खंडणीप्रकरणी वाल्मिक कराडला १० दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर
14-Jan-2025
Total Views | 16
बीड : (Walmik Karad) अवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याची १४ दिवसांची पोलिस कोठडी संपल्यामुळे आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाकडून कराडला १० दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली आहे. केज न्यायालयात न्यायाधीश एन डी गोळे यांच्या समोर सुनावणी झाली.
पोलिसांकडून कराडच्या १० दिवसांच्या सीआयडी कोठडीची मागणी करण्यात आली होती. मात्र न्यायालयाकडून ही मागणी फेटाळण्यात आली असून वाल्मिक कराडला १० दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दोन्ही बाजूच्या वकीलांचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने निकाल दिला आहे.
कराडच्या वकीलांकडून जामिन अर्ज दाखल
न्यायालयीन कोठडी मंजूर झाल्यामुळे जामिनाचा मार्ग सुकर झाला आहे. तसेच आम्ही जामिनासाठी पात्र ठरलो आहोत. त्यामुळे आम्ही आजच जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे, अशी प्रतिक्रिया वाल्मिक कराडचे वकील अॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी माध्यमांना दिली आहे.