नवी दिल्ली: संदेशखाली प्रकरणातील आरोपी सिराज शेख याची मालमत्ता संतप्त नागरिकांनी आगीच्या हवाली केली आहे.संदेशखाली प्रकरणावरून पश्चिम बंगालमध्ये स्थानिक लोकांचा संताप पुन्हा उफाळून आला आहे. शुक्रवारी स्थानिकांनी तृणमूल काँग्रेस नेता आणि या प्रकरणातील आरोपी शाहजहान शेख याचा भाऊ सिराज शेख यांची मालमत्ता जाळली. बेरामजदूर येथील कचारी भागात शाहजहान शेखच्या भावाच्या या मालमत्तेला आग लावण्यात आली. यापूर्वी गुरूवारीदेखील सिराज शेख याच्या मालमत्तेला आग लावण्यात आली होती.
भाजपच्या महिला नेत्यांचे शिष्टमंडळही शुक्रवारी संदेशखाली दौऱ्यावर गेले होते. मात्र, पोलिसांनी भाजपच्या शिष्टमंडळाला संदेशखालीस जाण्यापासून रोखल्याने भाजप नेते आणि पोलिस अधिकाऱ्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. भाजपच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व भाजप प्रदेश सरचिटणीस लॉकेट चॅटर्जी आणि अग्निमित्रा पॉल करत होत्या. संघर्षानंतर पोलिसांनी भाजप नेत्यांना ताब्यात घेतले. त्याचवेळी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेदेखील संदेशखालीस भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.