मुंबई: सेमीकंडक्टर निर्मितीत भारताने सर्वाधिक प्राधान्य दिले असतानाच केंद्र सरकारकडून मोठा निर्णय जाहीर झाला आहे. केंद्रीय कॅबिनेट मंत्रीमंडळातील बैठकीत सेमीकंडक्टच्या तीन प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पाची किंमत १.२६ लाख कोटींच्या घरात असणार आहे. निवडणूकपूर्व काळात सरकारकडून हा महत्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला असून यातील दोन प्रकल्प गुजरात व एक प्रकल्प आसाम येथे असणार आहे. टाटा ग्रुपकडून एक प्रकल्प ढोलेरा गुजरात, दुसरा प्रकल्प मोरीगाव आसाम व सीजी पॉवरकडून साणंद गुजरात येथे बांधला जाणार आहे.
मंत्रीमंडळाच्या कॅबिनेट बैठकीनंतर दृकश्राव्य माध्यमातून घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा निर्णय केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केला आहे. लवकरच या प्रकल्पांचे भूमीपूजन होत १०० दिवसांच्या आत हा प्रकल्प सुरू होणार असल्याची माहिती वैष्णव यांनी दिली आहे. संबंधित प्रकल्प ९१००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याने जवळपास २०००० लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
ढोलेरा गुजरातमधील टाटा इलेक्ट्रोनिक प्रकल्प पॉवरचीप सेमीकंडक्टर मॅनुफेक्चरींग कॉर्पोरेशन तैवान यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू होणार आहे. प्रस्तावित प्रकल्प चांगल्या गुणवत्तेच्या २८ एन एम चीपची निर्मिती करणार आहेत. ५००० वेफर प्रति महिना क्षमतेची ही प्रकल्प निर्मिती असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, 'एका वेफरमध्ये ५००० चीपची क्षमता असते. यानुसार एका वर्षात हा प्रकल्प ३ दशलक्ष चीपची निर्मिती करणार आहे.
या चीपच्या निर्मितीचा वापर संरक्षण,ऑटो, टेलिकॉम या क्षेत्रासाठी केला जातो. ' डेव्हलपमेंट ऑफ सेमीकंडक्टर व डिस्प्ले मॅनुफेक्चरींग इकोसिस्टीम' या कार्यक्रमाअंतर्गत या चीपची निर्मिती देशात केली जाईल. या कार्यक्रमासाठी सरकारकडून ७६००० कोटींची मदत होऊन त्यातील ५९००० कोटी रुपये या तीन प्रकल्पासाठी वापरले जाणार आहेत. यातील टाटा कंपनी प्रकल्पात ५०००० वेफर प्रति महिना निर्मिती होणार व एकूण ९१००० कोटींची गुंतवणूक या प्रकल्पात केली जाणार आहे. याशिवाय टाटा सेमीकंडक्टर एसंबली अँड टेस्ट प्रायव्हेट लिमिटेड (TSAT) मार्फत मोरीगाव आसाम येथे २७००० कोटींचा प्रकल्प सुरू केला जाणार आहे. तिसऱ्या प्रकल्पात ४८ दशलक्ष वेफरची निर्मिती केली जाणार असून यामध्ये ईव्ही, कनज्यूमर इलेक्ट्रोनिक, ऑटोमोटिव्ह, टेलिकॉम, स्मार्टफोन या उत्पादनांसाठी निर्मिती केली जाईल.
सीजी पॉवर प्रकल्प हा रेनीसास इलेक्ट्रोनिक कॉर्पोरेशन, स्टार मायक्रो इलेक्ट्रोनिक थायलंड यांच्या साहाय्याने साणंद गुजरात येथे बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पाची किंमत ७५०० कोटी रुपये असेल.
मंत्रिमंडळाच्या निर्णयावर भाष्य करताना, टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन म्हणाले की,' मानवी अस्तित्वाच्या प्रत्येक पैलूचे AI-नेतृत्वाखालील डिजिटायझेशनमुळे, सेमीकंडक्टर हा सर्वात महत्वाचा बिल्डिंग ब्लॉक असेल. 2030 पर्यंत, जागतिक सेमीकंडक्टर उद्योग $1 ट्रिलियन पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे आणि भारतीय सेमीकंडक्टरची मागणी 110 अब्ज डॉलर ओलांडण्याची अपेक्षा आहे. "सेमीकंडक्टर उत्पादनात भारताचा प्रवेश लक्षणीयरीत्या जागतिक पुरवठा साखळी धोक्यात आणेल आणि जागतिक सेमीकंडक्टर उद्योगात भारताला एक महत्त्वाचा खेळाडू बनवेल,'
जूनच्या अखेरीस कॅबिनेटने मायक्रोन या सुरतमधील सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्पाला मान्यता दिली होती. भारताला सेमीकंडक्टर ग्लोबल हाऊस बनवण्यासाठी सरकारकडून हा सेमीकंडक्टर गुंतवणूकीला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहे.