मुंबई : मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही ऐतिहासिक चित्रपटांची लाट आली आहे. २०२५ मध्ये फेब्रुवारी महिन्यात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा हा चित्रपट प्रदर्शित होणार असून लक्ष्मण उत्तेकप यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले हे तर अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. त्यानंतर आता लवकरच हिंदी चित्रपटसृष्टीत भव्य दिव्य असा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येणार असून नुकतीच दिग्दर्शक संदीप सिंग यांनी अधिकृत घोषणा केली आहे. या चित्रपटात मराठी किंवा हिंदी नव्हे तर दाक्षिणात्य अभिनेता छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.
छत्रपती शिवरायांवर आधारीत मेगा बजेट चित्रपटाचे नाव 'द प्राईड ऑफ भारत छत्रपती शिवाजी महाराज' असे असून 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टी या ऐतिहासिकपटात शिवरायांची भूमिका साकारणार आहे. संदीप सिंग यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली असून यापूर्वी त्यांनी 'मेरी कोम', 'सरबजीत' अशा चित्रपटांची निर्मिती केली आहे.
दरम्यान, 'द प्राईड ऑफ भारत छत्रपती शिवाजी महाराज' हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना तब्बल ३ वर्ष वाट पाहावी लागणार आहे. कारण २१ जानेवारी २०२७ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.