उद्योगिनी प्रतिष्ठानतर्फे महिला उद्योजकांसाठी भव्य ग्राहक पेठ
17-Aug-2024
Total Views | 53
मुंबई : उद्योगिनी प्रतिष्ठानतर्फे गणेशोत्सवापूर्वी महिला उद्योजकांसाठी भव्य ग्राहक पेठेचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य ग्राहक पेठेचे उद्घाटन मॉरिशस प्रजासत्ताक कौन्सुल आणि मिशन कौन्सुलेटचे प्रमुख दुशांत बुक्तोवार, संयोजिका व उद्योजिका मीनल मोहाडीकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
दरम्यान, उद्योगिनी प्रतिष्ठान महिला व लघुउद्योजकांच्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी या उद्देशाने गणपती सणपूर्वी भव्य ग्राहक पेठेचे आयोजन करत असते. विशेष म्हणजे भव्य ग्राहक पेठ दि. १५ ते १८ ऑगस्ट या कालावधीत सकाळी ११ ते रात्री ०८ पर्यंत स्काऊट हॉल, शिवाजी पार्क, दादर(पश्चिम) येथे विनामूल्य आयोजन करण्यात आले आहे.
प्रमुख पाहुणे दुशांत बुक्तोवार यांनी महिला व लघु उद्योजकांना बाजारपेठ मिळवून दिल्याबद्दल संयोजकांचे कौतुक केले व सर्व उद्योजकांना शुभेच्छादेखील दिल्या. या ग्राहक पेठेत गणपती सजावटीच्या वस्तू, ज्वेलरी, साडया, लहान मुलांचे कपडे, गाऊन्स टी शर्ट, अगरबत्ती, अत्तरे, बॅग्ज, लोणचे, मुखवास, कुर्तीज, मॅजिक मॉप, अंडर गारमेंट, पंजाबी ड्रेस, गाईचे तूप, बेडशीट्स, खाद्य पदार्थ अनेक वस्तू आपणास पाहावयास मिळणार आहेत.