ठाणे : ( Thane ) ठाण्यात साथीच्या आजारांचा प्रसार वाढला आहे. ठाणे शहरात घसा दुखणे, ताप, सर्दी आणि खोकल्याच्या रुग्णात वाढ झाली आहे. महापालिकेच्या कळवा येथील ‘छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात’ रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत. नागरिकांनी विशेष काळजी घेऊन लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिला आहे.
मागील काही दिवस वातावरणात होत असलेल्या बदलांचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. परिणामी, ठाणे शहरासह जिल्ह्यात सर्दी, खोकला, घसा दुखणे, ताप येणे आदी रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच साथीच्या आजाराने ग्रासले आहे. विशेष म्हणजे वातावरणाच्या बदलामुळे सगळीकडे मोठ्या प्रमाणात साथ पसरली आहे. कळवा येथील ‘छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालया’त दहा महिन्यांच्या कालावधीत 6 हजार, २३३ सर्दी, खोकला आणि घसा दुखण्याचे रुग्ण तपासणीसाठी आले होते. दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणावर शहरात फटाके फुटले होते. त्यामुळे हवेतील प्रदूषणात वाढ झाली आहे. सर्वाधिक रुग्ण हे सर्दी, खोकल्याचे आहेत. या रुग्णांना औषधांसह वाफ घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.
शहराच्या हवेचा निर्देशांक मध्यम
ठाणे महापालिकेच्या क्षेत्रातील हवेचा सरासरी गुणवत्ता निर्देशांक २४१ इतका होता. इतर दिवसांच्या तुलनेत हवेच्या गुणवत्ता निर्देशांकात या दिवशी १२३ ने वाढ झाल्याचे दिसून आले. परिणामी, ठाण्यातील हवेचा दर्जा या दिवशी मोठ्या प्रमाणात घसरला होता. सध्या ठाणे शहराच्या हवेचा निर्देशांक मध्यम प्रदूषित गटात मोडत आहे.