वसई-विरार : वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन रविवारी (दि. ३१ ऑगस्ट) मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडले. एकूण ८२९३ गणेशमूर्तींपैकी ६७२३ म्हणजेच तब्बल ८१ टक्के मूर्तींचे विसर्जन हे महानगरपालिकेने उभारलेल्या कृत्रिम तलावांमध्ये करण्यात आले.
महानगरपालिकेच्या वतीने यावर्षी ११६ कृत्रिम तलाव, सहा जेटी, दोन बंद दगडखाणी तसेच १८ फिरते हौद उपलब्ध करून देण्यात आले होते. विसर्जन स्थळी मंडप, आरती स्थळे, दिवाबत्ती, वैद्यकीय मदत कक्ष, निर्माल्य संकलन, मोफत बससेवा आदी सोयी नागरिकांसाठी करण्यात आल्या होत्या.
या दिवशी ७७५० घरगुती व ५४३ सार्वजनिक अशी एकूण ८२९३ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. त्यापैकी ६३१८ घरगुती व ४०५ सार्वजनिक गणेशमूर्ती कृत्रिम तलावांत तर १४३२ घरगुती व १३८ सार्वजनिक गणेशमूर्ती नैसर्गिक स्त्रोत आणि जेटीवर विसर्जित करण्यात आल्या.
महानगरपालिकेच्या पर्यावरणपूरक उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून पुढील सात दिवसीय, गौरी व अनंत चतुर्दशी विसर्जनावेळीही नागरिकांनी कृत्रिम तलावांचा वापर करून पर्यावरण संवर्धनास हातभार लावावा, असे आवाहन आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी केले आहे.