नवी दिल्ली, देशाचे माजी अर्थमंत्री दिवंगत अरुण जेटली यांनी आपल्याला २०२० साली धमकी दिली होती, असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. मात्र, राहुल गांधी यांचा हा दावा भाजपने फेटाळून लावला असून तो खोटा असल्याचे म्हटले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी काँग्रेसच्या वार्षिक लीगल कॉन्क्लेवमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. कार्यक्रमात राहुल गांधी म्हणाले, कृषी कायद्यांविरोधात काँग्रेस पक्ष लढत होता. त्यावेळी अरुण जेटली यांना मला धमकी द्यायला पाठवण्यात आले होते. त्यांनी आपल्याला सांगितले की, आपण सरकारचा विरोध करत राहिलो तर आपल्यावर कारवाई करण्यात येईल. मात्र, आपण त्यांच्या धमकीकडे लक्ष दिले नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी यांचा हा दावा भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी खोडून काढला आहे. ते म्हणावे, राहुल गांधी असा दावा करत आहेत की जेटली यांनी त्यांना 2020 मध्ये कृषी कायद्यांबाबत धमकावले. प्रत्यक्षात, जेटली यांचे निधन 24 ऑगस्ट 2019 रोजी झाले होते. कृषी कायद्यांचा मसुदा 3 जून 2020 रोजी मंत्रिमंडळासमोर आला आणि हे कायदे सप्टेंबर 2020 मध्ये मंजूर झाले, असे मालवीय यांनी म्हटले आहे.
धमकी देणे हा माझ्या वडिलांचा स्वभाव नव्हता – रोहन जेटली
अरुण जेटली यांचे पुत्र आणि वकील असलेले रोहन जेटली यांनीही राहुल गांधींवर निशाणा साधला. ते म्हणाले, राहुल गांधी असा दावा करत आहेत की माझ्या वडिलांनी त्यांना कृषी कायद्यांबाबत धमकावले होते. मी त्यांना आठवण करून देतो की माझ्या वडिलांचे निधन 2019 मध्ये झाले, तर कृषी कायदे 2020 मध्ये आले. माझ्या वडिलांच्या स्वभाव ह कधीही कोणालाही धमकावण्याचा नव्हता. ते एक कट्टर लोकशाहीवादी होते. ते नेहमी खुला संवाद आणि सामूहिक निर्णयावर विश्वास ठेवत. त्यांची हीच खरी लोकशाहीविषयक ओळख होती. राहुल गांधींनी अशा दिवंगत नेत्यांबद्दल बोलताना संवेदनशीलता आणि सत्याचे भान ठेवावे. यापूर्वी दिवंगत मनोहर पर्रिकर यांच्याविषयीदेखील राहुल गांधी यांनी हाच प्रकार केल्याचीही आठवण त्यांनी करून दिली.