मराठीतही साऊथ स्टाईल, कोकणचा राखणदार ‘दशावतार’ ठरणार सुपरहीट?

    22-Aug-2025
Total Views |


मुंबई : मागची काही वर्षे बॉलिवूडला मागे टाकत साऊथ सिनेमाने मोठी उंची गाठली. याची अनेक कारणं असू शकतात पण प्रामुख्याने पाहायला मिळणारा ट्रेंड म्हणजे दाक्षिणात्य संस्कृतीचं प्रदर्शन. नुकतच 'दशावतार' चित्रपटाचं पोस्टर, त्याचा पहिला लूक आणि चित्रपटातील पहिलंच गाणं आणि ट्रेलर सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणात गणेशोत्सवाचं महत्त्व सर्वाधिक आहे. या गणेशोत्सवाप्रमाणेच कोकणात दशावतार ही कलापरंपरा तितकीच महत्त्वाची आहे. आणि हीच कलापरंपरा या सिनेमात पाहायला मिळणार आहे.
ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर अशी मराठी चित्रपटातील दिग्गज कलाकारांची फौज असलेला हा मल्टीस्टारर ‘दशावतार ‘ हा सिनेमा असणार आहे.
दरम्यान,

‘दशावतार ‘ मध्ये नेमकं आहे तरी काय, याची सर्वांनाच उत्कंठा आहे. कोकणातील इरसाल माणसांचे नमुने , तिथल्या प्रथा परंपरा, दशावतारी नाट्यकला यांचा सुरेख मिलाफ म्हणजे ‘दशावतार ‘! कोकणातील समृद्ध निसर्गवैभव, गर्द देवराया, देवरायांचे राखणदार यांची गूढरम्यता म्हणजे दशावतार!
कलासक्त वृद्ध दशावतारी बाबुली मेस्त्री आणि त्याच्या आयुष्यातल्या वादळांची गोष्ट म्हणजे ‘दशावतार ‘ आहे.

दशावतार म्हणजे काय?
दशावतार ही एक पारंपरिक लोककला आहे, जी कोकणातील सांस्कृतिक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. दशावतारात कलाकार विष्णूचे विविध अवतार सादर करतात, ज्यात चमकदार मेक-अप आणि पारंपरिक वेशभूषा असते. तर कलाकार स्वतःच मेकअप करून ही कला सादर करतात. दशावतारात पॅडल हार्मोनियम, तबला आणि झांज यांसारख्या वाद्यांचा वापर केला जातो. आजही कोकण आणि गोवा पट्ट्यात ही कला अगदी सुंदररित्या साजरी केली जाते. स्थानिक कलाकारांनी ही कला आजही जपून ठेवली आहे.

या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये याच सगळ्या गोष्टींचा उल्लेख पाहायला मिळतोय. याशिवाय आणखी एक वेगळा शब्द कानावर पडतो तो म्हणजे, राखणदार

राखणदार म्हणजे काय... तर राखण करणारा गावाचं, शेताचं एकंदरितच निसर्गाचं राखण करणारा राखणदार. काही ठिकाणी याची देऊळं तर काही ठिकाणी निरनिराळ्या पद्धतीने पूजा केली जाते. राखणदार रक्षण करण्याबरोबरच त्याच्या विरोधात गेल्यास शिक्षाही देण्यास मागेपुढे पाहात नाही.

या चित्रपटात देखील राखणदार आहे. तो देवाचा माणूस आहे. असा डायलॉग ऐकायला मिळतो. तसेच पुढे गावात हत्या होतात. आणि डॅशिंग पोलीसाच्या रोल मध्ये महेश मांजरेकर येतात आणि खऱ्या ट्विस्टला सुरुवात होते. राखणदारानेच हे सगळं केलं असल्याचं गावातील लोकांचं म्हणणं आहे. याचाच शोध पोलीस घेत आहेत. महेश मांजरेकर राखणदाराला मानत नसल्याचं म्हणतात. त्यामुळे राखणदार काय करतो. मांजरेकर या खुणांचा शोध कसा घेतात. हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

दशावतारातील वृद्ध कलाकार म्हणजेच दिलीप प्रभावळकर महाशिवरात्रीला शेवटचा दशावतार करणार असल्याचं ट्रेलरच्या सुरुवातीलाच म्हणतात. शेवटचा दशावतार केल्यानंतर त्यांचा नवस पूर्ण होणार आहे. सस्पेन्स, थ्रीलर, ड्रामा आणि ग्रामीण कोकणचा सुंदर नजारा. असा एकंदरित ट्रेलर पाहायला मिळतोय. अनेकांनी या ट्रेलरला कांतारा आणि अन्य साऊथच्या चित्रपटांशी कंपेर केलं आहे. काहींनी तर याला मराठीतला कांतारा म्हटलंय.

निर्माते, दिग्दर्शक सुबोध खानोलकर म्हणाले की, आपल्या मातीतल्या माणसांची, निसर्गाची, परंपरेची आणि इथल्या भावनांची ही गोष्ट आहे, जी भाषेच्या सीमा ओलांडून सगळ्या जगाला आपलीशी वाटू शकेल. कारण या कथेतला निसर्ग, रूढी परंपरा, माणसं आणि त्यांचे प्रश्न हे फक्त कोकण किंवा महाराष्ट्रापुरते नाहीत, ते जगभरात कमी अधिक फरकाने सारखेच आहेत.

या चित्रपटात विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, आरती वडगबाळकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. येत्या १२ सप्टेंबरला हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.