पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का! शहराध्यक्षांवर गंभीर आरोप; संगीता तिवारी पक्षाला सोडचिठ्ठी देणार
20-May-2025
Total Views | 30
पुणे : पुण्यातील महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष संगीता तिवारी यांनी पुणे शहराध्यक्षांवर गंभीर आरोप करत पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे महापालिका निवडणूकांचा तोंडावर पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे.
संगीता तिवारी यांनी पुण्याच्या प्रभारी शहराध्यक्षांवर गंभीर आरोप केले आहेत. त्या म्हणाल्या की, "गेले चार पाच महिने मी पक्षापासून खूप अलिप्त आहे. काँग्रेस भवन इथे महिला काँग्रेसचे कार्यालय होते. परंतू, मला पुणे शहराचे प्रभारी अध्यक्ष केल्यानंतर पुण्याच्या शहराध्यक्षांनी माझे ऑफिस बंद केले आणि ते दुसऱ्या सेलच्या कार्यकर्त्याला देण्यात आले. त्यानंतर मी कार्यालय मागून घेण्याचा प्रयत्न करेल असे त्यांना वाटले. त्यामुळे मी ब्राह्मण असल्याने मला त्रास देण्यात आला. माझ्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा कट आखण्यात आला. बरेच दिवस मी काय करायचे याबद्दल विचार केला. पण पुणे काँग्रेसला मी नको आहे हे माझ्या लक्षात आले," असे त्या म्हणाल्या.
राहुल गांधींना १०० ईमेल!
त्या पुढे म्हणाल्या की, "याबाबत मी राहुल गांधींना कमीत कमी १०० मेल केले. नाना पटोलेंनाही फोन आणि मेसेज केले. पण नवीन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्या ऑफिसचे उद्धाटन करून टाकले. त्यामुळे मला न्याय मिळेल ही अपेक्षा संपली. काँग्रेसमध्ये मोजकेच ब्राम्हण लोक आहेत. परंतू, तेसुद्धा काँग्रेसला सांभाळता येत नाहीत. त्यांच्या डोक्यात जातीवाद भरला आहे," असा गंभीर आरोप संगीता तिवारी यांनी केला आहे. तसेच त्यांना दोन पक्षांकडून ऑफर असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
संगीता तिवारी यांच्याकडे काँग्रेसच्या आक्रमक तडफदार नेतृत्व म्हणून पाहिले जाते. त्यांच्या राजीनाम्यानंतर पुण्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडणार आहे. दरम्यान, याबाबत काँग्रेसचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात आणि संगीता तिवारींची पुढची भूमिका काय असे? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.