विक्रमगड: पालघर जिल्ह्याचे मुख्य पीक असलेल्या भात शेतीने यंदा चांगलाच बहर धरला असून हिरवीगार शेतं डौलाने डोलताना दिसत आहेत. गौरींचा सण आटोपल्यानंतर लगेच बेनणीच्या कामांची लगबग सुरू होणार आहे.
पालघर जिल्ह्यातील आठही तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भात शेती केली जाते. ही शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून असून शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मजूर टंचाई, पावसाचा लहरीपणा, अतिवृष्टी वा अल्पवृष्टीमुळे होणारे नुकसान या समस्यांमुळे शेतकऱ्यांना अनेकदा आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो.
जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी प्रयोगशील, आधुनिक व यांत्रिक शेतीचा स्वीकार केला असला तरी पारंपरिक शेती पद्धत अजूनही मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहे. त्यामुळे पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सर्वाधिक अडचणींचा सामना करावा लागतो. याच कारणामुळे अनेकांनी भात शेती सोडून दिली होती.
मात्र यंदा पावसाने योग्य प्रमाणात साथ दिल्याने भात शेती बहरून आली आहे. ७ मेपासून पावसाळा सुरू झाल्यानंतर चार महिने पावसाने सातत्याने हजेरी लावली. यामुळे भात शेतीसाठी पुरेसा पाऊस झाला असून पिके हिरवीगार व जोमदार दिसत आहेत.
शेतकऱ्यांचा विश्वास आहे की आता पावसाचे प्रमाण कमी झाले तर ते भात पिकासाठी फायदेशीर ठरेल. मात्र काढणीच्या काळात पाऊस पडल्यास नुकसान होऊ शकते, अशीही त्यांची चिंता आहे. तरीसुद्धा सध्या जिल्ह्यातील भात शेतीकडे पाहिले तर बहरलेले व डौलाने डोलणारे पिक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवत आहे.