतर मला समुद्र आटवून टाकण्याची घोषणा करणार्‍या टिटवीची आठवण झाली. एका टिटवीचे घरटे किनार्‍या लगतच्या वाळूत होते. एकदा समुद्रला उधाण आले आणि लाटांनी टिटवीचे घरटे मोडून गेले. तिची अंडी पाण्यात वाहून गेली. ती संतापली आणि तिने समुद्र आटवून टाकण्याची प्रतिज्ञा केली. आपल्या चोचीने ती रोज समुद्रातून पाणी आणून बाहेर टाकू लागली. हे तिचे काम महिनो न् महिने चालले, त्यात ती थकली आणि स्वर्गवासी झाली. टिटवीने समुद्र कधी आटविला जाणार आहे का? हे जिग्नेश मेवानीला कोण सांगणार? आणि सांगून तरी त्याचा काय उपयोग होणार? प्रसिद्धी आणि द्वेषाची नशा दारूच्या नशेपेक्षाही वाईट असते. दारू एकदा प्यायली की काही काळ नशा आणते, नंतर हळूहळू उतरत जाते. परंतु, प्रसिद्धी आणि द्वेषाची नशा एकदा चढली की उतरण्याचे नाव घेत नाही. त्यासाठी जबरदस्त उताणे पडावे लागते
 
डाव्यांचे मार्क्सचे तत्वज्ञान आता कालबाह्य झाले आहे. जगात त्याला बाजारपेठ नाही. रशियाने त्याचा केव्हाच त्याग केला, चीनने फक्त मार्क्सवादातील हुकूमशाही ठेवली आणि आर्थिक तत्त्वज्ञान मार्क्सच्या कबरीत पाठवून दिले. भारतात त्यांना उभे राहण्यासाठी समाजवाद, साम्यवाद, कशाचाच काही उपयोग नाही. पण ते हुशार आहेत, बुद्धिमान आहेत, त्यांच्या लक्षात आले की, आता आपल्याला डॉ. बाबासाहेबांचा उपयोग केला पाहिजे आणि म्हणून त्यांनी मांडणी सुरू केली की, डॉ. बाबासाहेबांनी शोषितांचाच विषय हाती घेतला. त्यांना आर्थिक आणि सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. भारतीय समाजव्यवस्थेने हा न्याय नाकारलेला आहे. न्याय नाकारणारे लोकच सत्तेवर असतात, म्हणून त्यांच्या विरूद्ध संघर्ष केला पाहिजे. या संघर्षासाठी डाव्यांना नवे चेहरे पाहिजेत. चळवळीतील लोक आता म्हातारे झालेत. नवीन तरूणांची भरती बंद झाली. म्हणून जो भडक बोलेल, हिंदू समाजाविरूद्ध बोलेल, संघ-भाजपाविरूद्ध बोलेल, त्याच्या पाठीशी उभे राहायचे हे डाव्यांचे धोरण आहे. जिग्नेश मेवानी कम्युनिस्ट आहे असे नसून त्याचा जन्म दलित समाजात झाला म्हणून त्यांना तो हवा आहे. दिल्लीत कन्हैय्या कुमारलादेखील त्यांनी असेच उभे केले. जो जातींचा विषय घेऊन संघर्ष करेल, तो आमचा, जो संघाला शिव्या घालेल, तो आमचा जिवलग आणि जो मोदींविरूद्ध वाटेल ते बोलेल, तो तर आमचा यारो का यार.
 
ही सगळी मंडळी आता संघ आणि भाजपविरोधात लढण्यासाठी उभी राहिली आहेत. त्यांच्याकडे बघितल्यानंतर मला इसापच्या कथेची आठवण येते. एक शेतकरी असतो आणि त्याच्याकडे गाढव असते. शेतकर्‍याला एकदा मेलेला सिंह सापडतो. तो त्याचे कातडे काढून आणतो आणि ते गाढवाच्या शरीरावर घालतो. रात्रीच्या वेळेला तो गाढवाला शेतात सोडून देत असे. सिंहाचे कातडे बघून कोल्हा आणि लांडगा शेतात येण्याचे धाडस करीत नसत. एके दिवशी दुसरीकडून एक गाढव ओरडते त्याचा आवाज ऐकल्यानंतर सिंहाचे कातडे पांघरलेला गाढव देखील आपले नकली सिंहाचे रूप विसरून ओरडू लागतो. अन्य प्राण्यांच्या लक्षात येते की, सिंहाच्या ऐटीत फिरणारा हा प्राणी गाढव आहे. ते सर्व मिळून त्याच्यावर हल्ला करतात आणि त्याच्या अवताराची समाप्ती होते. भाजप आणि संघविरोधाची कम्युनिस्ट कातडी अंगावर पांघरलेले हे सर्व तरूण नेते आणखीन पाच वर्षांनंतर कुठे असतील हे शोधत बसावे लागेल. कम्युनिस्ट मंडळी तशी फार हुशार असतात. गाजराची पुंगी, वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली, ही म्हण ते जगत असतात. ‘वापरा आणि फेकून द्या’ ही त्यांची जगभरची नीती आहे. ‘वापरा आणि गिळंकृत करा’ हे त्यांच्या नीतीचे दुसरे रूप आहे. भाजपला दोन जागेवर आणण्याची वल्गना करणे आणि संघ संपविण्याची वल्गना करणे प्रसिद्धीसाठी खूप चांगले आहे. असे काही बोलल्याशिवाय वर्तमानपत्रात बातमी होत नाही. परंतु, बोलणार्‍याची किंमत वाचणारा आपापल्या परिने करत असतो. वाचणार्‍यापैकी एकाची प्रतिक्रिया अशी आहे की, जिग्नेश डोकं ठिकाणावर असलेला युवानेता आहे का? भाजपला दोन जागांवर आणण्याचे स्वप्न पाहणे म्हणजे सुकलेल्या आंब्याची फांदी जमिनीत रोवून तिला पाने आणि मोहर लागेल, याचे स्वप्न बघण्यासारखे आहे आणि संघ समाप्तीचे असेच दुसरे स्वप्न पाहणे म्हणजे घोडा आकाशात उडेल याची वाट पाहत बसणे आहे.
 
संघ काय किंवा भाजप काय, जिग्नेश मेवानी आणि त्यांच्या डाव्या यजमानांमुळे कधीही सामर्थ्यहिन होणार नाही. याउलट ही मंडळी जेवढ्या मोठ्याने संघ आणि भाजपला संपविण्याच्या घोषणा करीत राहतील, तेवढ्या मोठ्याने संघ आणि भाजप वाढत जाईल. याचे कारण अगदी स्पष्ट आहे. या डाव्यांची लायकी काय आहे? देश, धर्म, संस्कृती याबद्दल त्यांच्या मनात किती आस्था आहे? देश आणि समाजासाठी स्वतःला दिव्याप्रमाणे पेटत ठेवून तीळ तीळ झिजत जाण्याची त्यांची क्षमता आहे का? हे सर्व समाज पाहतो. त्यावरून त्यांचे मोल करतो. ज्यावेळी डाव्या चळवळी समाजासाठी झिजणारी माणसे होतील, त्यावेळी या चळवळीचा थोडाबहुत प्रभाव होता. परंतु, आज त्यांची प्रतिमा सर्व प्रकारची विध्वसंक अशी झालेली आहे.
 
म्हणून ते जेवढ्या अधिक आवाजात आणि वाईट शब्दांत बोलत राहतील तेवढे चांगले. प्रसिद्धी माध्यमांनीही त्याची दखल घ्यावी, त्यांची उपेक्षा करू नये, त्यांचे बोल सर्व ठिकाणी पोहोचतील असे बघावे. राष्ट्रीय भावनेने जागृत होणारी जनता हे बोल ऐकेल आणि आपला निर्णय करेल. २०१४ साली त्यांनी निर्णय केलाच. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीतही त्यांनी निर्णय केला. आता गुजरातच्या निवडणुकीतही त्यांनी निर्णय केला आहे. यावर्षी होणार्‍या राज्यांच्या निवडणुकीतही जनता निर्णय करेल आणि २०१९ च्या निवडणुकीतही निर्णय करेल. राष्ट्रीय जनतेने आता काही निर्णय केलेले आहेत. त्यातील पहिला निर्णय असा की, या देशाशी शत्रुत्व करणार्‍यांना जवळ करायचे नाही. जातीय भावना जागविणार्‍यांना थारा द्यायचा नाही. धर्म आणि संस्कृती विध्वसकांना त्यांची योग्य ती जागा दाखवून द्यायची. जिग्नेश मेवानी वयाने लहान आहे. त्याला कदाचित हे समजणार नाही. परंतु, राहुल गांधींना हे फार चांगल्या प्रकारे समजले आहे. म्हणूनच ते वंशाने पारशी असून आणि आईच्या बाजूने कॅथोलिक ख्रिश्चन असून स्वतःची प्रतिमा ‘जानवेधारी शिवभक्त’ अशी करू पाहत आहेत.
 
जिग्नेश मेवानी, तू बोलत राहा. कारण, तो तूझा मुलभूत अधिकार आहे. तुझे बोलणे ऐकून काय करायचे आणि काय निर्णय घ्यायचा हादेखील जनतेचा मूलभूत अधिकार आहे. मेवानीचे बोलणे काही जणांना आवडणार नाही, काही जणांना ते लागेल. परंतु, निर्णायक क्षणी जेव्हा जनता बोलेल आणि आपला मूलभूत अधिकार गाजवेल तेव्हा...जे होईल त्याचे आपण साक्षीदार असू.
 
 
 - रमेश पतंगे