राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेले नाळेचे नाते घट्ट ठेवून एका बाजूला सीमेन्ससारख्या बलाढ्य मल्टीनॅशनल कंपनीत प्रसिद्धी प्रमुख म्हणून ‘कॉर्पोरेट’ मध्ये ‘करियर’ तर दुसरीकडे तत्वनिष्ठ राजकारणी, आमदारही झालेल्या कै. मधु देवळेकर यांना त्यांचे समकालीन सहकारी राम नाईक यांची आदरांजली.
मुंबई पदवीधर निवडणुका जाहीर झाल्या आहेत. सर्वत्र त्याची चर्चा आहे. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जोमाने काम करताना दिसताहेत. साहजिकच माझं मन आम्ही जिंकलेल्या मुंबई पदवीधर निवडणुकीच्या काळात पोहोचलं. ते आणीबाणीचे दिवस होते. दडपशाहीच्या वातावरणामुळे जोमाने कामाला लागू असे आम्ही मोजकेच कार्यकर्ते त्यावेळी तुरुंगाबाहेर होतो. मुंबई जनसंघाचा संघटन मंत्री म्हणून या निवडणुकीची मुख्य जबाबदारी माझ्यावरच होती. आमचे अध्यक्ष जे. टी. वाधवानी अटकेत होते आणि दोन्ही उमेदवार – डॉ. वसंतकुमार पंडित व प्रा. ग.भा.कानिटकर हेही तुरुंगातच होते. माझ्या बरोबरीने कामाला वाहून घेतील अशा सहकार्यांची संख्या भले मोठी नव्हती, पण जे होते त्यांची गुणवत्ता, निष्ठा आणि कामाचा आवाका मात्र दांडगा होता.
आणीबाणीतही पदवीधर निवडणुकीत विजय
मुंबई स्तरावर आम्ही तिघे होतो. डबल – डेकर बस निर्माण करणाऱ्या तसेच मोठ्या प्रमाणावर स्टील फर्निचर बनविणाऱ्या तत्कालीन खीरा स्टील वर्क्स या प्रसिद्ध कंपनीच्या कंपनी सेक्रेटरीपदाचा राजीनामा देऊन जनसंघाचे पूर्णवेळ काम सुरु केलेला मी, बर्मा शेल (सध्याचे भारत पेट्रोलियम) मध्ये काम करणारे श्री बबनराव कुलकर्णी आणि ‘सीमेन्स’ या बलाढ्य कंपनीचे उच्च पदस्थ अधिकारी मधु देवळेकर! व्यावसायिक कंपन्यांमध्ये काम केल्याने अंगी आलेल्या कार्यतत्परतेला संघ शिस्तीची जोड आणि उरी बाळगलेले जनसंघाचे स्वप्न आम्हा तिघांकडेही होते. कार्यकर्ते कमी उपलब्ध होते तरी व्यवस्थित नियोजनामुळे प्रत्येक मतदारापर्यंत तीन-तीनदा आम्ही पोहोचू शकलो; आणीबाणीचा निषेध नोंदविण्यासाठी धाडसाने बाहेर पडून मतदान करायला मतदारांना प्रोत्साहित करू शकलो आणि किमया घडली! त्यावेळी मुंबई पदवीधर मतदार संघाच्या दोन जागा असत. दोन्ही जागांवर तुरुंगात असलेल्या भारतीय जनसंघाच्या उमेदवारांनी (डॉ. वसंत कुमार पंडित आणि प्रा. ग.भा.कानिटकर) दणदणीत विजय मिळविला. आपण संघटीतपणे चांगले काम करू शकतो याचा विश्वास आम्हां तिघांच्या मनात निर्माण झाला. दुर्दैवाने आणीबाणीच्या काळातच बबनरावांचे लोकलमध्ये प्रवास करत असताना आकस्मिक निधन झाले. पण माझे आणि देवळेकरांचे द्वैत अखंड राहिले.

(पक्ष स्थापनेनंतर भारतीय जनता पार्टीच्या डिसेंबर 1980 मध्ये मुंबईतील पहिल्या महाअधिवेशनासाठी आलेल्या अटल बिहारी वाजपेयी व लालकृष्ण आडवाणी यांना विमानतळावरून अधिवेशनासाठी नेताना राम नाईक व (स्वेटर घातलेले) मधु देवळेकर)
अध्यक्ष – महामंत्री जोडगोळी
आणीबाणी संपली. सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. मी मुंबईचा अध्यक्ष झालो. त्या सर्वदलीय राजकारणातही माझ्या कार्यकारिणीत देवळेकरांचा सचिव म्हणून सहभाग होईल हे आम्ही पहिले. एवढेच नव्हे तर त्यांच्याकडे पक्षाच्या प्रसिद्धीचीही पूर्ण जबाबदारी दिली. पुढे 1980 मध्ये भारतीय जनता पार्टी स्थापन झाल्यावरही मी अध्यक्ष आणि ते महामंत्री हेच गणित नेहमी राहिले. स्थापनेनंतर डिसेंबर 1980 मध्ये झालेले भाजपाचे पहिले महाअधिवेशन अनेक कारणांनी गाजले. अधिवेशनाची मुख्य जबाबदारी जरी माझ्याकडे होती तरी अधिवेशन अभूतपूर्व झाले ते सामुदायिक कामांनी. देवळेकरांच्या सूचनेवरून या अधिवेशनाला आम्ही न्यायमूर्ती छगला यांना बोलाविले आणि त्यांनी भविष्यवाणी केली “माझ्यासमोर लघु भारत बसला आहे आणि शेजारी भावी पंतप्रधान!”...त्यांच्या मुखाने जणू नियतीच बोलली. 18 वर्षांनी अटलजी पंतप्रधान झाले. इतिहासात त्या भविष्यवाणीची अजरामर नोंद झाली.
पद ही एक व्यवस्था होती पण अनेकानेक कामे आम्ही सर्वार्थाने एक टीम म्हणून करायचो. तू – तू, मैं मैं ला, कोणत्याही अहंकाराला वा स्पर्धेला जराही वावच नव्हता. नाही म्हणायला कोणी परकं समोर नसेल तर एकमेकांची थोडी चेष्टा मस्करी मात्र जरूर चालायची. सीमेन्समध्ये प्रसिद्धीचे काम करणाऱ्या देवळेकरांवर पार्टीच्या प्रसिद्धीचे काम सोपवून आम्ही निर्धास्त असायचो. देवळेकरांचे पत्रकार जगतात आधीपासूनच मित्र होते. पत्रके बनविण्यात आम्ही दोघेही तरबेज होतो. देवळेकरांचा सर्वात मोठा गुण म्हणजे भाषाप्रभुत्व! मराठी, हिंदी, गुजराती व इंग्रजी या चारही भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. मी तयार केलेले मराठी पत्रक अक्षरशः काही मिनिटांत ते इतर भाषांत अनुवादीत करीत. त्यांनी मूळ इंग्रजीत पत्रक करावं व मग नंतर आमच्या तालमीत तयार झालेल्या कार्यालयातील सहकारी मंडळींनी अनुवाद करावेत हे तर नित्याचेच होते. सर्व भाषांत आमची पत्रके येत असल्याने पत्रकारांनाही कमी कष्ट पडत. आता अशा पद्धतीच्या कामांसाठी बहुतेक राजकीय पक्षांना व्यावसायिक नेमणुका कराव्या लागतात. देवळेकरांनी आपली व्यावसायिक जबाबदारी सांभाळून अव्याहत अनेक वर्षे हे काम भारतीय जनता पार्टीसाठी केले. भाजपा मुंबईत रुजविण्यात आणि पसरविण्यात या प्रसिद्धी कामाचा मोठा वाटा आहे. संघशिस्तीचे देवळेकर प्रसिद्धी पत्रक मला दाखविल्याखेरीज प्रसिद्धीला देत नसत कारण मी ‘अध्यक्ष’ म्हणून! मी त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात काय सुधारणा करणार? मग कधी टंकलेखकाच्या चुका काढून स्वल्पविराम, पूर्णविराम टाकायचो आणि देवळेकर मला चेष्टेने ‘Master of Commas and full stop’ म्हणायचे.
नाना पाटेकर व देवळेकर
माझ्या थोड्या रुक्ष स्वभावामुळे बाकी सहकारी क्वचितच माझी चेष्टा करीत. पण देवळेकर संधी सोडत नसत. अर्थात चेष्टा खाजगीत हं. मला आठवतंय एकदा आम्ही दोघं मुंबई विमानतळावर होतो आणि समोरून एकजण आला. आणि त्याने थेट देवळेकरांशी प्रेमाने हस्तांदोलन केलं. आमच्याभोवती बरीच गर्दी जमू लागली. हा काय प्रकार असा माझा विचार चालू असताना देवळेकरांनी त्या व्यक्तीला विचारलं “काय रामभाऊंना ओळखलंस नां?” त्यावर ती व्यक्ती मलाही नमस्कार करीत, “कसं विसरेन? त्यांनीच तर मला तुमच्याकडे पाठविलं होतं” असं म्हणाली. गर्दी जमते आहे हे बघून ‘निघतो मी’ म्हणत ती व्यक्ती झपाट्याने गेली. क्षणात गर्दी ओसरली. ‘अच्छा! म्हणजे ती या माणसासाठी होती तर’ असा विचार करीत मी देवळेकरांना म्हणालो, “काय देवळेकर? तुम्ही एवढे कॉर्पोरेटवाले! त्यांना विचारलंत की मला त्यांनी ओळखलं का, पण मला ते कोण हा परिचय करून दिलाच नाहीत.” देवळेकरांनी ‘काय करू या माणसाचं’ असा दयाभाव आणत मला टोला हाणला, “अहो ते प्रख्यात अभिनेता आहेत. त्यांना अख्खा भारत ओळखतो; म्हणजे तुम्ही सोडून! कारण सिनेमा नावाची चीजच तुम्हाला माहित नाही. त्यांना वाईट वाटलं असतं तुम्ही ओळखलं नाही म्हटल्यावर, म्हणून नाही नाव सांगितलं. अभिनेते असले तरी ‘कमर्शियल आर्टिस्ट’ आहेत ते. उमेदवारीच्या काळात आपल्या पक्ष कार्यालयात काही काम मिळू शकेल का विचारायला आले होते. तेव्हा तुम्ही पक्षाकडे काम नाही पण आमचे देवळेकर मोठ्या कंपनीत प्रसिद्धीचं काम बघतात त्यांना भेटा असं सांगून माझ्याकडे पाठविलं होतंत. मीही दोन-चार छोटी कामं दिली. त्यांनी आठवण ठेवली.” देवळेकरांनी माझी चेष्टा केली खरी पण मी नाना पाटेकरांसारख्या विख्यात कलाकाराला ओळखलं नाही हे देवळेकरांनी कधीही कोणाला सांगितलं नाही. असे होते देवळेकर!
एकत्रच आमदारकी
देवळेकर आणि मी साधारण एकदमच आमदार झालो. जनता पार्टी स्थापनेनंतरच्या विधानसभा निवडणुकीत मी बोरीवलीहून निवडून येऊन आमदार बनलो, तर डॉ. वसंतकुमार पंडित लोकसभेला निवडून गेल्याने इथे मुंबई पदवीधर मतदार संघाची पोटनिवडणूक झाली आणि आमचे उमेदवार श्री मधु देवळेकर भरघोस मतांनी विधान परिषदेवर निवडून आले. आमदार म्हणून प्रभावी काम केल्याने पक्षाचे त्यांनाच पुन्हा दोनदा तिकीट दिले. सुशिक्षित मतदारांनी पुन्हा – पुन्हा निवडून द्यावं असं काम करणाऱ्या देवळेकरांचे महाराष्ट्राच्या इतिहासात नाव नोंदलं जाईल ते अंतुले सिमेंट भ्रष्टाचाराला विधान परिषदेत वाचा फोडण्यासाठी! अंतुले प्रतिष्ठानच्या माध्यमातून सिमेंट वाटपामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अ.र.अंतुले यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला. या प्रकरणी भारतीय जनता पार्टीने तीन आघाड्यांवर लढा उभारला. न्यायालयात थेट मुख्यमंत्र्यांविरुद्ध आमच्या कै. रामदास नायक यांनी खटला दाखल केला. मी मुंबईचा अध्यक्ष होतो, पक्ष पातळीवरून आम्ही मुंबईभर आंदोलनं केली, विधानसभेत मी, हशू आडवाणी, प्रेम शर्मा, जयवंतीबेन महेता तर विधान परिषदेत मधु देवळेकर, प्रा. ग.भा.कानिटकर यांनी या विषयावर सरकारला धारेवर धरायचा चंग बांधला. अंतिमत: अंतुलेंना पदच्युत व्हावं लागलं. एकीकडे हा प्रकार सुरु असताना सामान्य माणसाला थोडा तरी दिलासा हवा म्हणून सरकारच्या सिमेंट वाटप समितीचे सदस्य असलेल्या ज्या भाजपा आमदारांनी सचोटीने खऱ्या अर्थाने मध्यम व निम्नमध्यमवर्गीयांच्या घरांसाठी आपल्या अधिकारातील सिमेंट दिलं त्यात अर्थातच मधु देवळेकर होते. प्रस्थापित काँग्रेस सरकार व मुख्यमंत्री अंतुले यांच्याविरुद्ध खंबीरपणे लढत असतानाच देवळेकरांनी धीराने कौटुंबिक अडचणींवरही मात केली. याच काळात देवळेकर वहिनींना कर्करोग झाला होता. त्या रिझर्व्ह बँकेत अधिकारी होत्या. तिन्ही मुलगे लहान होते. देवळेकरांनी हे सारं निभावातानाच आपली ‘सीमेन्स’ मधली नोकरीही तितक्याच कार्यक्षमतेने सुरु ठेवली. भारतीय जनता पार्टी, मुंबईच्या आजच्या यशामागे कर्तृत्ववान देवळेकरांचा मोलाचा वाटा आहे.

(ऑगस्ट क्रांतिदिनाच्या सुवर्ण जयंती निमित्त 9 ऑगस्ट 1992 रोजी क्रांति मैदानावर देशसेवेच्या शपथेचा पुनरुच्चार करताना अटल बिहारी वाजपेयी यांजसोबत उजवीकडून सर्वश्री मधु देवळेकर, गोपीनाथ मुंडे, राम नाईक, ना.स.फरांदे व अण्णा डांगे)
आतिथ्यशील देवळेकर
जनसंघाच्या दिवसांपासून अगदी 20-22 वर्षांपूर्वीपर्यंत आमचे शीर्षस्थ नेते जेव्हा – जेव्हा मुंबईत यायचे तेव्हा त्यांची ठराविक कार्यकर्त्यांकडे रहायची सोय आम्ही करीत असू. म्हणजे खरं तर ते-ते कार्यकर्तेच निष्ठेने अशावेळी नेतेमंडळींचे आतिथ्य व त्यामुळे करावी लागणारी माणसांची उठबस आनंदाने करीत. अटलजी मुंबईत आले की वेदप्रकाशजींच्या (केंद्रीय मंत्री श्री पीयूष गोयल यांचे वडील) घरी, तर मुरली मनोहर जोशीजी आले तर देवळेकरांच्या घरी आणि जगन्नाथराव जोशी आले की श्री मधुकरराव मंत्री यांच्याकडे मुक्काम हे ठरलेले असे. खरं तर देवळेकर वहिनीही रिझर्व्ह बँकेत नोकरी करत; घरी बहीण, तीन लहान मुले तरीही देवळेकर पती – पत्नींचे छोटेखानी घर हीच मुरली मनोहरजींची आवडीची जागा असे. कामाच्या डोंगराला न घाबरणारे देवळेकर थंडीला मात्र घाबरायचे. नागपूरच्या अधिवेशनात एकत्र दिवसभराचे काम संपले की तसा निवांतपणा असायचा. जेवून एकत्र गप्पा-टप्पा हा आम्हा भाजपा आमदारांचा दिनक्रम. आज रात्री जेवणाला देवळेकर काय – काय घालून येणार त्याचे आम्ही अंदाज बांधायचो. साधारणता: डोळे, नाक आणि ओठ वगळता सर्व काही नखशिखान्त आच्छादून देवळेकर यायचे. स्वेटरच्या जोडीला कानटोपी, मफलर असायचाच. मग त्यावरून आम्ही त्यांची चेष्टा करायचो आणि ते स्वतःही आमच्याबरोबरीने हसायचे. जेवणानंतर मी निवांत असायचो पण देवळेकरांना काही ना काही लेखन – वाचन करायचं असायचंच.
लेखक देवळेकर
प्रसिद्धी प्रमुख म्हणून त्यांच्या लेखन कौशल्याचा पार्टीला फायदा होई. पण खरं तर त्यांचे लेखन कौशल्य खूप अधिक व्याप्तीचे होते. पार्टीच्या मुख्य प्रवाहातून थोडं लांब झाल्यावर स्वस्थ न बसता त्यांनी एकापेक्षा एक विपुल लेखन केले. बुद्धीवादी संघ स्वयंसेवक त्यांच्या शब्दा-शब्दातून दिसायचा. मात्र त्यांचं लेखन प्रचारकी थाटाचं नव्हतं. संशोधक वृत्तीने लिहिलेली त्यांची पुस्तकं अन्य विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनाआणि अभ्यासकांनाही मोलाची वाटत. मला वाटतं गेल्यावर्षी जुलैमध्ये देवळेकर वहिनींचे निधन झाल्यानंतर मी शेवटचा त्यांच्या घरी गेलो. खूप वेळ आम्ही बोलत बसलो होतो. तेव्हाही मी अजून वाचलं नाही म्हणताच त्यांनी त्यांची दोन पुस्तकं मला दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक प.पू. डॉ. हेडगेवार यांच्यावर त्यांनी लिहिले ‘युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार’ व प.पू. गुरुजींवर लिहिलेले ‘विज्ञाननिष्ठ श्री गुरुजी’ ही ती दोन पुस्तकं होती. ज्या दोन महनीय व्यक्तीत्वांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही दोघांनीही काम केलं त्यांच्यावरची पुस्तके ही मला देवळेकरांनी दिलेली शेवटची भेट. आजन्म जपावी अशी! देवळेकर परत भेट देण्यापलीकडे गेले असले तरी दीर्घ काळानंतर पुन्हा एकदा मुंबई पदवीधर मतदार संघातून भाजपाचाच आमदार निवडून आणून आम्ही कार्यकर्ते तो विजय त्यांना अर्पण करू, हाच आमचा संकल्प! आणि हीच आमची श्रद्धांजली!
राम नाईक
माजी राज्यपाल, उत्तर प्रदेश
ईमेल: me@ramnaik.com