मुंबई : तब्बल २४-२५ वर्षांपूर्वी २००१ साली ‘तांबव्याचा विष्णूबाळा’ हा मराठी चित्रपट तूफान हिट ठरला होता. प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे या सिनेमात मुख्य भूमिकेत होते. आजही हा चित्रपट कधीतरी टिव्हीवर लागला की प्रेक्षक आवर्जून पाहतात. पण हाच सिनेमा पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत नुकतीच सयाजी शिंदे यांनी ‘तांबव्याचा विष्णूबाळा’ या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.
सातारा जिल्ह्यातील डोंगराच्या कुशीत वसलेल्या तांबवे गावातील विष्णू बाळा पाटील यांच्या संघर्षाची कथा या चित्रपटातून उलगडणार आहे. सत्यघटनेवर आधारलेल्या, रक्तरंजित संघर्षाचा नायक असलेल्या विष्णूबाळाची मध्यवर्ती भूमिका सयाजी शिंदे साकारणार असून मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील कलावंतांची मांदियाळी या भव्य चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट मराठीसोबत हिंदी, तेलुगू आणि तामिळ भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे.
सातारच्या ग्रामीण भागात घडलेल्या या सूडनाट्याचा थरार जनसामान्यांना अचंबित करणारा असणार आहे, असा विश्वास सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला. गावच्या भाऊबंदकीतून आणि श्रेयवादातून सख्ख्या चुलत भावांमध्ये विकोपाला गेलेला वाद आणि त्यातून कुटुंबावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी विष्णूबाळाने केलेला रक्तरंजित संघर्ष ‘तांबव्याचा विष्णूबाळा’ या चित्रपटातून पहायला मिळणार आहे.
२००१ साली ‘तांबव्याचा विष्णूबाळा’ हा मराठी चित्रपट आला होता. यात सयाजी शिंदे यांच्यासोबत अनेक मात्तबर कलाकारांनी भूमिका केल्या होत्या. आता पुन्हा एकदा नव्या कलाकारांच्या संचात हा चित्रपट भव्य स्वरूपात प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे. २००१ साली आलेला हा चित्रपट अनेकांनी पाहिलाही असेल. पण नेमका विष्णूबाळा कोण होता आणि हा संघर्ष कसा सुरु झाला याची खूपच वेगळी कहाणी आहे.
ही घटना सुरु होते ती दक्षिण साताऱा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील तांबवे गावात. या गावाने स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी म्हणून ओळख मिळवली होती. गावात कोयना नदीच्या पाण्यानं सुफळं संपुर्ण झालेली शेती. पाटणच्या घाटरेषेतील गर्द हिरवाई. चारी बाजूनं पाणी असल्यानं गाव अगदी सुंदर दिसायचं.
पण स्वातंत्रसैनिकांच्या या गावात १९५२-५३ साली एक वेगळाच संघर्ष पाहायला मिळाला. पै. आण्णा बाळा पाटील आणि पै. विष्णू बाळा पाटील या दोन सख्ख्या भावांचा संघर्ष ते गावातील भाऊबंदकी. तशी गावात भाऊबंदकी पुर्वीपासूनच होती. पण १९५२-५३ साली हे वाद मोठ्या विकोपाला गेले . सोसायटीच्या वादातून विष्णू बाळा यांच्या भावाचा म्हणजेच आण्णा बाळा पाटील यांचा त्यांच्या सख्ख्या चुलत भावाशी वाद होता. त्यांच्याच चुलत भावाने संध्याकाळच्या अंधारात पाणवठ्यावर आण्णांचा पाय तोडला. जखमी आण्णांना कराडच्या दवाखान्यात दाखल केलं गेलं. पण हा विषय गंभीर होता. तेव्हा तिथे दवाखान्यात यशवंतराव चव्हाण स्वतः आण्णा बाळाला भेटायला आले होते. तेव्हा यशवंतराव चव्हाणांनी आण्णा बाळाच्या पाठीवरुन हात फिरवला आणि सांगितले तुम्ही काही काळजी करू नका. त्यावेळी यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. आणि ते देखील कराडचेच. त्यामुळे यशवंतरावांना या प्रकरणार दखल देणे गरजेचे होते.
पोलिसांनी रितसर गुन्हा नोंदवुन आरोपींना न्यायालयात हजर केले. इथं पर्यंत सगळं ठिक होते. पण काहीच दिवसात हे आरोपी न्यायालयातुन निर्दोष सुटले. आणि विष्णू बाळाचा संताप अनावर झाला. न्याय व्यवस्थेकडून न्याय न मिळाल्याची भावना मनात धरून विष्णू बाळा यांनी पुढील काही दिवसातच खुनांची मालिकाच रचली. त्यावेळी या प्रकरणाची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली होती. विष्णू बाळा हे मुळतः सभ्य आणि सरळ मार्गी होते. महिलांचा, आई – बहिणींचा प्रचंड आदर करायचे. त्यांनी भावकीतला हा वादही शांततेत सोडवण्याचा प्रयत्न केला होता. पण समोरून त्यांना चुकीचा प्रतिसाद मिळाला. आणि जे घडायला नको तेच घडलं. हे दोन्ही पाटील म्हणजे कराडच्या आझाद हिंद आखाड्यातील पैलवान होते.
त्यातही ‘तांबव्याचा विष्णु बाळा’ हे नाव सतत चर्चेत असायचे. पाटण खोऱ्यात माजलेल्या वाघरांची शिकार करणे व गरीब जनतेला सहाय्य करणे या गुणांमुळे त्यांचे त्याकाळी मोठं नाव झालं होतं. पाटण खोऱ्यातील जंगलजाळीत त्यांनी सावकारी, अन्याय, अत्याचार करणाऱ्यां विरुद्ध बंड उभं केलं होतं. गरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी बंदूक उचलली आणि पाटण खोरं रक्तानं न्हाऊन गेलं होतं.

या काळात विष्णु बाळा यांनी चार खुन केले होते. पण तरीही पोलीस त्यांना पकडू शकत नाहीत. याचं कारण, विष्णू बाळा पाटील यांना शिकारीचा नाद होता. त्यातुन त्यांनी पाटण खोऱ्यातील जंगली जनावरांचा बंदोबस्त करुन अनेक शेतकऱ्यांना मदत केली होती. त्यामुळे त्यांना मदत करणारे आणि जीवाला जीव देणारे त्यांचे अनेक मित्र झाले होते.
पोलीस विष्णू बाळा पाटील यांना शोधायला आले की, हे मित्र विष्णू बाळा यांना आसरा देऊन लपवून ठेवत असत. जवळपास चार वर्षे ही शोधमोहीम चालु होती. यानंतर पोलिसांनी साधारण १९५८ साली विष्णू बाळा पाटील यांना फरारी घोषित करून ठाव-ठिकाणा संगणाऱ्यास एक हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. महिना, दोन महिने, तीन महिने, सहा महिने उलटले पण विष्णू बाळा यांचा पत्ता लागत नव्हता. एका मित्राने तर पोलीस पकडण्यासाठी आले होते तेव्हा विष्णू बाळाला स्वतःच्या पत्नीच्या बिछान्याजवळ झोपवलं होते. एकाच अंथरुणावर एक पुरूष व एक स्त्री झोपले असल्याने पोलिसांना संशय आला नाही. आणि त्यामुळेच चार खुन होऊनही आरोपी सापडत नव्हता.
त्यामुळेच संपुर्ण महाराष्ट्रात त्याकाळी हे खून प्रकरण प्रचंड गाजले होते. राजकारणात देखील याचे पडसाद उमटू लागले होते. तसेच विष्णू बाळा यांचे बंधु आण्णा बाळा हे राजकारणात असल्यामुळे त्यांची आणि यशवंतराव चव्हाण यांची चांगली ओळख होती. राजकीय वातावरणात या खुनांची चर्चा सुरू झाल्यावर यशवंतराव चव्हाण यांनी आण्णांशी चर्चा केली. विष्णु बाळा पाटील यांना पोलिसांना शरण यायला सांगितलं. विष्णू बाळा जर शरण आले तर त्यांना कमीत कमी शिक्षा देण्याचे अपील सरकार तर्फे केले जाईल असं आश्वासन दिलं गेलं होतं. त्यानंतर आण्णांनी ही कल्पना विष्णू बाळा यांना दिली. विष्णू बाळा यांनी त्यांच्या बोलण्याला मान देऊन ते पोलिसांना शरण आले. खून खटला सुरू झाला. आणि न्यायालयाने निकाल दिला. विष्णू बाळा पाटील यांना फाशी.
परंतू विष्णू बाळा यांची लोकप्रियता एवढी होती की लोक त्यांना स्वाधिन करुन द्यायला तयार नव्हते. पण त्यांनी आपल्यावर प्रेम करणाऱ्या जनसागराला स्वत: समजावले, त्यांनी जनतेला सांगितले की,
“असा कायदा हातात घेण्याचा मार्ग चुकीचा आहे व मी या मार्गावर गेलो आणि माझं आयुष्य उद्ध्वस्त झाले. त्यांनी सर्व तरुणांना समजावले की रागाच्या भरात तुम्ही कोणीच कधीच हा मार्ग अवलंबून नका अशी माझी कळकळीची विनंती आहे तुम्हा सर्वांना.”
या घटनेला आता अनेक दशके उलटली आहेत. पण आजही विष्णू बाळा पाटील यांची गोष्ट चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या मनाला भावून जाते.