खानिवडे, वसई तालुक्यात गणेशोत्सवात श्रीगणेशाबरोबर माता पार्वती म्हणजेच गौराईचे पूजनही मोठ्या भक्तिभावाने व पारंपरिक थाटामाटात केले जाते. सात दिवसांच्या गणपतींसह गौरींचेही विसर्जन रविवारी (दि. २ सप्टेंबर) खानिवडे व परिसरातील गावांत भावपूर्ण वातावरणात करण्यात आले.
या विसर्जन मिरवणुकीत महिलांनी स्वतःच्या डोक्यावर गौराईची मूर्ती घेत दोन किलोमीटरचा प्रवास पार करत लाडक्या बाप्पा व गौराईला निरोप दिला. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” या गजरात गावागावांतून निघालेल्या मिरवणुकीत हजारो ग्रामस्थ सहभागी झाले होते.
मिरवणुकीदरम्यान जागोजागी महिलांनी पारंपरिक गाणी गाऊन फेर धरला. प्रत्येक घराघरात माहेरवाशीण म्हणून पूजलेल्या गवत, पानं व फुलांनी सजवलेल्या गौराईंचे विसर्जन हिरव्यागार भातशेतीत करण्यात आले.
गाव एकतेचे दर्शन घडवणाऱ्या या मिरवणुकीत टाळ, मृदुंग, भजन व पारंपरिक नाच गाणी होत होती. संध्याकाळी सहाच्या सुमारास निघालेल्या या संयुक्त मिरवणुकीत गावोगावचे गणपती आणि गौरी एकत्र येऊन तानसा नदीकाठी पोहोचले. नदीकाठी एकत्रित आरतीनंतर बाप्पा व गौराईंचे भावपूर्ण जयघोषात विसर्जन करण्यात आले.
यावेळी मांडवी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. विसर्जनाच्या या सोहळ्यात भक्तीभाव, परंपरा आणि एकोप्याचा संगम पाहायला मिळाला.