मानवी जीवनामध्ये अहंकार ज्याला जडला, त्या अहंकाराने त्या मनुष्याच्या जीवनाचे वाटोळे केले हे निश्चित. अहंकार शत्रूच मुळात फसवा आहे. जोवर नुकसान होत नाही, तोवर या अहंकाराच्या अस्तित्वाची जाणीव होत नाही. त्यामुळे समर्थ रामदास स्वामी या अहंकारापासून चार हात लांब राहण्याचा सल्ला सज्जनांना देतात. अहंकार मानवी आयुष्यात कसे नुकसान करतो, याचे विवेचन...
सद्वस्तूचे ज्ञान होण्यासाठी मनाच्या अंगभूत सवयी मोडून काढून, मनाला तयार करावे लागते. सर्वप्रथम जे डोळ्यांना दिसते, ते सत्य ही मनाची सवय बदलावी लागते. सत्याच्या शोधासाठी अनेक ज्ञानशास्त्रांचा अभ्यास करुनही, निश्चित निर्णयाप्रत पोहोचता येत नाही, हे आपण मागील लेखात पाहिले. शास्त्राभ्यासात अभ्यास करणारा मी, याला वेगळा मानल्याने अहंकार व देहबुद्धी यांची वाढ होते व आत्मज्ञान प्राप्तीला बाधा उत्पन्न होते. शास्त्राभ्यासाने वृत्ती पालटली पाहिजे. अहंकार नाहीसा होऊन मन शांत अवस्थेला पोहोचते, तेव्हा मन अतींद्रिय ज्ञानानुभूतीसाठी तयार होते. अभ्यासाने वृत्तीत बदल झाला नाही, तर अभ्यासार्थीला आपले ज्ञान लोकांना सांगण्याची घाई होते. तो उतावळेपणाने आपले शब्दज्ञान, लोकांना ऐकवून त्यांच्याकडून विद्वान म्हणून प्रसिद्धी मिळवू पाहतो. अहंकार मीपणा वाढल्याने, ज्ञान अंत:करणात न मुरता ते व्यर्थ जाते. हे आता स्वामी पुढील श्लोकात सांगत आहेत.
जेणे मक्षिका भक्षिली जाणिवेची ।
तया भोजनाची रुची प्राप्ति कैंची ।
अहंभाव ज्या मानसींचा विरेना ।
तया ज्ञान हे अन्न पोटीं जिरेना ॥159॥
या श्लोकात समर्थांनी एक साधा दृष्टान्त देऊन, ‘मी ज्ञान जाणले’ असे अहंकाराने सांगणार्या माणसाची स्थिती वर्णन केली आहे. शुद्ध ज्ञानार्जनात आनंद आहे, यात शंका नाही. भूक लागल्यावर सुग्रास भोजन करण्यात जसा आनंद मिळतो, तसा ज्ञानोपासकाला ज्ञान संपादन करताना आनंद मिळतो. तथापि, ज्ञानार्जनात मीपणा, अहंकार मिसळला गेला, तर त्याला त्या ज्ञानाचा फायदा न होता ते शब्दज्ञान रुपाने बाहेर पडताना, विद्धत्तेचा गर्व अहंकार यासह बाहेर येते. वरील दृष्टान्तात सांगितल्याप्रमाणे, सुग्रास पौष्टिक पदार्थ खाताना चुकून त्याबरोबर माशी पोटात गेली, तर उचमळून उलटी होते व खाल्लेले अन्न व ती माशी बाहेर पडते. त्या माशीमुळे पौष्टिक अन्नाचा त्याच्या शरीराला लाभ होत नाही. तद्वत ज्ञानार्जन करीत असताना, अहंकाररुपी (जाणिवेची) मक्षिका भक्षिली गेल्यास त्याच्या तोंडून ओकारीप्रमाणे शुष्क शब्दज्ञान भराभर तोंडातून बाहेर पडते आणि हा गर्विष्ठ मनुष्य लोकांना ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगू लागतो. पण, विद्वतेच्या अहंकारामुळे त्याला स्वत:साठी त्याचा काहीही फायदा होत नाही. अन्नाबरोबर माशी गिळली गेल्यास, ते अन्न न पचता उलटून बाहेर पडते. तद्वत मनातील देहाहंकार, अहंभाव, देहबुद्धी यामुळे, माणसाला ज्ञानाचे पचन होत नाही. ज्ञान मनात न जिरता अहंकाराबरोबर ते शब्दरुपाने बाहेर टाकले जाते. अशा अहंकारी विद्वत्तेचा गर्व असणार्या माणसाला, आत्मज्ञान प्राप्त होणे कदापि शक्य नाही. मग शब्दज्ञानाने गर्विष्ठ झालेली व्यक्ती, अहंकार तृप्तीसाठी विद्वज्जनात वादविवाद करुन आनंद मिळवू पाहते. तथापि वाद हितकारक नसून, त्याने खेद, दु:ख पदरात पडते. हे आता स्वामी पुढील श्लोकांत सांगत आहे.
नको रे मना वाद हा खेदकारी ।
नको रे मना भेद नाना विकारी ।
नको रे मना सीकऊं पूढिलांसि।
अहंभाव जो राहिला तूजपाशी ॥160॥
आपले स्वतंत्र विचार इतरांसमोर मांडायला हरकत नाही. त्यामुळे ज्ञानात भर पडते, शंकांचे निरसन होते. परंतु, अहंकारी माणसे जेव्हा आपल्याच विचारांचा आग्रह धरतात, दुसर्यांचे विचार ऐकूनही घेत नाहीत, तेव्हा वाद होतात. अहंकारातून उत्पन्न झालेले वाद केवळ दु:खाला कारणीभूत होतात. स्वामींनी मागे श्लोक क्रमांक 108 ते 112 मध्ये सांगितले आहे की, ‘तुटे वाद, संवाद तो हितकारी’ समर्थांना वितंडवाद आवडत नाही. आपल्या शिष्याला विहित कार्यासाठी दूरवरच्या मठात पाठवताना, समर्थ उपदेश करीत की, ‘वाद घालू नको’ समर्थशिष्य गिरिधर स्वामींनी स्वानुभवावरुन लिहून ठेवले आहे की,(समर्थ)-
‘निरोपिती कोठे वाद घालू नको ।
भक्ति सोडू नको राघवाची ॥’
अती वाद करणार्या अहंकारी माणसाला, लोक टाळतात. कारण, अहंभावाने त्याला ज्ञानाचा गर्व असतो. इतरांना तो तुच्छ समजतो आणि त्यांच्याशी भेदभाव करु लागतो. अर्थातच त्याच्या वाट्याला दु:ख येते, म्हणून समर्थ सांगतात की, “हे मना, तुझ्या ठिकाणी अहंभाव असेल, तर तू इतरांना तो शिकवू नको. अहंभावाने तुला स्वत:ला समाधन मिळाले नाही, ते आजूबाजूच्या माणसांना शिकवून त्यांचे समाधान हिरावून घेऊ नकोस. कारण-
अहंतागुणे सर्व ही दु:ख होते ।
मुखें बेालिले ज्ञान ते वेर्थ जातें ।
सुखी राहता सर्व ही सुख आहे ।
अहंता तुझी तूं चि शोधून पाहे ॥161 ॥
स्वामींनी वरील श्लोकात एक महत्त्वाचा सिद्धांत सांगितला आहे. तो म्हणजे, सर्व दु:खाचे मूळ अहंकारात आहे. अहंकाराने गर्विष्ट झालेला माणूस इतरांना कमी लेखतो, तुच्छ समजतो. असा मनुष्य इतरांकडून काहीही शिकू शकत नाही. ज्ञानी माणसांचा तो द्वेष मत्सर करतो. त्यांची टिंगलटवाळी करतो. अशा गर्विष्ठ माणसाच्या तोंडून, बाहेर पडणारे ज्ञान फुकट जाते. कारण, त्यातून विचारांबरोबर मत्सर, अहंभाव तुच्छता हेही बाहेर पडल्याने, त्या ज्ञानाचा उपयोग होत नाही. खरा ज्ञानी हा अहंभावापासून दूर असल्याने नम्र असतो. वृक्षाला रसाळ फळे लागली की, त्यांच्या भाराने वृक्ष वाकतो, नम्र होतो. तद्वत खरा ज्ञानी मनुष्य आपल्या ज्ञानाने नम्र होतो. आपल्याला ती अवस्था मिळवायची असेल, तर हे मना, तुझ्या अंतरंगात कशाकशाचा अहंकार आहे, याचा तू शोध घे आणि तो नाहीसा करण्याचा प्रयत्न कर, म्हणजे तू खर्या अर्थाने सुखी होशील. तुला सगळीकडे सुखाची प्रचिती येईल.
अहंतागुणाने माणूस किती वाहवत जातो, हे पुढील श्लोकात सांगितलेला आहे.
अहंतागुणे नीति साडी विवेकी ।
अनीतीबळे श्लाघ्यता सर्व लोकी ।
परी अंत्तरी सर्व ही साक्ष येते ।
प्रमाणांतरे बुद्धि सांडूनि जाते ॥162॥
अहंतागुणामुळे विचारी माणसे सुद्धा नीतीधर्माचे पालन करीत नाहीत. नीती सोडल्याने, अनीतीच्या बळावर ते समाजात प्रतिष्ठा मिळवू पाहतात. लोक त्यांना मान देतात, त्यांची वाहवा करतात. परंतु, त्याचे मन त्याला खात असते. त्याच्या मनात खरे काय याची त्याला जाणीव असते. पण, अहंकारामुळे त्याला ते उघड बोलता येत नाही. तो अनीतीच्या मार्गानेच जाण्याचे ठरवतो. वस्तुत: शास्त्रात नीतीचे महत्त्व सर्व ठिकाणी सांगितले आहे, तरी शास्त्राधार सोडून अहंतागुणी माणसाची बुद्धी अनीतीमार्गाची निवड करते व त्या मार्गाने जाते. याचा विचार करुन, आपण अहंतागुणापासून सावध राहिले पाहिजे व नीतिधर्माचे पालन केले पाहिजे.
सुरेश जाखडी