महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत आज ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी जागावाटपाची घोषणा केली. या जागावाटपात ठाकरे गटाने सांगलीची जागा आपल्या पदरात पाडून घेतली. ज्यामुळे सांगलीतील पलुस-कडेगांव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम आणि काँग्रेसचे नेते तसेच वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांना जोरदार धक्का बसलाय. मुळात मागच्या काही दिवसापासून हे दोन्ही नेते सांगलीची जागा काँग्रेसनेच लढवावी यासाठी आग्रही होते.त्यासाठी त्यांनी दिल्लीला जाऊन काँग्रेस हायकमांडची ही भेट घेतली होती. पण तरीदेखील मविआच्या जागावाटपात ही जागा ठाकरे गटाकडे राहणार असल्याचे निश्चित झाले. ज्यात आता विश्वजीत कदम आणि विशाल पाटील या दोघांचे ही फोन नॉट रिचेबल झाले आहेत, अशी माहिती प्रसारमाध्यमांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. त्यामुळे आता विश्वजीत कदम आणि विशाल पाटील पुढे काय पाऊल उचलतील? या दोन नाराज काँग्रेसी नेत्यामुळे ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचे काय नुकसान होऊ शकते? ठाकरे आणि पवारांसाठी अशा किती जागांवर काँग्रेसला कॉम्प्रोमाइज करावे लागले आहे.
गेल्या ३ दिवसाआधी भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटावर एक गंभीर आरोप केला होता. ते म्हणाले की, सांगलीची जागा सोडण्यासाठी ठाकरे गटाने काँग्रेसकडे १०० कोटी रुपयांची मागणी केल्याची माहिती मला मिळाली आहे, असे विधान राणेंनी केल्यानंतर सांगलीच्या जागेबाबतच्या चर्चा वेगाने वाढल्या. अशावेळी सांगलीची जागा नेमंकी कोणाकडे जाते? असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र दि. ९ एप्रिल रोजी झालेल्या महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत सांगलीची जागा ठाकरे गटाकडे राहणार हे निश्चित झाले. ज्यानंतर सगळ्यात आधी माध्यमांनी काँग्रेसच्या नेत्यांना विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्या नाराजीवर प्रश्न विचारून भांडावून सोडले. ज्या प्रश्नावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, विशाल पाटील, विश्वजीत कदम दोघेही नॉट रिचेबल झाले आहेत. पंरतु हायकमांडच्या आदेशाच सगळे पालन करतील. लोकशाही, संविधान वाचवण्याची ही निवडणूक आहे. त्यांचं समाधान आम्ही करु. पण नाना पटोले एकीकडे हे विधान करत असताना दुसरीकडे विशाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल व्हायला सुरुवात झाली. ज्यात विशाल पाटलांना डावल्याबद्दल कार्यकर्त्यांमधील नाराजी स्पष्ट दिसून आली.
मुळात २७ मार्चला राऊतांनी काँग्रेस- ठाकरे गटात तिढा असणाऱ्या जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार जाहिर केल्यावर काँग्रेसच्या विजय वड्डेटीवार, नाना पटोले यांसारख्या अनेक नेत्यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली होती. त्यावेळी विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी ही सांगलीची जागा काँग्रेसला मिळायला हवी, असा आग्रह धरला होता. त्यामागे मुख्य कारण म्हणजे, सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. आणीबाणीतही न ढासळलेला वसंतदादांचा आणि काँग्रेसचा गड अशी या मतदरासंघाची ओळख. १९६२ ते २०१४ पर्यंत हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात होता. त्यामुळे साहाजिक काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना या मतदारसंघाचे महत्त्व लक्षात आहे. अशावेळी २०१९ ला ऐनवेळी हा मतदारसंघ आघाडीच्या जागावाटपात स्वाभिमानीला मिळाला.पण स्वाभिमानीकडे तगडा उमेदवार नसल्याने त्यांनी काँग्रेसच्या विशाल पाटलांना या मतदारसंघात रिंगणात उतरवले. त्यावेळी भाजपचे संजय काका पाटील विरुद्घ स्वाभिमानीकडून विशाल पाटील अशी लढत झाली. ज्यात १ लाख ४३ हजार मताधिक्य मिळत संजय काका पाटलांनी विजय मिळवला. पण हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने यावेळी विशाल पाटलांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. पंरतु ठाकरेंनी नुकतेच ठाकरे गटात आलेल्या चंद्रहार पाटलांना उमेदवार देऊन एकप्रकारे काँग्रेसला जोरदार धक्का दिला. अशावेळी साहजिकच विशाल पाटीलांनी ठाकरेंच्या निर्णयावर टीका करायला सुरुवात केली. त्यात आमदार विश्वजीत कदमांनी ही विशाल पाटलांची साथ देत, उघडपणे नाराजी बोलून दाखवली.
पण यासगळ्यात विचार करण्यासारखी गोष्ट अशी की, आतापर्यंत महाविकास आघाडीत काँग्रेस मोठा भाऊ म्हणून वावरत होता. पण आता ठाकरेंनी जागावाटपात आघाडी धर्म न पाळत घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसला मवाळ भुमिका का घ्यावी लागत आहे? त्यामुळे मोठा भाऊ आणि राष्ट्रीय पक्ष असून ही २५ जागांसाठी आग्रही असणारी काँग्रेस फक्त १७ जागा लढवणार आहे. अशावेळी ठाकरे आणि पवारांमुळे काँग्रेसला कॉम्प्रोमाइज करावे लागत आहे का? असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जात आहे. कारण महाविकास आघाडीचा एकत्रित निर्णय होण्याआधी ठाकरे १७ उमेदवार घोषित केले होते. ज्यात दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, सांगली या तीन जागांवर काँग्रेस ठाकरे गटासाठी कॉम्प्रोमाइज करते. तर दुसरीकडे काँग्रेसची भिवंडी लोकसभा मतदारसंघाची जागा ही राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे जाते. पण त्याबद्दल चर्चा असणारी सातारा लोकसभेची जागा काँग्रेसला न मिळता. सातारा लोकसभा ही शरद पवार गटालाच दिली जाते. त्यामुळे ठाकरे आणि पवारांसाठी काँग्रेसने आतापर्यंत चार जागांवर पाणी सोडलयं. त्यात मागे काँग्रेस या जागावर मैत्रीपुर्ण लढत करेल, असं ही सांगितले जात होते.
पण काँग्रेसच्या या मैत्रीपुर्ण लढतीच्या निर्णयाचं पुढे काय झालं? असा प्रश्न काँग्रेसमधील स्थानिक नेते विचारू लागले आहेत. दरम्यान विश्वजीत कदम आणि विशाल पाटलांची नाराजी लक्षात घेता, त्यांच्या नाराजीची योग्य दखल काँग्रेस हायकमांडकडून घेतली गेली नाही तर निरुपम यांच्याप्रमाणे काँग्रेस हायकमांडला खडे बोल सूनवत पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय त्यांच्याकडून घेतला जाऊ शकतो. पंरतु अशा निर्णय त्यांनी घेतला तर ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटलांना मात्र ही निवडणुक भारी पडू शकते कारण पलुस-कडेगांव विधानसभा मतदारसंघातून विश्वजित कदमांचे समर्थक चंद्रहार पाटलांचे विरोधक असतील.तर दुसरीकडे विशाल पाटलांनी आधीच अपक्ष लढण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे संजयकाका पाटील यांना आव्हान देण्याच्या जागी सांगलीत महाविकास आघाडीचे उमेदवारचं आपआपसात लढण्याची चिन्ह दिसत आहेत. तरी विशाल पाटील आणि विश्वजीत कदम पुढे काय निर्णय घेतात हे कळलेच,पण ही निवडणुक चंद्रहार पाटलांसाठी सोप्पी नाही हे नक्की.