मुंबई : मराठी रंगभूमीवर सातत्यपूर्ण प्रयोगशीलतेने नवनवीन मानदंड निर्माण करणारे नाट्यनिर्माते राहुल भंडारे यांना 'फेमस पुरस्कार २०२५' या मान्यताप्राप्त पुरस्काराने नागपूर येथे सन्मानित करण्यात आले. हा सन्मान मा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
राहुल भंडारे यांनी गेल्या अनेक वर्षांत नाटक निर्मितीच्या माध्यमातून मराठी रंगभूमीवर नवे प्रयोग करताना दर्जात्मकतेला कायम प्राधान्य दिले. अद्वैत थेएटर या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी 'जागो मोहन प्यारे', 'गाढवाचं लग्न', 'बॉम्बे १७', 'अलबत्या गलबत्या', 'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला', 'आरण्यक' यांसारखी दर्जेदार नाटके निर्माण केली, जी केवळ प्रेक्षकप्रिय ठरली नाहीत, तर समीक्षकांनीही त्यांची दखल घेतली.
भंडारे यांनी नाटकाच्या माध्यमातून अनेक नवोदित कलाकारांना व्यासपीठ दिले आणि त्यांच्या कलाकौशल्याला चालना दिली. नाट्य निर्मितीबरोबरच, समाजातील विषयांवर आधारित प्रयोगशील विचार मांडणारी नाटके सादर करून त्यांनी रंगभूमीवर एक स्वतंत्र ठसा उमटवला आहे. त्यांच्या नाटकांना केवळ प्रेक्षकांचा प्रतिसादच मिळालेला नाही, तर महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कार, तसेच मराठी मालिकांच्या अवॉर्ड सोहळ्यांमध्ये विशेष उल्लेख देखील प्राप्त झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर त्यांच्या नाट्यसृष्टीतील योगदानाची दखल घेऊन त्यांना 'फेमस पुरस्कार २०२५' या पुरस्काराने गौरवण्यात आले. नागपूर येथे आयोजित एका भव्य समारंभात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
'फेमस पुरस्कार २०२५' हा देशपातळीवरील प्रतिष्ठेचा सन्मान असून, विविध कलाक्षेत्रांतील गुणवत्तेचा गौरव करणारा मानला जातो. या पुरस्कारात नाटक, चित्रपट, संगीत, साहित्य अशा विविध माध्यमातील प्रतिभावंतांना गौरवण्यात येते. यंदाच्या वर्षी राहुल भंडारे यांना मिळालेला हा पुरस्कार, मराठी नाट्यसृष्टीसाठीही एक अभिमानाची बाब ठरली आहे.
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.