डोंबिवली, डोंबिवलीतील आर्यन अजित शिरवळकर याने आफ्रिका खंडातील टांझानिया येथे असलेले सर्वाच्च शिखर किलिमांजारो सर करण्याचा पराक्रम केला आहे. 19 हजार फूटावर असलेले हे शिखर, तेही उणे 20(-20) तापमानात सर करण्याचे विक्रम आर्यन यांनी केल्याने डोंबिवलीकरांची मान उंचावली आहे.
आर्यन गेल्या सात वर्षाहून अधिक काळ आउटडोअर क्षेत्रात कार्यरत असून त्याने भारतातील विविध निसर्गरम्य भागांमध्ये चारशे हून अधिक ट्रेक्स आणि ॲडव्हेंचर अनुभवांचे नेतृत्व केले आहे. ज्यामध्ये डे ट्रेक्स, मल्टी डे बॅकपॅकिंग ट्रिप्स आणि हिमालयातील ट्रेक्स याचा समावेश आहे. आर्यनने किलिमांजारोसाठी 4 जुलै ला प्रवास डोंबिवलीतून सुरू केला होता. तर 6 ते 13 जुलै असा त्याचा प्रवास असून तो 16 जुलै ला यशस्वीरित्या डोंबिवलीत परत आला. विशेष म्हणजे आर्यनने ही कामगिरी वयाच्या 23 व्या वर्षी पूर्ण केली आहे. सध्या तो फूटप्रिंट ॲडव्हेंचर्स मध्ये सहसंस्थापक आहे. या प्रवासात आर्यनच्या नेतृत्व क्षमतेत आणि सुरक्षितता व्यवस्थापनातील आवडीत अधिकच वृध्दी झाली. आर्यनने माउंटेनेअरिंग इन्स्ट्रक्टर कोर्स पूर्ण केला आहे. तिथे त्याने बेसिक माउंटेनेअरिंग कोर्समधील प्रशिक्षणार्थ्याना काही महत्त्वाची व्याख्याने ही दिली आहेत. याशिवाय त्याने हनिफल सेंटर येथून आऊटडोअर लीडरशिप कोर्स पूर्ण केला आहे. त्याने विल्डरनेस् फर्स्ट रिस्पॉन्डर (WFR) प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. आतापर्यत आर्यन ने दहा पेक्षा जास्त प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. सर्व कोर्सेसमध्ये अल्फा ग्रेड मिळविला आहे. याव्यतिरिक्त आर्यनने, महाराष्ट्रातील विविध कंपन्यांसाठी प्राथमिक उपचार, आउटडोअर शिक्षण,नेतृत्व कौशल्ये आणि समस्यांचे निराकरण यावर कार्यशाळा आणि प्रशिक्षण सत्रे घेतली आहेत. जेणेकरून अधिकाधिक लोकांना सुरक्षित व जबाबदारपणे निसर्गाशी जोडता येईल असे आर्यन कडून सांगण्यात आले.