नवी दिल्ली : संसदेत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात, विरोधकांकडून कामकाजापेक्षा आंदोलनाचाच धडाका जास्त झाल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानाचा विपर्यास करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. विरोधकांच्या याच वर्तनापायी गुरूवारी संसदेचे कामकाज हे दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. अशातच आता भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी विरोधकांच्या फेक नॅरेटीव्हला उत्तर देत काँग्रेसचे सत्य जगासमोर आणले आहे.
माध्यमांशी संवाद साधताना, भाजपचे खासदार अनुराग ठाकूर म्हणाले की " नेहरू गांधी कुटुंबीयांकडून आंबेडकरांचा साततत्याने अपमान करण्यात आला. आंबेडकरांनी राजकारण सोडावे म्हणून नेहरूंनी स्व:ता षडयंत्र रचले होते. त्यांचा निवडणूकांमध्ये पराभव व्हावा व त्यांनी राजकारण सोडावे हीच त्यांची इच्छा होती. काँग्रेसच्या ३ पीढ्या सत्तेत होत्या परंतु त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न दिला नाही. गांधी कुटुंब जाणीवपूर्वक आंबेडकरांना त्रास देत असत, त्यांना डावलत असत, आज ज्यावेळेस त्यांचे पितळ उघडे पडले आहे, त्या वेळेस बाबासाहेबांचा फोटो घेऊन ही मंडळी फिरत आहेत."
गांधी कुटुंबाचा उद्धटपणा उघड!
ओडीशाचे भाजप खासदार प्रताप सारंगी यांना धक्काबुक्कीमुळे झालेल्या दुखापतीवर भाष्य करताना भाजपनेते अमित मालवीय म्हणाले की राहुल गांधी यांनी केलेल्या धक्काबुक्की मुळे प्रताप सारंगी यांना गंभीर दुखापत झाली. यातूनच गांधी कुटुंबाचा बेफिकीरपणा आणि उद्धटपणा उघड होतो. काँग्रेसचे नेतृत्व आता शारीरिक हल्ल्यांवर उतरले आहेत.