नवी दिल्ली, संसदेत ‘ऑपरेशन सिंदूर’वर २५ तासांची चर्चा होणार आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) पाक-समर्थित दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करण्यासाठी भारतीय सैन्याने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर लोकसभेत १६ तास चर्चा होईल. राज्यसभेत या मुद्द्यावर ९ तास चर्चा होईल. हा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तथापि, पुढील आठवड्यात ही चर्चा कधी सुरू होईल हे अद्याप निश्चित झालेले नाही.
कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत केंद्र सरकारतर्फे असे नमूद करण्यात आले की, पंतप्रधान मोदी या आठवड्यात परदेश दौऱ्यावर जात असल्याने, सभागृहात त्यांच्या उपस्थितीत चर्चा पुढील आठवड्यातच शक्य होईल. यावर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आक्षेप घेतला की या आठवड्याच्या सरकारी अजेंड्यात या विषयावर चर्चेची त्यांची मागणी उल्लेख नाही. चर्चेवेळी केंद्रीय गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री देखील उपस्थित राहावेत असे मत विरोधकांनी व्यक्त केले. त्याचवेळी काही विरोधी पक्षाच्या सदस्यांनी बिहारमधील मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावृत्ती आणि मणिपूरमधील परिस्थितीवरही चर्चा करण्याची मागणी केली आहे.
याशिवाय, 'भारतीय टपाल विधेयक' वर लोकसभेत ३ तासांची चर्चा निश्चित करण्यात आली आहे. तसेच, 'आयकर सुधारणा विधेयक' वर लोकसभेत १२ तासांची सविस्तर चर्चा होईल. याशिवाय, 'राष्ट्रीय क्रीडा विधेयक' वर ८ तासांची चर्चा आणि 'मणिपूर अर्थसंकल्प' वर २ तासांची चर्चा होईल. यासोबतच, तेलुगू देसम पक्षाने १९७५ च्या आणीबाणीच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त चर्चेची मागणी केली आहे. त्याचवेळी, भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी हिमाचल प्रदेशातील पाऊस आणि पूर परिस्थितीवर चर्चा करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांनी घेतली उच्चस्तरीय बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी संसद भवनात एक उच्चस्तरीय बैठकही झाली. या बैठकीस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रकाश नड्डा, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, कायदा मंत्री अर्जुन मेघवाल, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू आणि कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बैठक संसद अधिवेशनासंदर्भात आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये अधिवेशनाची रूपरेषा, कायदेविषयक अजेंडा आणि विरोधकांकडून संभाव्य रणनीती यावर चर्चा करण्यात आल्याचे समजते.
लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षाच्या खासदारांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'पहलगाम दहशतवादी हल्ला' यावर सभागृहात चर्चा करण्याची मागणी करत घोषणाबाजी केली, ज्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी प्रथम सभागृहाचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत आणि नंतर २ वाजेपर्यंत तहकूब केले. लोकसभेच्या कामकाजात व्यत्यय आणल्याबद्दल राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला जबाबदार धरले. आपण विरोधी पक्षनेता असूनही आपल्याला बोलू दिले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचप्रमाणे राज्यसभेतही विरोधी पक्षांनी 'ऑपरेशन सिंदूर'सह अन्य विषयांवर चर्चेची मागणी करून गदारोळ केला.