आगीतून फुफाट्यात?

    12-Apr-2024
Total Views | 57
trung my lang 
 
व्हिएतनाममधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक ट्रुंग माय लॅन यांना भ्रष्टाचाराच्या आरोपात दक्षिण व्हिएतनाममधील न्यायालयाने दोषी ठरविले असून, त्यासाठी त्यांना २० वर्षं तुरुंगवास आणि मृत्युदंडाची शिक्षा नुकतीच सुनावण्यात आली. लॅन यांच्यावर असलेल्या आरोपांवर व्हिएतनाममधील न्यायालयात सुनावणी सुरू होती. सुनावणी पूर्ण झाल्यावर, दि. ११ एप्रिल रोजी न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली. आपल्यावरील सर्व आरोप झिडकारताना, लॅन यांनी आपण निर्दोष असल्याचे सांगितले.
 
लॅन यांनी २०१२ ते २०२२ दरम्यान हजारो खोट्या कंपन्यांच्या माध्यमातून ’सायगॉन जॉईंट कमर्शियल बँके’कडून ४४ दशलक्ष डॉलर्सचा घोटाळा केला होेता आणि यासाठी विविध सरकारी अधिकार्‍यांना मोठ्या प्रमाणात लाच दिल्याचा आरोपही त्यांच्यावर होता. त्यांनी केलेला घोटाळा हा व्हिएतनामच्या २०२४ सालच्या जीडीपीच्या तब्बल ९.३६ टक्के इतका आहे, हे विशेष. त्यामुळे जगातील निवडक मोठ्या घोटाळ्यांपैकी एक असल्याने, जगाचे लक्ष या प्रकरणाकडे वेधले गेले आहे.
 
लॅन यांचा जन्म व्हिएतनामच्या हो चि मिन्ह या शहरात सिनो-व्हिएतनामी कुटुंबात झाला. सुरुवातीच्या काळात लॅन यांनी आपल्या आईला रस्त्यावर उभे राहून, सौंदर्य प्रसाधने विकण्यास मदत केली. पण, व्हिएतनाममध्ये १९८६ मध्ये तत्कालीन कम्युनिस्ट सरकारने सुरू केलेल्या ‘डोई मोई’ नामक आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमामुळे, त्यांनी बांधकाम व्यवसायात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्यांचा परिवार हा सुरुवातीपासूनच कम्युनिस्ट विचारधारेचा कट्टर विरोधक म्हणून ओळखला जातो. १९९० पर्यंत त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात व्हिएतनाममधील हॉटेल्स आणि रेस्टोरंटमध्ये गुंतवणूक केली होती.
 
व्हिएतनाममधील नियमानुसार, कोणत्याही बँकेचे स्वत:कडे पाच टक्क्यांपेक्षा जास्त शेअर्स ठेवणे बेकायदेशीर कृत्य मानले जाते. पण, लॅन यांनी अनेक शेल कंपन्यांच्या आधारे ’सायगॉन जाईंट कमर्शियल बँके’चे ९० टक्क्यांपेक्षा जास्त शेअर्स स्वतःकडे ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. या बँकेने दिलेल्या एकूण कर्जापैकी ९३ टक्के कर्ज हे लॅन यांच्याच लोकांनी घेतल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.
 
व्हिएतनाममध्ये २०२२ पासून भ्रष्टाचारविरोधी मोहिमेने जोर पकडला. अनेक भ्रष्ट नेत्यांवर, सरकारी अधिकार्‍यांवर या मोहिमेअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ही मोहीम इतकी तीव्रपणे राबवण्यात येत आहे की, या मोहिमेअंतर्गत व्हिएतनामचे माजी राष्ट्रपती वान थुआंग यांनीसुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने राजीनामा दिला होता.
 
भ्रष्टाचाराविरोधात घेतलेल्या या कडक भूमिकेचा व्हिएतनामच्या अर्थव्यवस्थेला देखील जबरदस्त फटका बसला. २०२२ मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अनेक अधिकारी आणि व्यावसायिक यांना अटक केली गेली होती. त्यामुळे व्हिएतनाम शेअर बाजाराला ४० अब्ज डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागले होते. व्हिएतनाममधील इतर बँकांमध्येही असाच प्रकार घडलेला असू शकतो, अशी भीती आज व्हिएतनाममधील सामान्य माणसापासून उद्योजकांना वाटते. तसेच व्हिएतनाममधील बांधकाम क्षेत्रावर देखील याचा विपरित परिणाम झाला आहे. २०२३ साली व्हिएतनामच्या बांधकाम क्षेत्रामध्ये असलेल्या १ हजार, ३०० कंपन्यांना टाळे ठोकावे लागले होते.
 
दुसरीकडे, आज जागतिक परिस्थितीमु़ळे चीनमधून अनेक कंपन्या आपला व्यापार बाहेर नेत आहेत. अर्थात या बाहेर पडणार्‍या कंपन्यांची पहिली नैसर्गिक पसंती ही व्हिएतनामला होती. पण, व्हिएतनाम सरकारच्या या आक्रमक भूमिकेमुळे बाजारात अनिश्चितता निर्माण झाली आहे. परिणामी, नवीन गुंतवणूकदार सध्या संभ्रमित अवस्थेत असून, अनेकांनी व्हिएतनामकडे पाठ फिरवली आहे.
 
भ्रष्टाचार्‍यांना मोकळे सोडले, तर ते अर्थव्यवस्था पोखरतात आणि कारवाई केली, तर अर्थव्यवस्थेला फटका बसत असल्यानेेे, ’इकडे आड, तिकडे विहीर’ अशी व्हिएतनाम सरकारची अवस्था झालेली दिसते. लॅन यांनी आपण न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देणार असल्याचे जाहीर केले आहेच. पण, या सगळ्यामुळे व्हिएतनाम अर्थव्यवस्थेवरचा उडालेला विश्वास संपादन कसा करणार, हाच खरा प्रश्न आहे.
-कौस्तुभ वीरकर
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121