जितेंद्र आव्हाडांवर फौजदारी गुन्हा दाखल करुन अटक करा; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांच्या नेतृत्वात ठाण्यात निषेध आंदोलन
29-May-2024
Total Views | 177
ठाणे : महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडून बाबासाहेबांचा अवमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन अटक करा, अशी जाहीर मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. बुधवारी राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे आणि प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात निषेध आंदोलन करण्यात आले. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली.
जितेंद्र आव्हाड हे डॉक्टर जितेंद्र आव्हाड नसून ते नकलाकार, नाटककार आणि नौटंकीकार जितेंद्र आव्हाड आहेत. आज परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो असलेले पोस्टर त्यांनी फाडून टाकले. त्यामुळे त्यांच्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल किती श्रद्धा आणि निष्ठा आहे हे दिसून आले. मनुस्मृतीचा विरोध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करते. कुठल्याही परिस्थितीत मनुस्मृतीचे श्लोक पाठ्यपुस्तकात येणार नाहीत ही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची स्पष्ट भूमिका आहे. पण ज्यांना नाटक करायची सवय आहे. ते आंदोलन करायला महाडला गेले आणि आंदोलन करण्याच्या भरात परमपूज्य, महामानव, बोधिसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान त्यांनी केला आहे."
"बाबासाहेबांच्या अवमानप्रकरणी महाड येथील पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्याबरोबर फोटोत दिसणाऱ्या सर्वांवर फौजदारी गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करायला हवी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे," अशी माहिती आनंद परांजपे यांनी दिली.
यावेळी बोलताना नजीब मुल्ला म्हणाले की, "जितेंद्र आव्हाड हे नाटककार आहेत. त्यांचे खाली डोके वरती पाय अशी स्थिती झालेली आहे. मनुस्मृती जाळायला गेले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडून आले. स्वतःला पुरोगामी म्हणायचे आणि असे कृत्य करायचे हे शोभनीय नाही. आज त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. यामुळे बाबासाहेबांच्या अवमानप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात तातडीने गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी," असे ते म्हणाले.