'नाम' ने समाजाच्या माध्यमातून परिवर्तन घडवण्याचं केलेलं काम कौतुकास्पद - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    21-Sep-2024
Total Views | 52

naam 
 
 
पुणे: चळवळीला जर सत्त्वगुणांची जोड मिळाली, तर तिचे रूप पालटते. सध्याच्या काळात चळवळ उभी करणे तितके कठीण नाही. त्यासाठी अनुयायी मिळतात,पण ती चळवळ कार्यान्वित झाल्यावर सर्व सूत्रे योग्य व्यक्तीच्या हातात असणे महत्त्वाचे असते. राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी पुढे सरसावलेले संवेदनशील अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी एक एक पाऊल पुढे टाकत सुरु केलेल्या ‘नाम’ फाउंडेशन संस्थेने आपल्या अनेक विधायक कामातून यशस्वी ९ वर्ष पूर्ण केली. १० व्या वर्षात पदार्पण करीत असताना या सर्व कामांचा आढावा घेत संस्थेचा १० वा वर्धापन दिन नुकताच संपन्न झाला. या वर्धापन दिनाला महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नाम संस्थेचे विश्वस्त आणि सीएसआर (CSR) च्या माध्यमातून मदत करणाऱ्या प्रतिनिधींचा यावेळी कृतज्ञता पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर पाटील आदि मान्यवर मंडळी उपस्थित होती.
 
सिर्फ 'नाम' ही काफी हे असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी ‘नाम’ फाउंडेशन संस्थेच्या कार्याचे कौतुक यावेळी केले. नेतृत्व सक्षम असेल तर समाजाच्या माध्यमातून परिवर्तन घडवता येते, हे ' नाम’ ने दाखवून दिल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं. आपल्या ग्लॅमरचा योग्य तो उपयोग करून जनतेमध्ये विश्वास निर्माण करत लोकचळवळ उभारण्याचं काम नाना आणि मकरंद या दोन अवलियानी केलं. या चळवळीने आज वेगवेगळ्या रूपाच्या कामाने समाजासमोर एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. दुःख आत्मसात करून जगण्याची प्रेरणा निर्माण करण्याचं काम आणि आत्मविश्वास 'नाम' ने आपल्या कामातून निर्माण केला आहे. विधायक कामाचा वसा अव्याहत सुरु राहावा यासाठी शासन म्हणून कायम कटिबद्ध राहत सर्वोतपरी मदत करण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी दिली.
 
याप्रसंगी बोलताना उदय सामंत म्हणले की, सामाजिक काम करणारे कलाकार म्हणून मला नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मंत्रिमंडळातील सर्व खाती चालवून विकास करण्याचं प्रामाणिक कामं करणारी ‘नाम फाउंडेशन' संस्था आम्हा प्रत्येकासाठी आदर्श आहे. ‘नाम’ फाउंडेशन संस्थेच्या वर्धापनदिनाला उपस्थित राहिल्याने माझ्या सामाजिक आणि राजकीय कार्याला नवी ऊर्जा मिळू शकते; या विश्वासाने मी आज इकडे उपस्थित असल्याचे प्रतिपादन उदय सामंत यांनी केले. मार्केटिंग न करता विधायक काम करता येते हे ‘नाम’ फाउंडेशन संस्थेने दाखवून दिले आहे. माझ्या राजकीय वाटचालीत ही गोष्ट शिकण्यासारखी असल्याचे मला वाटते. व्हिजिलन्स म्हणून नाना ज्याप्रकारे काम करतात ते खरचं कौतुकास्पद आहे. मी नामाचा सदस्य आहे हे तुम्ही समजून घ्यावं. ९ व्या वर्धापनदिनाप्रमाणे नामाचा ९० वा वर्धापनदिन ही साजरा व्हावा अशा शुभेच्छा उदय सामंत यांनी यावेळी दिल्या.
 
आम्ही हा जो वसा घेतला आहे त्यासाठी सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचा मी ऋणी असल्याचे अभिनेते नाना पाटेकर यांनी सांगितले. हे न संपणार कार्य असून सगळ्यांना बरॊबर घेऊन हा वसा सुरु ठेवण्याची जबादारी नव्या पिढीच्या नेतृत्वाने सक्षमपणे सांभाळावी. यासाठी आमचे आशीर्वाद कायम सोबत असतील असा विश्वास ही नानांनी यावेळी नामला सहकार्य करणाऱ्या सगळ्या मंडळींना दिला.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121