मुंबई (विशेष प्रतिनिधी) - वन्यजीव अभ्यासक श्रीकर अष्टपुत्रे यांचे गुरूवार दि. ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी हद्यविकाराच्या तीव्र झटक्याने पुण्यात निधन झाले. साताऱ्यातील जोर-जांभळी संवर्धन राखीव क्षेत्राच्या निर्मितीसाठी त्यांनी पायाभूत काम केले होते. श्रीकर अष्टपुत्रे हे एका आयटी कंपनीमध्ये काम करत होते. परंतु वन्यजीव क्षेत्राच्या आवडीमुळे त्यांनी या क्षेत्रातील तांत्रिक ज्ञान अवगत करून वन्यजीव अभ्यासाला सुरूवात केली.
पुण्यातील नोकरी सांभाळून त्यांनी शनिवार-रविवार या वेळेत जोर जांभळी जंगलात फिरून स्वतः खरेदी केलेल्या कॅमेराट्रॅपच्या माध्यमातून वन्यजीवांची नोंद केली. याशिवाय स्थानिकांशी चर्चा करून या क्षेत्राच्या संरक्षणासाठी त्यांचे मन वळवले. तसेच वन विभागासोबत पाठपुरावा देखील केला. त्यांनी केलेल्या या सर्व कामांमुळे २०२१ साली वन विभागाने जोर-जांभळी येथील क्षेत्राला संवर्धन राखीव वनक्षेत्राचा दर्जा दिला. याशिवाय त्यांनी भोर-ताम्हिणी या भागातही काम केले होते. मे महिन्यात दै. मुंबई तरूण भारतकडून देवरूख येथे आयोजित केलेल्या रानकुत्रा संवर्धन कृती आराखडा बैठकीला ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी उत्तर सह्याद्रीमधील रानकुत्र्यांच्या अधिवासाविषयी सविस्तर सादरीकरण केले होते.
दि. ८ ऑगस्टला अष्टपुत्रे यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचवेळी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास त्यांना हद्याविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचे निधन झाले. ते ४४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.