जेरुसलेम : (Israel) इस्रायलला खामेनींना संपवायचे होते, परंतु तशी संधी मिळाली नाही, असे इस्रायलचे संरक्षण मंत्री काट्झ यांनी गुरुवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. इराण- इस्रायल संघर्षादरम्यान इस्रायलने अनेक उच्च इराणी अधिकाऱ्यांना मारल्यामुळे सावध होऊन खामेनी भूमिगत झाले, असेही काट्झ यांनी म्हटले आहे.
कान पब्लिक टेलिव्हिजनला दिलेल्या मुलाखतीत काट्झ म्हणाले, "इस्रायलला खामेनींना संपवायचे होते, पण तशी संधी मिळाली नाही, जर खामेनी आमच्या आवाक्यात असते तर आम्ही त्यांना मारले असते. संघर्षादरम्यान इस्रायलने सुरूवातीस अनेक उच्च इराणी कमांडर आणि अणुशास्त्रज्ञांना ठार केल्यामुळे खामेनी भूमिगत झाले आणि त्यामुळे त्यांची हत्या टळली". यानंतर जेव्हा काट्झ यांना विचारण्यात आले की, इस्रायलने अमेरिकेची परवानगी घेतली आहे का, तेव्हा त्यांनी उत्तर दिले, "या गोष्टींसाठी आम्हाला कोणाच्याही परवानगीची गरज नाही."
दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर, आता अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी पुन्हा एकदा सांगितले आहे की, २२ जून रोजी झालेल्या हल्ल्यात इराणची अणुकेंद्र पूर्णपणे नष्ट झाली आहेत. हेगसेथ यांनी संयुक्त प्रमुखांच्या प्रमुख जनरल डॅन केन यांच्यासमवेत संरक्षण विभागाचे मुख्यालय पेंटागॉन येथे इराण हल्ल्यावर माध्यमांना संबोधित केले. हेगसेथ म्हणाले, "अमेरिकेचा इराणवरील हल्ला हा ऐतिहासिकदृष्ट्या यशस्वी हल्ला होता." हल्ल्यांमुळे इराणच्या अणुकार्यक्रमांचे किरकोळ नुकसान झाल्याचे गुप्तचर अहवालात म्हटले आहे, त्याबद्दल माहिती दिल्याबद्दल हेगसेथ यांनी पत्रकारांना फटकारले.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\