मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सलग पाच दिवस मुंबईतील आझाद मैदानावर मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. दरम्यान, मंगळवारी या आंदोलनाची सांगता झाल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून आझाद मैदान परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
दिनांक २९ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सलग पाच दिवस आंदोलनकर्त्यांना नागरी सेवा-सुविधा पुरवण्यात आल्या. तसेच त्यांच्याकरिता विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. संपूर्ण आझाद मैदान परिसरात पाच दिवसांच्या कालावधीत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत ६ मोठे कॉम्पॅक्टर, लहान ६ कॉम्पॅक्टर, कचरा वहन गाडी, प्रत्येकी दोन सक्शन आणि जेटींग संयंत्रे, १३ एससीव्ही, ५२ टॅंकर्स अशा ९६ वाहनांचा वापर दोन्ही सत्रांमध्ये करण्यात आला. दरम्यान, आंदोलनाची सांगता झाल्यानंतर आझाद मैदान आणि महानगरपालिका परिसरात कर्मचाऱ्यांनी २ सप्टेंबरच्या रात्रीपासून तर ३ सप्टेंबरच्या पहाटेपर्यंत अविरतपणे स्वच्छता करून संपूर्ण परिसर पूर्ववत केला.
आंदोलनकर्त्यांना कोणत्या सुविधा?आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासूनच आंदोलनकर्त्यांच्या सुविधेसाठी तीन ठिकाणी फिरती शौचालये उपलब्ध करून देण्यात आली होती. ५ दिवसांच्या कालावधीत एकूण ४५० फिरती शौचालये महानगरपालिकेने उपलब्ध करून दिली. तसेच कचरा संकलनासाठी सुमारे ५०० किलो इतक्या थैल्या देण्यात आल्या होत्या. आंदोलनकर्त्या बांधवांनीही या थैल्यांचा वापर करून कचरा संकलनासाठी सहकार्य केले. महापालिकेच्या या स्वच्छता मोहिमेत मराठा आंदोलनकर्त्यांनीही हातभार लावला. यासाठी पालिका प्रशासनाकडून आंदोलनकर्त्यांचे आभार मानण्यात आले. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून आझाद मैदान परिसरात २४ तास वैद्यकीय कक्ष कार्यरत होता. पाच दिवसांच्या कालावधीत १० हजारांहून अधिक आंदोलनकर्त्या बांधवांनी वैद्यकीय सुविधेचा वापर केला, अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.