लाडकी बहिण योजनेबाबत मोठी अपडेट! उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "मार्चपर्यंतचे सगळे पैसे..."
19-Sep-2024
Total Views | 177
बुलढाणा : आम्ही लाडकी बहिण योजनेचे मार्चपर्यंतचे सगळे पैसे ठेवले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. गुरुवारी बुलढाण्यात लाडकी बहिण योजनेचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. तसेच लाडकी बहिण ही देशातली क्रांतीकारी योजना महाराष्ट्रात सुरु झाली असल्याचेही ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बेटी बचाओ, बेटी पढाओ पासून तर लखपती दीदीपर्यंत कार्यक्रम सुरु केलेत. येत्या काळात महाराष्ट्रात किमान १ कोटी महिलांना लखपती दीदी बनवायचं, असा निर्धार आम्ही केला. मोदीजींनी जे सांगितलं तेच या महाराष्ट्रात मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वात आम्ही सुरु केलं. देशातली क्रांतीकारी योजना महाराष्ट्रात सुरु झाली. आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जाणं सुरु झालं. लाडकी बहिण सुरु झाल्यावर ही फसवी योजना असल्याचे आमचे विरोधक म्हणाले. पण आतापर्यंत १ कोटी ६० लाख खात्यात गेले आणि आता पुन्हा २ कोटींच्या वर खात्यात पैसे जाणार आहेत. आम्ही मार्चपर्यंतचे सगळे पैसे ठेवले आहेत. तुमच्या आशिर्वादाने मार्चमध्ये पुन्हा बजेट मांडू आणि मार्च २०२६ पर्यंतचे पैसे ठेवू. पण काहीही झालं तरी पुढचे पाच वर्ष ही योजना सुरु राहील, अशी तजवीज केली आहे."
"आमचं सरकार आल्यावर आम्ही लाडकी बहिण योजना बंद करु, असं काँग्रेसचे माजी मंत्री कालपरवा म्हणाले. काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे निवडणूक प्रमुख अनिल वडपल्लीवार हे या योजनेच्या विरोधात कोर्टात गेले. पण काहीही झालं तरी आम्ही ही योजना बंद होऊ देणार नाही," असे आश्वासनही त्यांनी दिले.