गांधीनगर : (Ahmedabad Jagannath Rath Yatra) गुजरातमधील अहमदाबाद शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही जगन्नाथ रथयात्रेच्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र यंदाच्या रथयात्रा एका थरारक घटनेमुळे चर्चेत आली आहे. रथयात्रेच्या उत्सवातील सहभागी १८ हत्तींच्या मिरवणुकीतील एक नर हत्ती अचानक नियंत्रणाबाहेर गेला आणि भाविकांच्या गर्दीतून सैरावैरा पळू लागला.
या घटनेमुळे आसपासच्या संपूर्ण परिसरात गोंधळ निर्माण झाल्याने हजारो भाविक जीव वाचवण्यासाठी धावू लागले. यात चार जण जखमी झाल्याची माहिती आहे. शुक्रवारी २७ जूनच्या सकाळी सव्वा दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे.
कमला नेहरू प्राणी उद्यानाचे अधीक्षक आर.के. साहू यांनी सांगितले की, "१८ हत्तींपैकी एक नर हत्ती अचानक चिडला आणि मिरवणुकीच्या रस्त्यापासून दूर पळू लागला. माहूतांनी त्या हत्तीचा पाठलाग करत त्याला नियंत्रणात आणले. नियमांचे पालन करून, हत्तीला ताबडतोब ट्रँक्विलायझर इंजेक्शन देण्यात आले. आमच्या मानक सुरक्षा धोरणांनुसार, त्याला गर्दीपासून हळूवारपणे दूर नेण्यासाठी दोन मादी हत्तींचा वापर करण्यात आला," असे साहू म्हणाले.
जरी काही काळासाठी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. अहमदाबादमधील ही रथयात्रा शहरातील सर्वात महत्त्वाच्या धार्मिक कार्यक्रमांपैकी एक असून दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या भाविकांची गर्दी आणि हत्ती या सगळ्याच्या व्यवस्थापनासाठी विस्तृत व्यवस्था केली जाते.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\