पराभूतांची मांदियाळी

    दिनांक  28-Oct-2017   


वेगवेगळ्या राज्यांतील प्रादेशिक पक्ष एकत्रित आणून आघाडीतील पक्षांची यादी जरी वाढत असली तरी त्याचा राष्ट्रीय पातळीवर फार काही मोठा प्रभाव निर्माण होत नाही. कारण उत्तर प्रदेशातील पक्षाचा कर्नाटकमध्ये, बंगालमधील पक्षाचा गुजरातमध्ये काहीच संबंध नसतो. त्या त्या राज्यांत तेथील प्रादेशिक पक्षांच्या यशापयशावरच या आघाडीचं यश अवलंबून असतं.
 
 
 
 
करून करून भागला आणि देवपूजेला लागला, अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. कॉंग्रेस पक्षासह त्यांचे तथाकथित समविचारी पक्ष सध्या करत असलेली वाटचाल पाहिली की या म्हणीचा प्रत्यय येतो. या पक्षांच्या आणि नेत्यांच्या यादीत बिहारच्या जनता दल युनायटेडमध्ये असलेले पण पक्षाध्यक्ष आणि पक्षासोबत नसलेले शरद यादव यांचे नाव नव्याने समाविष्ट झाले आहे. मुंबईत ’साझी विरासत बचाओ संमेलन’ अशा काहीशा अगम्य नावाने शरद यादवांच्या अध्यक्षतेखाली कॉंग्रेसने घेतलेला विरोधी पक्षांचा मेळावा हे हळूहळू हे सर्व पक्ष पुन्हा त्यांच्या मूळ मार्गावर येत असल्याचेच लक्षण आहे. यामध्ये कॉंग्रेससह राष्ट्रवादी कॉंग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट, समाजवादी पार्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना आदी सर्व पक्षांचे वरिष्ठ प्रतिनिधी आणि यांच्या अध्यक्षस्थानी स्वतःच्या पक्षात असून नसल्यासारखे शरद यादव. या सगळ्यांना एकत्र आणून भाजपविरोधी शक्ती उभी करण्याचा आणखी एक प्रयत्न कॉंग्रेस करत असल्याचं स्पष्ट आहे. मात्र, निवडणुका, पक्षसंघटन आदींसोबतच मनानेही पराभूत झालेल्यांना एकत्र आणून साझी विरासत वाचवणारी शक्ती कशी काय उभी राहणार? हाच प्रश्न पडतो.

वास्तविक पाहता देशातील विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा कॉंग्रेसचा हा काही पहिला प्रयत्न नाही. आधी कॉंग्रेसची युपीए आघाडी आणि भाजपची एनडीए आघाडी यांच्याविरोधात उरलेल्या पक्षांची तिसरी आघाडी उभी राही, ज्यात मुख्यतः डावे आणि प्रादेशिक पक्ष असत. मोठमोठ्या आणाभाका घेत ही तिसरी आघाडी एकत्र येई आणि तितक्याच वेगाने ती कोलमडे. २०१४ मध्ये व नंतर भाजपने केंद्रासकट एकामागोमाग एक राज्यं हस्तगत करायला सुरुवात केल्यानंतर कॉंग्रेसलाच या तिसर्‍या, चौथ्या वगैरे फ्रंटवाल्या पक्षांना एकत्र आणायची गरज भासू लागली पण या प्रयत्नांना अद्याप म्हणावं तसं यश मिळताना दिसत नाही. मध्यंतरी बिहारमध्ये महागठबंधनचा प्रयोग यशस्वी ठरला खरा, पण त्यात कॉंग्रेसचं स्थान अगदीच नगण्य होतं. शिवाय पुढे त्या महागठबंधनमधून नितीशकुमारच बाहेर पडल्यामुळे त्यात केवळ ’महाठगबंधनच’ उरलं. बाकी राज्यांमधूनही म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. मुलायमसिंह यांच्या बेभरवशीपणाचा अनुभव कॉंग्रेसने आजवर बराच घेतला आहे आणि त्यात आता त्यांचा पक्षही यादवांच्या कौटुंबिक वादांमध्ये पुरता कोलमडून गेला आहे. महाराष्ट्रात पवार साहेब तर मुलायमसिंह यांचेही परात्पर गुरू आहेत. साहेबांची राष्ट्रवादी सध्या मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या विरष्ठ नेत्यांना व्यासपीठावर आणून त्यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन, कुणाची एकसष्ठी, कुणाची पंच्याहत्तरी साजरी करण्यात व्यस्त आहे. या सगळ्या महत्त्वाच्या शिलेदारांचीच अशी अवस्था असल्यामुळे विरोधी आघाडीची परिस्थिती यथातथाच आहे. अशा परिस्थितीत आता पुन्हा विरोधी आघाडी उभारण्याच्या प्रयत्नांचं काय होतं, हे पाहावं लागेल.

 मुळात सर्वपक्षीय विरोधी आघाडी ही संकल्पनाच फोल आहे. वेगवेगळ्या राज्यांतील प्रादेशिक पक्ष एकत्रित आणून आघाडीतील पक्षांची यादी जरी वाढत असली तरी त्याचा राष्ट्रीय पातळीवर फार काही मोठा प्रभाव निर्माण होत नाही. कारण उत्तर प्रदेशातील पक्षाचा कर्नाटकमध्ये, बंगालमधील पक्षाचा गुजरातमध्ये काहीच संबंध नसतो. त्या त्या राज्यांत तेथील प्रादेशिक पक्षांच्या यशापयशावरच या आघाडीचं यश अवलंबून असतं. आता कॉंग्रेसच यामध्ये सक्रिय झाली असली तरी कॉंग्रेसच्या दोन-चार राज्यांचे अपवाद वगळता काय परिस्थिती आहे हे आपल्यासमोर आहेच. आजवर राष्ट्रीय पक्ष नसलेल्या तिसर्‍या, चौथ्या आघाड्यांना जराही दखलपात्र कामगिरी करता आली नाही. नव्वदच्या दशकात प्रादेशिक पक्षांची कडबोळी करून केंद्रात सरकारं स्थापन झाली पण त्यांचं अवतारकार्य फारतर वर्ष-दीड वर्ष टिकलं. आता कॉंग्रेस एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या पक्षांची अवस्था काय आहे यावर एक नजर टाकू. राष्ट्रवादी कॉंग्रेसने महाराष्ट्रात आपली धरसोड वृत्ती कायमठेवली आहे. शिवाय भ्रष्टाचाराच्या विविध आरोपांमुळे मलीन झालेली पक्षाची प्रतिमा अजूनही पक्षाला सुधारता आलेली नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने किंबहुना खा. राजू शेट्टींनी सदाभाऊ खोतांवरील व्यक्तिगत रागातून एनडीएमधून बाहेर पडत स्वतःहून आपल्या पायावर धोंडा मारून घेतला आहे. समाजवादी पक्षाची उत्तर प्रदेशातील लाटेत पुरती वाताहत झाली आहे. राहता राहिले कम्युनिस्ट तर ते केरळ, त्रिपुरा, बंगाल वगळता सध्या कुठे आहेत आणि असले तर का आहेत हाच प्रश्न आहे. शिवाय कम्युनिस्टांनी कॉंग्रेससोबत समविचारी पक्ष म्हणून एकत्र येणं ही कार्ल मार्क्सचीही कूर थट्टाच आहे. पण या या सर्व पक्षांनी अशाप्रकारे एकत्र येण्याचं आता जनतेला अप्रूप राहिलेलं नाही. कारण इतकी वर्षं या मंडळींंनी एक छान गोड गोंडस नाव या सगळ्या नाटकबाजीला दिलेलं आहे. ते म्हणजे जातीयवादी शक्तींच्या विरोधात धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येणं!
 
 
देवेगौडा पंतप्रधान असताना लोकसभेत मांडल्या गेलेल्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेस प्रमोद महाजनांनी संस्मरणीय भाषण केलं होतं. यावेळी महाजन उद्वेगाने म्हणाले की, ’’भांडण तुमचं आणि नाव आमचं. आमचा काय संबंध? हा कुठला न्याय? अर्थात, हे तर आमच्यासोबत नेहमीच होत असतं,’’ अशीही टिप्पणी महाजन यांनी केली आहे. जेव्हा जेव्हा दुभंगलेल्या विरोधी पक्षांमध्ये आपापलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आपापसांतील मतभेद विसरून एकत्र येण्याची वेळ येते तेव्हा तेव्हा त्याला जातीयवादी शक्तींच्या विरोधात एकत्र येण्याचं नाव दिलं जातं. म्हणजे थोडक्यात भाजपच्या विरोधात. त्यात पुन्हा आपल्याकडे अनेक नेते सेक्युलरवादाचे मेरुमणी म्हणून ओळखले जातातच. त्यामुळे या नेत्यांनी गतकाळात परस्परांच्या विरोधात कितीही कुरघोडी केल्या असल्या तरी जातीयवादी शक्तींविरोधात एकत्र येणं मात्र काळाची गरज ठरते. नवे मुद्देच नसल्याने मग हिंदुत्व, असहिष्णुता, धर्मनिरपेक्षता आदी मुद्दे केवळ वाक्यरचना बदलून श्रोत्यांच्या माथी मारले जातात. या मांदियाळीत शरद यादव हे नाव नव्याने समाविष्ट करावे लागेल. समाजवादी नेत्यांमध्ये गोंधळाची परंपरा मोठी आहे. शरद यादव यांची सध्याची वाटचाल हे या गोंधळाचंच प्रतीक. शरद यादव हे सध्या जेडीयुच्या अंतर्गत राजकारणातून पुरते बाहेर फेकले गेल्यात जमा आहेत. एकेकाळी राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचा नेता म्हणून ओळख असलेल्या, जेडीयुचे अध्यक्षपद भूषविलेल्या या नेत्यावर राजकीयदृष्ट्या विस्थापित व्हायची वेळ आली आहे. पक्षाच्या, पक्षाच्या कार्यक्षेत्राच्या व स्वतःच्याही हिताच्या दृष्टीने काळाची गरज ओळखून नितीशकुमारांनी पावलं उचलली आणि भाजपच्या गोटात सामील झाले. शरद यादव मात्र अजून त्याच कंपूत घुटमळताना दिसत आहेत. आणि नितीशकुमारांमध्ये भावी राष्ट्रीय सेक्युलर नेत्याची प्रतिमा पाहणारे आता बहुधा नितीशकुमारांची तहान यादवांवर भागवत आहेत. निवडणुकीतील हार जीत ही नित्याची गोष्ट आहे, त्याबाबत एखाद्याची थट्टा करण्याचं काही कारण नाही. पण निवडणुकीसोबतच नाही तर मनातूनही पराभूत झालेल्या मंडळींची ही जत्रा आहे. या मंडळींनी पुन्हा एकदा एका व्यासपीठावर येत राष्ट्रीय स्तरावर पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न चालवला असला, तरी ज्यांचा पाया मजबूत नाही आणि हेतू साफ नाही, त्यांचा देशातील सध्याच्या राजकीय पटलावर निभाव लागणं कठीण आहे. ही परिस्थिती ओळखून, वेळीच आत्मपरीक्षण करून ही मांदियाळी वेगळी वाट चोखाळते की पुन्हा पुन्हा त्याच त्या रस्त्यावरून पराभावाच्याच दिशेने वाटचाल करते हे काळच ठरवेल.
 
- निमेश वहाळकर