भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्याचा दिवस म्हणजे ६ डिसेंबर. या युगप्रवर्तकास माझे कोटी कोटी प्रणाम. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी मोठे ध्येय व स्वप्न पाहता येतात, नव्हे प्रत्यक्षात सत्यात उतरवता येतात याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणून आज आपण विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे बघून म्हणू शकतो. आज खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या विचारांचा जागर होण्याची आवश्यकता आहे.
जगातील सर्वात मोठी आणि महान लोकशाही म्हणून भारताकडे आदराने पाहिले जाते. त्याचे सर्व श्रेय भारतीय घटनेला आणि तिच्या घटनाकारांना जाते. मित्रांनो पण जोपर्यंत आपल्याकडे सुशिक्षित आणि सुसंस्कारित मानवधन तयार होत नाही, तोपर्यंत याच संविधानाचा वापर आपल्या सोयीप्रमाणे लावला जाईल. विवेक, त्याग, प्रामाणिकपणा, निष्ठा, विश्वास, प्रेम, जिव्हाळा याने युक्त असे मानवधनच लोकशाहीचा उत्तम विकास घडवू शकेल.
स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि समाजवाद या मूल्यांची जोपासना करत भारतीय नागरिकाला त्याचे मूलभूत अधिकार व कर्तव्य ज्या दिवशी मिळाली तो दिवस म्हणजे २६ नोव्हेंबर. हा दिवस आपण संविधान दिवस म्हणून देशभर साजरा केला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संध्याकाळी ५ वाजता त्यावेळच्या भारतीय केंद्रीय मंत्रिमंडळाकडे सुपूर्त केली. या संविधान निर्मितीला सुरुवात जुलै १९४६ पासून झाली. या संविधान निर्मितीच्या समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद व त्यातील मसुदा समितीचे अध्यक्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. ही राज्यघटना तयार करायला २ वर्ष ११ महिने १८ दिवस इतका कालावधी लागला. या भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य म्हणजे ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. राज्यघटना बनविताना बाबासाहेबांनी जगातील अनेक देशांच्या राज्यघटनांचा सखोल अभ्यास केला.
मानवी जीवनामध्ये शिट्टीचे महत्त्व आहे शिट्टीचे विविध उपयोग आपल्या सर्वांनाच माहिती आहेत. तिचा उपयोग कधी कुणाची छेड काढण्यासाठी तर कधी वर्गातील शांत वातावरण बिघडविण्यासाठी. तीच शिट्टी हवालदाराकडे असते तेव्हा ती अनेकांना सूचना देण्याचे काम करते. शिक्षकांकडे असणारी शिट्टी किंवा स्वयंसेवक, सुरक्षा रक्षक यांच्याकडे असलेली शिट्टी ही सावध करण्यासाठी, लक्ष वेधून घेण्यासाठी, गडबड गोंधळ शांत करण्यासाठी होतो. शालेय जीवनात स्काऊट गाईड विषयांसारख्या अनेक विषयांमध्ये शिट्टीचे विविध उपयोग सुचविण्यात आलेले आहेत.
ज्याप्रकारे तिचा उपयोग हे त्या शिट्टी वापरणाऱ्या व्यक्तीच्या उद्दिष्टानुसार किंवा हेतूनुसार आपणास दिसतो त्याच प्रकारे आपली राज्यघटना सुद्धा किती उपयुक्त बनलेली आहे? याचे उत्तर देताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले, ती वापरणारी माणसे ज्या प्रकारची आहेत ते ज्या उद्देशाने तिचा वापर करतील, ज्या हेतूने तिचा वापर करतील त्या प्रकारे संविधान आपली उपयुक्तता वेळोवेळी सिद्ध करेल.
मित्रांनो आपण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला किंवा महापरिनिर्वाण दिनी हार, गुच्छ, नाच, गाणी, मिरवणूका यांचा समावेश मोठ्या प्रमाणात करतो. ते सर्व चित्र बघून एक शिक्षक म्हणून मला वाटतं की बाबासाहेबांना खरंच हेच हवे होते का? अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाच्या परिसरात बाबासाहेबांचा पुतळा असून त्या पुतळ्याखाली 'सिम्बॉल ऑफ नॉलेज' असे लिहिलेले आहे . अमेरिकेत ते ज्या कोलंबिया विद्यापीठात शिकले तेथे त्यांचा उल्लेख 'ज्ञानाचे प्रतीक' म्हणून होतो. पण खुद्द त्यांच्या मातृभूमीत त्यांना हे स्थान आहे का? याबद्दल माझ्या मनात निश्चितच शंका आहे? जातीअंता बद्दल त्यांची असलेली भूमिका, सामाजिक विषमता, आर्थिक विषमता नष्ट करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न या संदर्भात आज आपण नक्की काय करत आहोत? जातीअंताची, सामाजिक विषमतेची, आर्थिक विषमतेची आजची स्थिती काय? यावर विचार करताना मनात विचारांचे काहूर माजल्याशिवाय राहत नाही.
बाबासाहेबांनी समाजातील अमानुष प्रथां विरुद्ध आवाज उठवला. मूकनायक, प्रबुद्ध भारत, जनता, समता, बहिष्कृत भारत या सारखी अनेक नियतकालिके त्यांनी सुरू केली. या नियतकालिकांच्या माध्यमातून त्यांनी समाजातील कुप्रथा, सामाजिक विषमता, आर्थिक विषमता, स्त्री-पुरुष विषमता, शेतकऱ्यांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, शिक्षण विषयक विचार, स्त्रियांच्या हक्काचे प्रश्न, राजकीय प्रश्न यावर प्रकाश टाकला. आंबेडकरांनी त्यांच्या अनुयायांसह अनेक कुप्रथांना कारणीभूत ठरणाऱ्या मनुस्मृतीचे दहन केले. गावातील सार्वजनिक पाणवठ्यावर दलितांना पाणी मिळावे म्हणून महाड येथील चवदार तळ्यावर त्यांनी सत्याग्रह केला. दलितांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून नासिक येथील काळाराम मंदिरात सत्याग्रह केला. यासारख्या अनेक गोष्टी केल्या. सरकारच्या गोलमेज परिषदांमध्ये भाग घेतला. गोलमेज परिषदां द्वारा सरकारने दलितांना ७८ स्वतंत्र मतदार संघ दिले. महात्मा गांधींच्या मते ही हिंदू धर्मात फूट पाडण्याची ब्रिटिशांची कुटनीती आहे. याविरुद्ध त्यांनी येरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले. तेव्हा अत्यंत उदार अंतकरणाने महात्मा गांधीजीं सोबत पुणे करार करून स्वतंत्र मतदार संघा ऐवजी राखीव १४८ जागा बाबासाहेबांनी स्वीकारल्या. स्वतंत्र भारताचे ते पहिले कायदा व न्याय मंत्री होते. १९५६ मध्ये त्यांनी आपल्या हजारो अनुयायांसह बौद्ध धर्माचा स्वीकार केला.
आपली राज्यघटना ही खरोखर किती परिपक्व आहे? याचे उत्तम उदाहरण म्हणजे, आपल्याला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षापेक्षा जास्त काळ लोटला आहे. पण भारतीय लोकशाही दिवसागणिक परिपक्व होताना दिसते. तेच आपल्या शेजारील राष्ट्रांमध्ये लोकशाही बद्दल वेगळेच चित्र बघावयास मिळते. यावरूनच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे काय क्षमतेची दूरदृष्टी होती याची कल्पना येते. म्हणूनच माझ्या मते खऱ्या अर्थाने त्यांना महामानव का म्हणतात याची प्रचिती येते.
दुर्दैवाने म्हणावे लागते की ब्रिटिशांनी या देशात जात, धर्म, पंथ, स्री, पुरुष या सर्व प्रकारचे भेदाभेद पार करीत सार्वत्रिक शिक्षणाला सुरुवात केली. जर या देशावर इंग्रजांचे राज्य नसते तर कदाचित भीमराव रामजी आंबेडकर या विद्यार्थ्याला शिक्षणही घेता आले नसते. जेव्हा ते शिकत होते तेव्हा सार्वजनिक पानवठयावर त्यांना पाणीही मिळत नव्हते. त्यांचे वडील त्यावेळी लष्करात सुभेदार पदावर होते. राहायची जागा गावकुसाबाहेर होती. तरीसुद्धा या महामानवाने आपल्या संपूर्ण देशाला प्रेम, प्रज्ञा, समता, बंधुता व करुणेचाही वारसा दिला, राज्यघटनेचाही वारसा दिला व हिंदू कोड बिलाचाही वारसा दिला.
राज्यघटना सर्वसामान्य माणसाने का समजून घ्यावी, संपूर्ण भारतीय नागरिक होण्यासाठी आपण आपल्या देशाची राज्यघटना वाचणे व समजून घेणे आवश्यक आहे. जर राज्यघटना आपल्याला समजली तर एक गोष्ट निश्चितपणे सांगू शकतो की तुमच्यावर कोणीही, कोणत्याही प्रकारचा अन्याय करू शकणार नाही. तुम्हाला सर्व प्रकारच्या अन्यायाला कायदेशीर बळ देणारी ही आपली राज्यघटना आहे.
संविधान दिन आपण २६ नोव्हेंबर २०१५ पासून साजरा करण्यास सुरुवात केली. भारत सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२५ वी जयंती साजरी करत असताना त्यांना एक प्रकारे श्रद्धांजली म्हणून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. २६ नोव्हेंबर १९४९ या दिवशी बाबासाहेबांनी संविधानाचे कामकाज ठरवून पूर्ण केले. सर्व जात, धर्म, पंथ, स्त्री, पुरुष कायद्यासमोर समानतेचा संदेश देणारे, सगळ्यांना कायद्याचे समान संरक्षण देणारे, राज्य कायद्याचे असेल, कुणालहरी व्यक्तीचे किंवा हुकूमशहाचे नसेल.
पण समाजामध्ये मोठ्या प्रमाणात संविधानाबाबत अनभिग्यता असल्यामुळे अन्याय करणाऱ्यांची व अन्याय सहन करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. हे थांबवायचे असेल तर राज्यघटना अभ्यासलीच पाहिजे.
दहशतवाद, राजकारणातील अराजकता, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, तरुण पिढीचा बेदरकारपणा, भ्रष्टाचाराला प्राप्त झालेली सामाजिक मान्यता, रस्त्यारस्त्यावर होणारे गटागटातील संघर्ष, लहान - सहान कारणांसाठीही होणाऱ्या समाजातील हत्या, शब्दा - शब्दाने पेटणारे रणकंदन, राजकीय लोकांची शिवराळ भाषा, इतिहासाचे विडंबन, राष्ट्रपुरुषांची अवहेलना यामुळे संविधानातील सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय; विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य; दर्जा व संधीची समानता; हे सगळे भासमान वाटतंय. खरंच प्रत्येक व्यक्तीला हे अधिकार मिळाले तरच या युगप्रवर्तकाला महापरिनिर्वाण दिनी आपण खऱ्या अर्थाने अभिवादन केले असे म्हणता येईल.
प्रा. प्रशांत पुंडलिक शिरूडे, के.रा.कोतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय डोंबिवली