कोलकाता पुन्हा हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, माजी विद्यार्थ्यासह तीन जणांना अटक

    27-Jun-2025   
Total Views |

कोलकाता : (Kolkata Law College Gang-Rape Case) कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेजच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाला एक वर्षही पूर्ण होत नाही तोवर कोलकात्याच्याच विधी महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना २५ जूनच्या संध्याकाळी घडली असून, या प्रकरणी पोलिसांकडून तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

कोलकाता पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपींमध्ये महाविद्यालयातील एक माजी विद्यार्थी आणि दोन विद्यमान विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पीडित विद्यार्थिनीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, २५ जून रोजी संध्याकाळी ७.३० पासून ते १०.५० च्या दरम्यान आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तिला महाविद्यालयाच्या एका रुममध्ये बोलावून घेतले. आरोपींमध्ये ३० वर्षीय मनोजित मिश्रा, २० वर्षीय प्रमित मुखर्जी आणि १९ वर्षीय झैब अहमद यांचा समावेश आहे. त्यापैकी एक माजी विद्यार्थी आहे आणि बाकीचे कॉलेजचे सध्याचे विद्यार्थी आहेत.

कोलकाता नॅशनल मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. एफआयआरमध्ये नाव असलेल्या दोन आरोपींपैकी मनोजित मिश्रा आणि झैब अहमद या दोघांना गुरुवारी २६ जूनला संध्याकाळी ७.३० वाजता तलबागन क्रॉसिंगजवळील सिद्धार्थ शंकर शिशु रॉय उद्यान येथून अटक करण्यात आली. तरतिसरा आरोपी प्रमित मुखर्जी याला २६ जूनच्या मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास त्याच्या निवासस्थानी अटक करण्यात आली. या तिन्ही आरोपींचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. या तिघांनाही दक्षिण २४ परगणा येथील अलीपूर येथील एसीजेएम न्यायालयात हजर केले जाईल आणि योग्य तपासासाठी पोलिस कोठडीची मागणी केली जाणार असल्याची माहिती आहे.

ऑगस्ट २०२४ मध्ये आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्यानंतर जवळजवळ दहा महिन्यांनी सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. कॉलेजच्या आवारात एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्कारामुळे कोलकातामध्ये सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.




अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\