मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने विविध गृहनिर्माण प्रकल्पातील २,०३० घरांच्या विक्रीसाठी काढलेल्या लॉटरीला मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाले आहेत. यात १ लाख १३ हजार ५७७ अर्जदारांनी सहभाग नोंदवला असून, अर्जाच्या शुल्कातून म्हाडाने तब्बल सहा कोटी रुपये कमावले आहेत. यासाठी अजून एकही फ्लॅट विकलेला नाही.
अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १९ सप्टेंबर होती, आणि अनामत रकमेचा भरणा करण्यासाठी १९ सप्टेंबरच्या रात्रीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. एकूण १ लाख ३४ हजार ३५० अर्ज प्राप्त झाले होते, यापैकी १ लाख १३ हजार ५७७ अर्ज अनामत रकमेसह होते. अर्ज शुल्क ५९० रुपये आकारले जात असल्याने म्हाडाच्या तिजोरीत मोठी रक्कम जमा झाली आहे.
लॉटरीतील घरांच्या किमती अधिक असल्याने अर्जदारांनी सुरुवातीला कमी रस दाखवीला होता. परंतु, म्हाडाने खाजगी विकासकाच्या घरांच्या किमती १० ते २५ टक्क्यांनी कमी केल्याने अर्जदारांचा प्रतिसाद वाढला. यामुळे लॉटरीसाठी अर्ज सादर करण्यात उत्साह दिसून आला. लॉटरीचा निकाल ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये जाहीर करण्यात येणार आहे.