"....त्यांच्या तबल्यावरचा ताल अनंत काळापर्यंत ऐकू येईल"; उस्ताद झाकीर हुसैन यांच्या निधनानंतर राज ठाकरेंची भावूक पोस्ट

    16-Dec-2024
Total Views | 71

raj thackeray
 
मुंबई : (Ustad Zakir Hussain) जगप्रसिद्ध तबलावादक आणि संगीतकार पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसैन यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या अनेक वर्षांपासून ते अमेरिकेतच वास्तव्यास होते. त्यांच्या निधनानंतर जगभरातील त्यांच्या चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही समाजमाध्यमांवर एक खास पोस्ट लिहून झाकीर हुसैन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. "त्यांच्या तबल्यावरचा ताल अनंत काळापर्यंत ऐकू येईल" अश्या भावना राज ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत.
 
उस्ताद झाकीर हुसैन हे तबल्यातील 'तालयोगी'
 
राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, "जगप्रसिद्द तबला वादक, पद्मविभूषण, उस्ताद झाकीर हुसैन यांचं दुःखद निधन झालं. निसर्गातील प्रत्येक गोष्ट एका लयीत सुरु असते, मग तो श्वास असू दे की वाहणारा वारा असू दे की फुलणारी फुलं असू देत, या प्रत्येकातील लय अगदी मोजक्या लोकांना जाणवते, अनुभवता येते, आणि अशी माणसं अतिशय लयबद्ध असतात, तालबद्ध असतात, आणि ती त्यांच्या क्षेत्रातील योगी पुरुष ठरतात. उस्ताद झाकीर हुसैन हे तबल्यातील 'तालयोगी' होते असं मला नेहमी वाटत राहिलं."
 
असलं जबरदस्त बाळकडू किती जणांच्या वाट्याला येतं मला माहित नाही
 
असं म्हणतात झाकीर हुसैन यांचे वडील अल्लाह रखा खान साहेबांनी, जाकीरजींच्या जन्मानंतर लगेचच त्यांच्या कानात हळूच तबल्याचे बोल सांगितले. असलं जबरदस्त बाळकडू किती जणांच्या वाट्याला येतं मला माहित नाही, आणि जरी आलं तरी ते पेलवावं झाकीरजींनीच. वयाच्या १२ व्या वर्षापासूनच ते वडिलांच्या सोबत मैफिलीत साथीला बसू लागले. तो काळ असा होता की पंडित रविशंकर यांच्यामुळे भारतीय वाद्यसंगीताबद्दल जागतिक पातळीवर प्रचंड आकर्षण निर्माण झालं होतं, आणि जगभरातील नामांकित वादक, भारतीय वाद्यसंगीताच्यासोबत विविध प्रयोग करायला उत्सुक होतं. एका अर्थाने भारतीय संगीत जागतिकरणाच्या युगात शिरत होतं, अशावेळेला झाकीर हुसैन यांनी, 'शक्ती' बँडची स्थापना केली, आणि भारतीय संगीताची शक्ती जगाला अधिकच जाणवू लागली.
 
...त्यांच्या तबल्यावरचा ताल अनंत काळापर्यंत ऐकू येईल
 
प्रत्येक वाद्य त्या वादकाला काहीतरी सांगत असतं, आणि ते ऐकू येणं आणि त्याला वादकाने प्रतिसाद देणं ही क्रिया निरंतर सुरु असते. अशी निरंतर पण खूप खोल प्रक्रिया उस्तादजी आणि तबल्यात जवळपास ७३ वर्ष सुरु होती. जी आज थांबली. उस्तादजी जरी अनंतात विलीन झाले तरी त्यांच्या तबल्यावरचा ताल अनंत काळापर्यंत ऐकू येईल.
 
पुढे त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उस्ताद झाकीर हुसैन यांना श्रद्धांजली अर्पण करत पोस्टच्या शेवट केला आहे.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121