महाराष्ट्र भाजपमध्ये कोणताही बदल नाही - केंद्रीय मंत्री पियूष गोयल

विधानसभा निवडणूक मजबुतीने लढणार - देवेंद्र फडणवीस

    18-Jun-2024
Total Views | 68
Maharashtra BJP

नवी दिल्ली: (विशेष प्रतिनिधी) आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपमध्ये कोणताही बदल होणार नाही, असे केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी मंगळवारी स्पष्ट केले आहे. त्याचवेळी विधानसभा निवडणूक मजबुतीने लढणार असल्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. भाजपच्या दिनदयाल उपाध्याय मार्गावरील मुख्यालयात महाराष्ट्र भाजपची सुकाणू समिती आणि भाजपच्या केंद्रीय नेत्यांची बैठक झाली. यावेळी केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी महाराष्ट्र भाजपमधील बदलांच्या चर्चेस पूर्णविराम दिला आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणार नसून महायुती - रालोआचे सरकार राज्यात येण्यासाठी सर्वजण सज्ज आहेत. त्यामुळे बदल करण्याचा प्रश्नच नसल्याचे गोयल यांनी सांगितले आहे.

बैठकीत लोकसभा आणि आगामी विधानसभा निवडणुकीवर चर्चा झाल्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, येत्या विधानसभा निवडणुकीच्या रणानितीवर प्राथमिक चर्चा करण्यात आली. महायुतीच्या सर्व घटकपक्षांसोबत विधानसभा निवडणुकीमध्ये कसा विजय मिळवता येईल, यावर खल करण्यात आला. लवकरच घटकपक्षांसोबत चर्चा करून एकत्रित निवडणूक लढविण्याविषयी चर्चा केली जाणार असल्याचेही ते म्हणाले.त्याचप्रमाणे यावेळी लोकसभा निवडणुकीच्या निकालावर सविस्तर चर्चा झाली. त्यामध्ये मिळालेल्या मतांची स्थिती, मते कोठे वाढली आणि कमी झाली; कोणकोणत्या मुद्द्यांचा प्रभाव होता, त्याचा आढावा घेण्यात आला.

बैठकीस केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रकाश नड्डा, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, राष्ट्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोष, केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयुष गोयल, महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव, सहप्रभारी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते. त्याचप्रमाणे बैठकीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे आदी उपस्थित होते.





अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121