असे म्हणतात की, व्यक्तीच्या नावातच त्याचा स्वभावही प्रतिबिंबित होत असतो. पण, बिहारच्या माजी मुख्यमंत्री असलेल्या लालू-राबडी दाम्पत्याचे सुपुत्र तेजस्वी यादव याला सर्वस्वी अपवादच ठरावे. कारण, तेजस्वी यांच्या नावात जरी ‘तेज’ असले, तरी त्यांची वाणी आणि कृती ही तेजोहीनच!
याचाच प्रत्यय नुकताच एका पत्रकार परिषदेत आला. बिहारच्या मतदारयादीतील घोळावरून पत्रकारांनी तेजस्वी यादव यांना प्रश्न विचारले. आता प्रश्न विचारणे हे मुळी पत्रकारांचे परम कर्तव्यच. पण, तेजस्वी यांनी पत्रकार आणि निवडणूक आयोगावरच आगपाखड केली. तेजस्वी यादव म्हणाले की, “बिहारच्या मतदारयादीत नेपाळी, बांगलादेशी यांची नावे आढळली आहेत, याची माहिती निवडणूक आयोगाने अधिकृत पत्रक काढून दिली आहे का? ही बातमी तुम्हाला कुणी दिली? सूत्रांच्या हवाल्याने तुम्ही ही बातमी चालवत आहात. हे तेच सूत्र आहेत, ज्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी लाहोर, कराची, इस्लामाबाद जिंकल्याची भाषा केली होती. अशा सूत्रांना आम्ही मूत्र मानतो, ज्याने केवळ दुर्गंधी पसरते.” त्यामुळे सूत्रांची तुलना थेट मुत्राशी करून आपल्या या शाब्दिक कोटीवर टाळ्या पडतील, असे तेजस्वी यादव यांना वाटले असावे. पण, त्यांच्या या अभद्र टिप्पणीवर सत्ताधार्यांसह माध्यमांनीही चांगलेच तोंडसुख घेतले. सूत्रांची विश्वासार्हता हा त्यांच्यादृष्टीने आक्षेपाचा मुद्दा नक्कीच असू शकतो. त्यांनी त्यावर टीकाही जरूर करावी. पण, अशाप्रकारे वडाचे तेल वांग्यावर काढून माध्यमांनाच सरसकट आरोपीच्या पिंजर्यात उभे करणे, हे अपरिपक्व राजकारण्याचेच लक्षण!
म्हणा, बिहारचे उपमुख्यमंत्रिपद भूषविलेल्या तेजस्वी यादवांकडून सभ्य बोली आणि वागणुकीची कोणतीही अपेक्षा मुळी नाहीच. केवळ घराणेशाहीच्या लाभलेल्या वारसामुळे ते राजदचा हिरवा कंदील मिरवत अंधारात आजही चाचपडत आहेत. त्यात तेजस्वी यादव यांची शैक्षणिक पात्रता ही केवळ सहावी उत्तीर्ण. त्यापुढे सचिन तेंडुलकरसारखे क्रिकेटमध्ये करिअर करायचे म्हणून तेजस्वीबाबूने शिक्षणालाही राम राम ठोकला, तो कायमचाच. त्यामुळे आधीच शिक्षणावरून सावळा गोंधळ आणि त्यात घराणेशाहीचा माज! त्याचाच परिणाम म्हणजे, तेजस्वी यादव यांची ही मुखदुर्गंधी!
यादवी ‘जंगलराज’ची कहाणी
आजही दुर्दैवाने बिहारमधील राजकीय इतिहासाचा विचार करता, लालूकालीन ‘जंगलराज’च्या भयाण स्मृतींनी अंगावर अक्षरशः काटा यावा. सन 1995 ते 2005 या दशकात लालूप्रसाद यादव, नंबर राबडीदेवींच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. त्यानंतरही राजद सत्तेत नितीशकुमारांसोबत काही काळ का होईना भागीदार असताना बिहारसाठी ‘जंगलराज’चाच काळ ठरला. राजकीय गुंडांनी कट्टे हातात घेऊन उघड उघड घातलेला हैदोस, व्यापार्यांची, सर्वसामान्यांची लूटमार, खून, दरोडे, बलात्कार, निष्क्रिय पोलीस, हतबल प्रशासन आणि एकूणच राजकीय भ्रष्टाचाराने बरबटलेला हा ‘जंगलराज’चा काळा अध्याय. त्या काळातील बिहारी माणसाच्या मनातून या ‘जंगलराज’च्या पाशवी अत्याचाराच्या स्मृती आजही कायम आहेत. ‘जंगलराज’मध्ये जी गत सर्वसामान्य बिहारी माणसाची, तीच गत माध्यमांचीही.
लालू यादवांच्या, राजदच्या विरोधात वार्तांकन करणार्या पत्रकारांना आपला जीवही गमवावा लागला. 1991 साली गयामध्ये पत्रकार अशोक प्रसाद यांची हत्या, 1994 साली सीतामढीमध्ये दिनेश दिनकरची हत्या, 1997 साली ‘हिंदुस्तान’ या वृत्तपत्राच्या कार्यालयावर बॉम्बहल्ला, 1999 साली सिवान येथे दूरदर्शनच्या कार्यालयावर हल्ला, मधुबनीमध्ये ज्येष्ठ पत्रकार चंद्रिका राय यांच्यावर हल्ला, ही राजदच्या माध्यमांवरील गुंडागर्दीची, दहशतीची काही प्रातिनिधिक उदाहरणे. त्यामुळे एकीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढायचे आणि दुसरीकडे माध्यमांवर दबाव निर्माण करून त्यांचा आवाज दाबायचा, अशी ही बिहारमधील यादवी! आता या प्रकरणी तेजस्वी यादव यांनी माध्यमांची माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली आहे. पण, अडेलतट्टू आणि गर्विष्ठ तेजस्वी यादव यांच्याकडून असे काहीही होण्याची सुतराम शक्यता नाही. कारण, तेजस्वी यादवांच्या काया, वाचा आणि मन या तिघांचा एकमेकांशी संबंधच तो काय? त्यामुळे बिहारी जनतेने आगामी विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला पुन्हा ‘जंगलराज’ची नांदी हवी आहे की विकासाची आणखीन एक संधी, याचा विचार करूनच मतदानासाठी उतरावे, अन्यथा लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्याला नख लावणारी ही चाराखाऊ लुटारांची टोळी बिहारला खोल गर्तेत ढकलल्याशिवाय राहणार नाही!