रानभाजी महोत्सवात जव्हारच्या नवारोज पाडा गावात निसर्गाचा सन्मान

    03-Sep-2025
Total Views |

जव्हार :
 जव्हार तालुक्यातील खंबाळा/तलासरी ग्रामपंचायतीतील पेसा गाव नवारोजपाडा येथे रानभाजी महोत्सवाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमाद्वारे नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या रानभाज्यांचे महत्व आणि त्यांच्या आरोग्यदायी फायद्यांवर प्रकाश टाकण्यात आला.

जव्हारच्या निसर्ग संपन्न आदिवासी भागातील पारंपरिक आहारात रानभाज्यांना विशेष स्थान आहे. या पारंपरिक ज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने झालेल्या या महोत्सवात तब्बल ४६ प्रकारच्या रानभाज्यांचे प्रदर्शन करण्यात आले. त्यात कवळा, टाकळा, कुरडू, शेवग्याची पाने, अंबाडी, बाफळी, लोत, माठ, टेटू, खरशेंग आदींचा समावेश होता.

कार्यक्रमात सहभागी झालेल्या १८ महिलांनी त्यांच्या शेतातून आणलेल्या ताज्या रानभाज्यांचे प्रात्यक्षिक सादर केले. याशिवाय रानभाज्यांपासून तयार केलेल्या स्वादिष्ट पदार्थांचा आस्वादही उपस्थितांना घेता आला. स्थानिक महिलांनी उभारलेल्या स्टॉल्समुळे त्यांची कौशल्ये आणि स्वयंपाककला उजागर झाली.

वयम चळवळीच्या सहसंस्थापक दिपाली गोगटे यांनी या महोत्सवाचे महत्व अधोरेखित करताना सांगितले की, “रानभाज्यांचे संवर्धन व पारंपरिक ज्ञानाचे जतन ही काळाची गरज आहे. अशा उपक्रमांमुळे आरोग्य, निसर्ग व संस्कृती यांचा सशक्त संगम घडतो.”

या महोत्सवाला नवारोज पाडा गावातील त्र्यंबक रोज, नथू रोज, रमण रोज, सुरेश रोज यांच्यासह ग्रामस्थ, शेतकरी व लहान मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वातावरणात निसर्गप्रेम आणि आदिवासी परंपरेचा सन्मान यांचा समन्वय दिसून आला.

रानभाजी महोत्सवाने नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, स्थानिक कलागुणांचा सन्मान आणि आयुर्वैदिक ज्ञानाला प्रोत्साहन मिळवून दिले, असा एकमुखी सूर कार्यक्रमात उमटला.