मतदानाविषयी दिशाभूल करणाऱ्यांना उत्तर देणार – मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार
25-May-2024
Total Views | 79
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीविषयी संशयाचे वातावरण का निर्माण केले जाते आणि त्यामागे कोण आहेत, याचे उत्तर लवकरच देण्यात येईल; असे प्रतिपादन मुख्य केंद्रीय आयुक्त राजीव कुमार यांनी केले आहे.लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात देशाची राजधानी दिल्लीतील सातही लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान झाले. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनीही आपल्या कुटुंबियांसोबत मतदान केले. यावेळी त्यांनी देशातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत चालत असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे निवडणूक प्रक्रियेविषयी दिशाभूल करण्याच्या प्रकारावरही त्यांनी उत्तर दिले आहे.
निवडणूक प्रक्रियेविषयी जाणीवपूर्वक संशयाचे वातावरण निर्माण करण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सत्य तेच निर्देश दिले आहेत. मात्र, असे संशयाचे वातावरण काय तयार करण्यात येते आणि त्यामागे कोण आहे; याची माहिती आहे. अशा प्रकारांमुळे मतदारांमध्ये ईव्हीएम, मतदार यादी आणि मतदानाच्या आकड्याविषयी शंका निर्माण होते. ईव्हीएम ठीक आहेत ना, मतदार यादी योग्य आहे ना आणि मतदानाचा आकडा वाढविण्यात येत नाही ना, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. मात्र, या प्रकारामागे नेमके कोण आहेत आणि त्यांचा मनसुबा काय; याचे उत्तर केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.