2022 दरम्यान सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धादरम्यान मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आणि पायाभूत सुविधांचे नुकसानही झाले. त्यामुळे लाखो नागरिकांनी इतर युरोपीय देशांमध्ये आश्रय घेण्यास सुरुवात केली. सद्यस्थिती पाहता रशिया-युक्रेनमधील युद्ध अद्याप थांबलेले नाही. अजूनही दोन्ही देशांना प्रचंड मानवी व आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. शांततापूर्ण वाटाघाटींचे प्रयत्न सुरू असले, तरी ठोस निकाल अजून लागलेला नाही. त्यामुळे सार्या विश्वाचे या दोन्ही राष्ट्रांकडे विशेष लक्ष लागून आहे. अशातच युक्रेनमध्ये सत्तापरिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. राष्ट्राध्यक्ष व्होल्दोमीर झेलेन्सकी यांनी उपपंतप्रधान युलिया स्विरिडेन्को यांना देशाचे पुढील पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्याचा प्रस्ताव दिला असून, यासोबतच त्यांना सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
युलिया स्विरिडेन्को यांना अर्थशास्त्राची पार्श्वभूमी आहे आणि त्यांनी युक्रेनियन सरकारमध्ये विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यांनी आर्थिक विकास आणि व्यापारमंत्री म्हणून तसेच राष्ट्रपती कार्यालयात ‘डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ’ म्हणूनही कामाचा अनुभव आहे. पंतप्रधानपदासाठी झेलेन्सकी यांनी त्यांचे नाव सूचवणे हा एक मोठा निर्णय मानला जातो. गेल्या तीन वर्षांपासून युक्रेन रशियाशी युद्ध लढत असताना त्यांना ही जबाबदारी देण्यात आली.
खरंतर युक्रेनमध्ये सत्तांतरांची ही पहिली वेळ नाही. गेल्या काही दशकांत युक्रेनमध्ये अनेक वेळा सत्तांतर घडले, जे काहीवेळा लोकशाही मार्गाने तर काहीवेळा जनआंदोलनांद्वारे झाले. 2004 साली झालेल्या ‘नारंगी क्रांती’चे उदाहरण पाहिल्यास तेव्हा झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विक्टर यानुकोव्हिच विजयी ठरले. परंतु, निवडणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अपारदर्शकता व फसवणूक झाल्याचे आरोप त्यांच्यावर झाले. यानंतर देशभरात ‘नारंगी क्रांती’ झाली. तेव्हा न्यायालयाच्या आदेशानुसार पुन्हा निवडणूक घेण्यात आली आणि विक्टर राष्ट्राध्यक्ष झाले. 2010 साली जेव्हा विक्टर यानुकोव्हिच पुन्हा युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षापदी विराजमान झाले, तेव्हा त्यांनी रशियाशी मैत्रिपूर्ण धोरण स्वीकारले आणि ‘युरोपियन युनियन’शी करार करण्यास नकार दिला. त्यामुळे नोव्हेंबर 2013 साली ‘युरोमैदान आंदोलन’ सुरू झाले. फेब्रुवारी 2014 साली आंदोलने तीव्र झाली आणि शेवटी यानुकोव्हिच यांनी देश सोडून पलायन केले. संसदने त्यांना राष्ट्राध्यक्ष पदावरून हटवल्यानंतर त्यांच्याजागी पेत्रो पोरोशेंको यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली.
युद्धकाळात सत्ता बदलणे हे कोणत्याही देशासाठी मोठ्या परिणामांसह येणारे प्रकरण असते. आज रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान युक्रेनमध्ये सत्तापरिवर्तन झालेच, तर राजकीय, लष्करी व सामाजिक स्तरावर जितके सकारात्मक परिणाम होऊ शकतात, तितकेच नकारात्मक परिणामही होऊ शकतात. म्हणजेच काय तर राजकीय अस्थिरता वाढू शकते, रशियाचा युक्रेनवरील दबाव वाढू शकतो, रशिया वाटाघाटींसाठी अनुकूल शर्ती लादण्याचा प्रयत्नदेखील करू शकतो. त्याचबरोबर ज्याअर्थी पाश्चात्य देशांनी झेलेन्सकी सरकारला जोरदार समर्थन दिले आहे, त्याअर्थी सरकार बदलल्यास काही देशांचे पाठबळ कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सकारात्मकतेच्या दृष्टीने पाहिल्यास शांततेसाठी वाटाघाटींचा नवीन मार्ग मोकळा होऊ शकतो. नवीन नेतृत्व, विशेषतः जर ते राजनैतिक किंवा तटस्थ भूमिका घेणारे असेल, तर रशियासोबत संवादाची नव्याने संधी निर्माण होऊ शकते. युद्ध थांबवण्यासाठी शांतता कराराचे पर्याय खुले होऊ शकतात. नवीन सरकार आर्थिक विकासावर भर देऊन पुनर्बांधणीसाठी जागतिक मदत आकर्षित करू शकते. स्थानिक असंतोष कमी होण्याचीसुद्धा चिन्ह आहेत, म्हणजेच युद्धामुळे त्रस्त झालेल्या सामान्य जनतेला नव्या नेतृत्वावर आशा वाटू शकते. जर नवनेतृत्वाने जनभावना समजून घेतल्या, तर सामाजिक स्थैर्य निर्माण होऊ शकते. त्यामुळे युक्रेनमध्ये जर झेलेन्सकी यांच्या जागी पंतप्रधान म्हणून युलिया स्विरिडेन्को सत्तेत आल्या, तर रशिया-युक्रेन युद्धाला युद्धविराम लागणार का? आणि तसे न झाल्यास युलिया स्विरिडेन्को यांना युद्धजन्य परिस्थिती कशाप्रकारे हाताळतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.