अमेरिकेनंतर रशिया आणि चीन या प्रस्थापित महासत्ता. पण, भारताने आता या जागतिक सत्तास्पर्धेत प्रवेश केला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेकडे सारे जग आशेने पाहत आहे. रशिया-युक्रेन युद्धबंदी असो की, अमेरिकेच्या व्यापारयुद्धाचा सामना करायचा असो, त्यावर तोडगा भारतच काढू शकेल, अशी जागतिक समुदायाची भावना असून त्याचेच प्रतिबिंब ‘एससीओ’च्या बैठकीत उमटलेले दिसले.
चीनमधील तियानजिन येथे नुकतीच पार पडलेली ‘शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन’ची (एससीओ) बैठक अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरली. या बैठकीने बदलत्या जागतिक सत्ता-समतोलाची झलक जगाला दाखविली. पुढील काळात जागतिक राजकारणावर कोणा एका देशाचे किंवा युरोपीय देशांचे वर्चस्व राहणार नाही, असा नि:संदिग्ध संदेश या बैठकीने दिला. अमेरिकेच्या दादागिरीला वेसण घालणारा एखादा देश किंवा महाशक्ती आहे की नाही, याचा सारे जग शोध घेत होते. ‘एससीओ’च्या बैठकीत रशिया, चीन आणि भारताने या दादागिरीला आपण जुमानीत नसल्याचे स्पष्टपणे दाखवून दिले. त्याचा अर्थ हे जग आता एकधृवीय सत्ताकेंद्र राहिले नसून रशिया, चीन व भारत या तीन शक्ती येत्या काळात जागतिक व्यवस्थेवर प्रभाव टाकतील, हे स्पष्ट झाले. इतकेच नव्हे, तर या बैठकीद्वारे भारत हा जागतिक राजकारणातील एक महत्त्वाची महासत्ता म्हणून प्रस्थापित झाला आहे, ही यातील अतिशय महत्त्वपूर्ण घडामोड म्हणावी लागेल.
या परिषदेदरम्यान दोन-तीन छोट्या चित्रफितींनी भारत हा जागतिक स्तरावर किती महत्त्वपूर्ण देश बनला आहे, ते दिसून येते. या परिषदेदरम्यान एका चित्रफितीत व्लादिमीर पुतीन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे तिघे खुलेपणाने हास्यविनोद करताना दिसतात. त्यांच्यातील सहज आणि खेळीमेळीत चाललेला संवाद पाहताना हे तीन नेते जणू कॉलेजमधील मित्रांच्या ‘रियुनियन’ कार्यक्रमात सहभागी झाले आहेत, असे वाटते. या चित्रफितीतून नजीकच्या भविष्यात जागतिक सत्ता समतोल या तीन देशांच्या दिशेने झुकला असल्याचे स्पष्टपणे जाणवते. त्यानंतर व्यासपीठावर सामूहिक छायाचित्रासाठी काही नेते उभे होते. त्यात पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हेही होते. त्यांच्या समोरून मोदी आणि पुतीन हे गप्पा मारीत जात असताना त्यांनी शरीफ यांची दखलही घेतली नाही आणि त्यांच्याकडे न पाहताच ते पुढे निघून गेले. या चित्रफितीमुळे पाकिस्तानमध्येच शरीफ यांच्यावर टीकेचे प्रहार होत आहेत.
तिसरी घटना पुतीन-मोदी यांच्या मोटारमधील बैठकीची. तियानजिन शहरापासून काही अंतरावर असलेल्या एका बैठकीच्या जागेकडे जाताना पुतीन यांना मोदी हे आपल्यासोबत आपल्या मोटारीत बसायला हवे होते. पुतीन यांनी मोटारीतच दहा मिनिटे मोदी यांची प्रतीक्षा केली. नंतर हे दोन नेते सभास्थळी गेल्यावरही लगेचच मोटारीतून उतरले नाहीत. ते मोटारीतच बसून सुमारे पाऊण तास चर्चा करीत होते. यावरून या दोन नेत्यांमधील परस्पर विश्वास किती सखोल आहे, ते दिसून येते.
अवघ्या तीन-चार महिन्यांपूर्वी पाकिस्तानशी उडालेल्या लष्करी संघर्षात भारताने चिनी बनावटीच्या संरक्षण साहित्याचा सहजपणे विनाश घडविला होता. चीनने पाकिस्तानला आपल्याकडील शस्त्रे आणि अस्त्रे विकली होती. त्यांचा वापर अर्थातच भारताविरोधातच होणार होता. एका अर्थाने भारताने अप्रत्यक्षपणे चीनशीच युद्ध छेडले होते. असे असताना भारत आज चीनने पुढे केलेला मैत्रीचा हात का स्वीकारीत आहे, असा प्रश्न सामान्यांना पडणे स्वाभाविकच. पण, जागतिक राजकारणात कोणताही देश कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो. फक्त आपल्या देशाचे हितसंबंध जपणे यालाच सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. भारतही हेच करीत आहे. आज अमेरिकेची दादागिरी हे सर्वांत मोठे आव्हान आहे. अमेरिकेने एकाच वेळी सर्वच देशांना दुखावले. त्यात अमेरिकेचे युरोपातील मित्रदेशही आहेत. या स्थितीत त्या दादागिरीला एकमुखाने प्रत्युत्तर देणे, हीच आजची गरज आहे. चीन व रशिया यांच्या मदतीने भारत अर्ध्याहून अधिक जगाचे हितसंबंध जपत आहे. ज्याला ‘ग्लोबल साऊथ’ म्हणतात, त्या जगातील सर्व विकसनशील देशांनी भारताला आपला प्रतिनिधी मानले आहे. छोटे देश अमेरिकेच्या दादागिरीपुढे उभे राहू शकत नाहीत. पण, भारतासारखा देश आज अमेरिकेच्या अरेरावीला आव्हान देऊ शकतो, इतकी आर्थिक ताकद आज भारताने कमावली आहे. त्यासाठी त्याला रशिया व चीनची मदत मिळत आहे.
या परिषदेचे सर्व ठराव हे एकमताने मंजूर होत असतात. भारताने या बैठकीच्या संयुक्त जाहीरनाम्यात पहलगाममधील पर्यटकांच्या हत्येचा कठोर शब्दांत निषेध करण्यास भाग पाडले. त्यावर पाकिस्तानलाही निमूटपणे स्वाक्षरी करावी लागली, हे लक्षात घेतले पाहिजे. कारण, यापूर्वी झालेल्या ‘जी-७’ देशांच्या संरक्षणमंत्र्यांच्या परिषदेच्या जाहीरनाम्यावर स्वाक्षरी करण्यास भारताने नकार दिला होता. त्या पार्श्वभूमीवर ‘एससीओ’च्या संयुक्त जाहीरनाम्यात पहलगाम हत्याकांडाचा निषेध नोंदविण्यात भारताला यश आले आहे. पुतीन यांनीही युक्रेन युद्धाचे खापर अमेरिकेवर फोडले. युक्रेनची सरहद्द रशियाला लागते. त्या देशाला ‘नाटो’ या अमेरिकाप्रणित संरक्षण करारात सहभागी करून घेण्याच्या अमेरिका आणि युरोपीय देशांच्या प्रयत्नांमुळे रशियाला असुरक्षित वाटणे स्वाभाविकच होते. युक्रेनला त्यापासून रोखण्यासाठीच रशियाला त्याच्यावर आक्रमण करावे लागले, हे पुतीन यांनी स्पष्ट केले.
आजवर ज्याला गरीब, विकसनशील देश समजत होतो, तो भारत आज आपल्या हुकुमाची तामिली करण्यास नकार देत असल्याचे पाहून अध्यक्ष ट्रम्प यांचा अहंकार दुखावला गेला. म्हणून भारताला अद्दल घडविण्यासाठी अमेरिकेने भारताच्या आयातमालावर अवाजवी शुल्क लादले. इतके करूनही भारताने अमेरिकेच्या इच्छेपुढे मान तुकविण्यास नकार दिल्याने ट्रम्प आणि त्यांचे गणंग वैफल्यग्रस्त झाले आहेत. अमेरिकेचे व्यापारी प्रतिनिधी नावरो यांच्या वक्तव्यातून त्या देशाची वैफल्यग्रस्तता स्पष्टपणे उघड झाली आहे. रशियाकडून विकत घेतलेल्या तेलामुळे भारतातील ब्राह्मणांचा फायदा होतो, असे एक भलतेच वक्तव्य या नावरो महाशयांनी नुकतेच केले.
‘आपण म्हणू ते धोरण आणि आपली इच्छा हीच जागतिक जनमताची इच्छा’ या अमेरिकेच्या समजाला पुतीन-जिनपिंग-मोदी या त्रिमूर्तीने सुरुंग लावला आहे. त्यातही या परिषदेत मोदी यांच्याबद्दल पुतीन व जिनपिंग यांनी जो आदर दाखविला आणि त्यांच्या वक्तव्याला जे महत्त्व व प्रसिद्धी दिली, त्यावरून या परिषदेचे मोदी हेच खरे नेते असल्याचे दिसून आले.